कांदळवनांची माहिती आता ११ भाषांमध्ये उपलब्ध

    दिनांक  10-Jun-2019'गोदरेज अॅण्ड बाॅयस' निर्मित 'मॅंग्रोव्ह' अॅपवर कांदळवनांच्या ६७ प्रजातींची नोंद


मुंबई (अक्षय मांडवकर) : कांदळवन परिसंस्थेविषयी इत्यंभूत माहिती देणारे आशियातील पहिले मोबाईल अॅप आता इंग्रजी आणि हिंदी भाषांबरोबर नऊ स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध झाले आहे. 'मॅंग्रोव्ह' या नावाने 'गुगल प्ले स्टाॅअर'वर उपलब्ध असलेल्या या अॅपची निर्मिती 'गोदरेज अॅण्ड बाॅयस' यांनी केली आहे. या अॅपवर देशातील बारा सागरी राज्यांमध्ये आढळणाऱ्या कांदळवनांच्या प्रजातींची माहिती एकूण ११ भाषांमध्ये देण्यात आली आहे. यामुळे आता महाराष्ट्रातील स्थानिक कोळी, वनाधिकारी आणि विद्यार्थ्यांना कांदळवनांविषयीची माहिती मराठीतून वाचता येणार आहे.

 

कांदळवन परिसंस्था आणि त्याच्या प्रजातींविषयी माहिती उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने 'गोदरेज अॅण्ड बाॅयस' यांनी २०१७ मध्ये 'मॅंग्रोव्ह' या अॅपची निर्मिती केली होती. कांदळवन क्षेत्रासंबंधी काम करणाऱ्या तज्ज्ञांचा अभाव आणि अपुरे शैक्षणिक साहित्य या कारणांमुळे हे अॅप तयार करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अॅपचे विमोचन केले होते. गेल्या वर्षभरात हे अॅप ६५ देशांतील तीन हजारांहून अधिक लोकांनी डाऊनलाॅड केले आहे. मात्र या अॅपवर केवळ इंग्रजी भाषेतून कांदळवनांविषयीची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्यामुळे ही माहिती स्थानिक भाषांमधून उपलब्ध करण्याबाबत 'गोदरेज अॅण्ड बाॅयस'च्या कांदळवन कक्षाकडे विचारणा होत होती. या वाढत्या मागणीचा विचार करुन गेल्या काही महिन्यांपासून कांदळवन कक्षातील कर्मचारी या अॅपमध्ये सुधारणा करण्याचे काम करत होते. आता नऊ स्थानिक भाषा आणि ४३ नवीन प्रजातींचा समावेश करुन सुधारित 'मॅंग्रोव्ह' अॅप पुन्हा एकदा उपलब्ध करुन देण्यात आले आहे. पूर्वी या अॅपमध्ये केवळ कांदळवनांच्या २४ प्रजातींची माहिती देण्यात आली होती. ही माहिती पानांचा आकार, फुलांचा रंग आणि प्रजातीचे शास्त्रीय/स्थानिक नाव यानुसार विभागण्यात आली होती. आता मात्र या अॅपमध्ये कांदळवनांच्या ६७ प्रजातींची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

 


विशेष म्हणजे समुद्रकिनारपट्टी लाभलेल्या देशातील १२ सागरी राज्यांमध्ये आढळणाऱ्या कांदळवनांच्या प्रजातींची विभागणी करुन राज्यांनुसार आढळणाऱ्या प्रजातींची माहिती या अॅपवर टाकण्यात आली आहे. ही माहिती इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, कोकणी, कन्नड, तामिळ, तेलगू, ओरिया, बंगाली आणि मल्याळम या भाषांमध्ये उपलब्ध आहे. 'गुगल प्ले स्टाॅअर'वर हे अॅप उपलब्ध असून रोहित पक्ष्यांभोवती (फ्लेमिंगो) मासा आणि कांदळवनांच्या पानांचे आवरण अशास्वरुपात त्याचे बोधचिन्ह आहे. महत्वाचे म्हणजे कांदळवनांविषयी मराठी भाषेतील शैक्षणिक साहित्य फार कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे स्थानिक कोळी, वन विभागाचे अधिकारी, कांदळवनांवर उपजिविका करणाऱ्या महिलांचे बचत गट आणि या विषयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कांदळवनांची मराठी भाषेतून माहिती मिळविण्याकरिता या अॅपची मदत होणार असल्याचे 'गोदरेज अॅण्ड बाॅयस'च्या कांदळवन कक्षातील एका कर्मचाऱ्याने सांगितले. शिवाय हे एक मोबाईल अॅप असल्याने आणि ते खुले होण्याकरिता इंटरनेटची गरज भासत नसल्याने ते हाताळणे लोकांच्या सोयीचे असल्याची माहिती त्या कर्मचाऱ्याने दिली.


कांदळवनांविषयी.........

*
कांदळवनांची परिसंस्था ही ११२ उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्णकटिबंधीय देशांमध्ये वसलेली आहे.

*
कांदळवनांना वाढण्यासाठी किमान २४ सेल्सियस तापमानाची आवश्यकता असते.

*
भारतामध्ये ही परिसंस्था सर्व किनारी राज्ये आणि बेटांजवळ पसरली आहे.

*
महाराष्ट्रामध्ये कांदळवने साधारणपणे ३०४ चौ.किमी किनारपट्टीवर व्यापलेले आहे. ज्यामध्ये ५२ खाड्या आणि समुद्र किनाऱ्यांचा समावेश आहे.

*
जगामधील सर्वात मोठे कांदळवनांचे जंगल सुंदरबन जे भारत आणि बांग्लादेशमध्ये विभागले आहे. 
 
 
 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat