बंद, भाडेवाढ आणि मनस्ताप

    दिनांक  11-Jun-2019
लाखो मुंबईकर दैनंदिन प्रवासासाठी रिक्षा-टॅक्सीचा वापर करतात. मुंबईकरांसाठी लोकल, रिक्षा आणि टॅक्सी अत्यंत महत्त्वाची प्रवासाची साधने असल्याने त्यांच्याशिवाय मुंबईकरांचे पानही हलत नाही. मात्र, पुन्हा रिक्षा-टॅक्सीचालकांनी मुंबईकरांना वेठीला धरून संपाचे हत्यार उगारल्यामुळे वर्षाच्या प्रारंभीची ‘बेस्ट’ संपाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. खरंतर प्रवाशांना ‘नाही’ म्हणणे हे जणू रिक्षा-टॅक्सीचालकांचे आद्यकर्तव्यच. मुंबईत रिक्षा-टॅक्सीत बसल्यानंतर प्रवाशांना इच्छितस्थळी नेणे चालकांसाठी बंधनकारक असून या नियमाला ते कधीच भीक घालत नाहीत, उलट ’नाही जाणार’ अशी उद्दामपणे उत्तरं देऊन साफ नकार देतात. फक्त लांबचे भाडे हवे असल्याने रिक्षा-टॅक्सीचालकांकडून असा मनमानी कारभार केला जातो. यावर उपाय म्हणून शेअर रिक्षाही सुरू करण्यात आल्या. मात्र, अनेक ठिकाणी शेअर रिक्षाही खासकरून रात्रीच्या वेळी, सणासुदीला प्रवाशांना जास्त भाडे आकारून लुटतानाच दिसतात. मुंबईची लोकसंख्या प्रचंड असून अनेक ठिकाणी रिक्षा आणि टॅक्सीस्टॅण्ड असले तरी बराच वेळ प्रवाशांना ताटकळतच रांगेत उभे राहावे लागते. पूर्वी आणि आजही शेकडो प्रवासी रोज रिक्षाचालकांची/टॅक्सीचालकांची मनधरणी करताना दिसतात. मुंबईतील रिक्षा/टॅक्सी संघटनेचे रिक्षाचालकांवर/टॅक्सीचालकांवर नियंत्रण नसल्याने या गोष्टी सर्रास सुरू आहेत. काही ठिकाणी तर अनेक अल्पवयीन मुले विनापरवाना सायंकाळी रिक्षा बेधुंदपणे पळवताना दिसतात. इलेक्ट्रिक मीटर आले तरी रिक्षा-टॅक्सीच्या मीटरमधील फेरफारीचे प्रकार अद्याप पूर्णपणे थांबलेले नाहीत. त्यामुळे एकूणच प्रवाशांच्या सेवेच्या नावाने शंख असतानाही भाडेवाढीसाठी रिक्षा-टॅक्सीचालक असे वारंवार संपाचे अस्त्र उगारणार असतील, तर त्यावर कडक कारवाई ही झालीच पाहिजे. येत्या ९ जुलै रोजी रिक्षाचालकांचा संप होणार असून जवळजवळ २० लाख रिक्षाचालक त्या दिवशी संपावर जाण्याच्या पवित्र्यात आहेत. कारण काय तर म्हणे, रिक्षा संघटनांच्या प्रलंबित मागण्या. त्यामुळे मुंबईचे आणि मुंबईकरांचे आर्थिक, मानसिक नुकसान करणार्‍या या बेबंदशाहीला कुठेतरी आळा घालणे गरजेचे आहे. त्यामुळे सरकारने कुठल्याही दबावाला बळी न पडता, प्रवाशांच्या हिताचा विचार करून भाडेवाढीला मंजुरी न देता, हा संप मोडीत काढावा.

 

म्हणूनच ओला-उबेरची चलती

 

सध्या मुंबईत २० लाखांपेक्षा जास्त रिक्षा रस्त्यावर धावत असूून टॅक्सीचे प्रमाण हे जवळपास १५ लाखांच्या घरात आहे. पण, मुंबईत ऑनलाईन टॅक्सी आणि रिक्षांचीही चलती असून त्यांची संख्याही १० ते १२ लाखांच्या आसपास पोहोचली आहे. हा विक्रमी आकडा दिवसेंदिवस वाढतच जाईल, याबाबतही शंका नाहीच. गेल्या काही काळात मुंबईत या ऑनलाईन टॅक्सी-रिक्षांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. स्मार्टफोनवर सहजासहजी उपलब्ध होणार्‍या या रिक्षा-टॅक्सी, गारेगार एसीची हवा आणि चालकांचा सहन न करावा लागणारा मनमानी कारभार या ऑनलाईन रिक्षा-टॅक्सीच्या पथ्यावर पडला. त्यामुळे कुठेतरी या ऑनलाईन प्रवासी सेवेला पारंपरिक रिक्षाचालक आणि टॅक्सीचालकांचा अडेलतट्टूपणाही तितकाच जबाबदार आहे. पारंपरिक टॅक्सी आणि रिक्षाचालकांच्या मनमर्जी कारभारामुळे त्यांचे ग्राहक नक्कीच कमी झाले आहेत. जवळचे भाडे नाकारणे, जास्त भाडेआकारणी करणे, यांसारख्या अनेक तक्रारी प्रवाशांकडून नेहमीच येत असतात. यामुळे ऑनलाईन टॅक्सी-रिक्षाच्या व्यवसायाला जास्त गती मिळाली. मुंबईसारख्या शहरात अगदी कोणत्याही वेळी या ऑनलाईन टॅक्सी-रिक्षा सहज उपलब्ध असल्याने विशेषतः महिलांच्या दृष्टीने खूपच सुरक्षित आहेत. या सगळ्याचा मात्र पारंपरिक टॅक्सी-रिक्षांना मोठा धक्का बसला असून त्यांचा व्यवसाय मंदावल्याची ओरड केली जाते. यामुळे पारंपरिक रिक्षा आणि टॅक्सीचालकांचा ओला-उबेर या ऑनलाईन टॅक्सी-रिक्षांना विरोध आहे. त्यांचा व्यवसाय त्यांनी हिसकावल्याचा तसेच विनापरवाना या ऑनलाईन रिक्षा-टॅक्सी मुंबईच्या रस्त्यावर धावत असल्याचा त्यांचा आरोप आहे. मात्र, मुंबईकरांना या पारंपरिक टॅक्सी-रिक्षाच्या मनमर्जी जाळातून सुटण्यासाठी ऑनलाईन टॅक्सी-रिक्षा नक्कीच उपयुक्त आहेत. मग पारंपरिक टॅक्सी-रिक्षाचालकांचा या गोष्टीला विरोध का असावा? जर त्यांच्याकडून प्रवाशांना कोणत्याच प्रकारे चांगली सेवा मिळत नसेल, तर त्यांनी हा पर्याय वापरणे साहजिकच आहे. त्यामुळे येणार्‍या काही दिवसांत या पारंपरिक रिक्षा-टॅक्सीऐवजी अजूनच ऑनलाईन रिक्षा-टॅक्सीचा बोलबाला असेल, यात शंका नसावी.

 
 - कविता भोसले

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat