मेट्रो-३ च्या ५० टक्के भुयारीकरणाची कामगिरी फत्ते

    दिनांक  10-Jun-2019 

५६ किमीच्या भुयारीकरणापैकी २८ किमीचे भुयार पूर्ण


मुंबई : 'कुलाबा-वांद्रे-सीप्झ' या (मेट्रो-3) भारतातील पहिल्या पूर्णत: भुयारी मेट्रो प्रकल्पामधील ५० टक्के भुयारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गिकेसाठी सुरु असलेल्या ५६ किमी भुयारीकरणाच्या प्रक्रियेपैकी २८ किमीचे भुयार खणून पूर्ण झाले आहे. महत्वाचे म्हणजे हे काम दीड वर्षांमध्ये पूर्ण करण्यास 'मुंबई मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशन'ला (एमएमआरसीएल) यश मिळाले आहे.

 

सातत्याने होणार नागरिकांचा विरोध सहन करत 'एमएमआरसीएल' प्रशासनाने 'मेट्रो-३' च्या निर्माणकार्यातील महत्वाचा टप्प पूर्ण केला आहे.राज्य सरकारच्या पुढाकाराने सध्या शहरात मेट्रो मार्गिकांचे जाळे विणण्याचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गिकांमधील महत्वाच्या 'मेट्रो-३' मार्गिकेच्या निर्माणकार्याने वेग धरला आहे. या मार्गिकेचे निर्माणकार्य सर्वप्रथम सप्टेंबर २०१७ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माहिमच्या नयानगर येथील विवरात 'टनल बोअरिंग मशीन' (टीबीएम) उतरवून सुरू करण्यात आले होते. या प्रकल्पाअंतर्गत भुयारीकरण करण्यासाठी एकूण १८ टीबीएम यंत्रे मुंबईच्या भूगर्भात कार्यरत आहे. ही यंत्रे भूगर्भात उतरविण्यासाठी कफ परेड, इरॉस सिनेमा, आझाद मैदान, सायन्स म्युझियम,सिद्धिविनायक, नयानगर, बिकेसी, विद्यानगरी, पाली मैदान, सारिपुत नगर, सहार रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी २ येथे विवरे तयार करण्यात आली आहेत.


 
 

या प्रकल्पातील पहिले भुयार सप्टेंबर २०१८ रोजी पूर्ण झाले. त्यानंतर गेल्या ८ महिन्यात एकूण १२ भुयारे खणून पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत सीप्झ येथे १, सीएसएमआयए-टी २ येथे २,सहार, एमआयडीसी ,वरळी आणि आंतरदेशीय विमानतळ याठिकाणी प्रत्येकी १ भुयार. तर दादर, विद्यानगरी आणि विधानभवन येथे दोन भुयार खणून पूर्ण झाली असून अशा प्रकारे भुयारीकरणाचे एकूण १३ टप्पे पार पडले आहेत. एकूण भुयारीकरणापैकी आजवरचा सर्वात मोठा भुयारीकरणाचा टप्पा विद्यानगरी ते आंतरदेशीय विमानतळ (३.९किमी) हा असून सर्वात लहान सारिपुत नगर ते सीप्झ (५६२ मीटर) हा असल्याची माहिती 'एमएमआरसीएल'चे प्रकल्प संचालक एस.के. गुप्ता यांनी दिली. तर २८ किमी भुयारीकरणासाठी एकूण १९,४९५ सेगमेंट रिंग्सचा वापर झाला आहे. हे सेगमेंट रिंग्स मुंबईतील ६ कास्टिंग यार्ड मध्ये तयार होत आहेत ज्यापैकी ४ वडाळा, १ माहुल तर १ जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड येथे असल्याचे त्यांनी सांगितले. एकूण ३३.५ किमीच्या मार्गिकेवरील उर्वरित ५०% भुयारीकरण आणखी १९ टप्प्यात पूर्ण होणार आहे.


भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक परिस्थितीत मुंबईतील अतिशय जुन्या इमारती, मिठी नदी, व उन्नत मुंबई मेट्रो-१ याखालून भुयारीकरण करणे जिकिरीचे आहे. विशेष म्हणजे सुरक्षेबाबत कुठलीही तडजोड न करता सुरक्षेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून आम्ही हे काम पूर्ण केले आहे. प्रकल्प सल्लागार, कंत्राटदार या सर्वांचा या यशात सहभाग आहे. भुयारीकरणाप्रमाणे खोदकाम, बेस स्लॅब, कॉनकोर्स स्लॅब, कॉलम तसेच भिंतींची बांधणी यासारखी कामे देखील युद्धपातळीवर सुरू आहेत. - अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालिका, एमएमआरसीएल


१९५०४ सेगमेंट रिंग्स बनविण्यासाठी वापरण्यात आलेल्या सिमेंटचे प्रमाण:-

१४५५८६ घनमीटर

१९५०४ सेगमेंट रिंग्स च्या बनविण्यासाठी वापरण्यात आलेल्या स्टीलचे प्रमाण :-

११९८३.३८ मेट्रिक टन

मनुष्यबळ :-

१०० कामगार/ टीबीएम मशीन म्हणजेच १७०० कामगार १७ टीबीएम मशीन साठी

प्रतिदिन सरासरी भुयारीकरण :-

४७.५ मी/ दिवस


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat