ज्येष्ठ नाटककार, साहित्यिक डॉ. गिरीश कर्नाड यांचे निधन

    दिनांक  10-Jun-2019


 


मुंबई : ज्येष्ठ नाटककार, साहित्यिक, दिग्दर्शक, अभिनेते डॉ. गिरीश कर्नाड यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्यावर बेंगळुरू येथील राहत्या घरी उपचार सुरू होते. तिथेच आज सकाळी सहाच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८१ वर्षाचे होते. डॉ. कर्नाड यांच्या निधनाने चित्रपट, नाट्य आणि साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

 

डॉ. कर्नाड यांनी तब्बल चार दशके नाट्यलेखन, दिग्दर्शन व अभिनयाने रंगभूमी गाजवली. 'तुघलक', 'नागमंडल', 'हयवदन' सारख्या गाजलेल्या मराठी नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले.  कन्नड, मराठी, हिंदी व इंग्रजीसह विविध भाषांमध्ये त्यांची नाटके रूपांतरित झालेली आहेत. साहित्य क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना १९९८ साली प्रतिष्ठित 'ज्ञानपीठ' पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

 

डॉ. कर्नाड यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. डॉ. गिरीश कर्नाड यांचे कार्य येणाऱ्या अनेक पिढ्यांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. तर डॉ. गिरीश कर्नाड यांच्या निधनाने आपण भारतीय चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील एक उत्तम व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat