राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ. गणेश देवी

    दिनांक  10-Jun-2019पुणे : राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ. गणेश देवी यांची निवड झाली आहे. रविवारी राष्ट्र सेवा दलाच्या राज्यमंडळ आणि सेवादल मंडळाची राष्ट्रीय बैठक झाली त्यात ही घोषणा करण्यात आली. पूर्व अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार यांनी डॉ. देवी यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपवली.

 

यावेळी राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना डॉ. गणेश देवी म्हणाले, 'राष्ट्र सेवा दलाच्या प्रत्येक कार्यकर्त्याजवळ लोकशाही समाजवाद आणि साने गुरुजींच्या विचारांची शिदोरी आहे. सेवा दल कार्यकर्त्यांजवळ प्रगल्भता, कृतीशिलता आणि समानता ही त्रिगुणसूत्री आहे. या वारशाच्या जोरावर देशातील लोकशाही समाजवाद मानणाऱ्या नागरिकांकडे जाऊन आपण त्यांना सेवा दलाशी जोडूया.'

 

कोण आहेत डॉ. गणेश देवी

 

पद्मश्री डॉ. गणेश देवी हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषाशास्त्रज्ञ, विचारवंत आणि सांस्कृतिक नेते म्हणून प्रसिध्द आहेत. राष्ट्रीय किंवा राजभाषा म्हणून मान्यता नसलेल्या ४० भाषांना त्यांनी नवी ओळख मिळवून दिली. जवळपास १३ राज्यांमध्ये त्यांनी दक्षिणायन चळवळ रुजवली. यासोबतच देशातील लुप्त होणाऱ्या शेकडो वंचित व भटक्या समाजाच्या भाषांना त्यांनी आपल्या कामाने संजीवनी दिली. देशातील ७५० भाषांची नोंद करण्याचे व संशोधनाचे काम डॉ. देवी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह पूर्ण केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat