सुप्रजा भाग-१२

    दिनांक  10-Jun-2019मानसिक ताण, चिंता, चिडचिड, अतिविचार यापासून दूर राहावे. मनुष्य शरीर हे यंत्र नव्हे. त्यात बऱ्याच विविध पैलूंचा विचार करावा लागतो. बऱ्याच गोष्टींचा शरीरावर Cause and Effect परिणाम होतो. जसे ताण-तणावामुळे मानदुखी, राग, चिडचिड अति असल्यास 'अल्सर'चा त्रास होतो. खूप भीती, नकारात्मक विचारांमुळे Irritable Bowel Syndrome (IBS) इ. मानसिक कारणांमुळे शारीरिक आजार होतात.


गर्भिणीला होणाऱ्या आजारांबद्दल आपण वाचत आहोत. त्याच लेखमालेतील हे पुढील पुष्प. गर्भिणी अवस्था ही नाजूक अवस्था असते. यात अतिशारीरिक कष्ट, मानसिक ताण व जागरण करू नये. गर्भिणीची स्वाभाविकतः पचनशक्ती थोडी मंदावलेली असते. तिची ताकद कमी होते. तसेच प्रतिकारक्षमताही उत्तम राहत नाही. याचबरोबर गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी संपूर्ण नीट वाढ होईपर्यंत काही औषधे टाळावीत. अन्यथा त्या औषधांचा गर्भावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. हे सगळे बघता आजार होणार नाही याकडे गर्भिणीचे व तिच्या परिवाराचे लक्ष असणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर थोडे काही झाले की लगेच औषधोपचार न करता घरगुती उपाय करून बघावे. पण, स्वतःच्या मनाने, वैद्यांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार सुरू करू नयेतगर्भिणीला होणारे काही त्रास आपण आधीच्या दोन लेखांमधून वाचले. त्यातीलच अजून काही त्रास आज आपण बघूयात. गर्भवती अवस्थेत स्त्रीशरीरात खूप मोठ्या उलाढाली होत असतात आणि त्या सर्व सुरळीत होत राहण्यासाठी पोषक आहाराबरोबरच पोषक वातावरण व विश्रांती घेणे गरजेचे आहे. हल्ली बहुतांशी महिला व्यवसाय-नोकरी इ. करत असतात. त्यात चांगली गतीही असते आणि प्रगतीही होत असते.

 
'डीलेव्हरी (बाळंतपणा)नंतर सगळे थांबणारच आहे. थांबवावेच लागणार आहे,' अशा विचाराने त्या आपल्या कार्यक्षेत्रात स्वतःला झोकून देतात. कामाचा वेग, वेळ आणि स्पर्धात्मक वातावरण या सगळ्यांचा गर्भवतीवर परिणाम होऊ शकतो. आधीच म्हटल्याप्रमाणे गर्भिणी अवस्था ही नाजूक अवस्था असते. म्हणजे तिने अति शारीरिक कष्ट घेऊ नयेत. सतत मानसिक ताण, चिंता जिथे असेल व ज्यामुळे असेल त्या वातावरणापासून, विचारांपासून दूर राहणे गरजेचे आहे. मुंबई-पुणे-नाशिकसारख्या शहरांमधून नोकरी-व्यवसायाला जाण्यासाठी खूप प्रवास करावा लागतो. बरेचदा उलट्या-मळमळ होत असल्याने आहाराची मात्राही कमी खाल्ली जाते. यामुळेही खूप गळून गेल्यासारखे होते. जसजसा गर्भ वाढू लागतो, त्याचे वजनही वाढते. सतत उभे राहणे, प्रवास करताना पायांवर खूप वेळ ताण येणे इ. गोष्टींमुळे पायांना सूज येऊ शकते. याचबरोबर पाठीचा मणका, कंबर, माकडहाडही दुखू लागते. जर गर्भिणीने (विशेषतः दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीमध्ये म्हणजेच second and third trimester मध्ये) 'हील्स'ची पादत्राणे वापरली, तर चवड्यांवर उभे राहिल्यावर जसा ताण येतो तसा पाठ व त्या खालील मणक्यांवर अधिक ताण येतो. पोटऱ्या सुजतात व दुखू लागतात. काही वेळेस 'Varicose Veins'चा त्रासही सुरू होतो.
 

दुखण्यावर सहसा पेनकीलर घेऊ नये. त्याचा किडनीवर वाईट परिणाम होतो, असे तज्ज्ञांनी सांगितलेले असते. पण, वेदना असह्य झाल्यावर औषधे घेणे भाग पडते. अशा वेळेस ती वेळच येणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे. कामावर जाताना उंच टाचेच्या चप्पला (सॅण्डल्स) टाळाव्यात. खूप गर्दीतून, खूप काळ उभे राहून प्रवास करू नये. कामावरही सतत उभे राहू नये. खुर्चीत बसताना पायाखाली छोटे स्टूल घ्यावे. पाय लोंबकळत किंवा अधांतरी ठेवू नये. तसेच आसनव्यवस्थाही मऊ (Soft Cushion) उशीची असावी. याने बराच काळ बसले तरी मूळव्याधीचा त्रास होणे टाळता येते. पाठीलाही उशी ठेवावी. खुर्चीत टेकून, पण पाठ सरळ अशा स्थितीत बसावे. रोज नित्यनेमाने अंगाला तेल लावावे. अभ्यंग करावे. तेल खूप चोळावे किंवा रगडावे असे नाही. फक्त हलक्या हाताने तेल पसरवून थोडे जिरवावे. याने हाडांबरोबरच सांध्यांना व स्नायूंना ताकद मिळते. शरीर लवचिक राहण्यास मदत होते आणि वाताचेही शमन होते. वात नियंत्रित राहिला की दुखणेही सुसह्य होते. पण ज्या गोष्टींचा त्रास होतो (प्रवास, पादत्राणे, आसने) ते बदलावे किंवा टाळावे. सूज असल्यास आहारातील मिठाचे प्रमाण कमी करावे. रक्तदाबाचा त्रास नाही ना, हे तपासून घ्यावे. तसेच मानसिक ताण, चिंता, चिडचिड, अतिविचार यापासून दूर राहावे. मनुष्य शरीर हे यंत्र नव्हे. त्यात बऱ्याच विविध पैलूंचा विचार करावा लागतो. बऱ्याच गोष्टींचा शरीरावर Cause and Effect परिणाम होतो. जसे ताण-तणावामुळे मानदुखी, राग, चिडचिड अति असल्यास 'अल्सर'चा त्रास होतो. खूप भीती, नकारात्मक विचारांमुळे Irritable Bowel Syndrome (IBS) इ. मानसिक कारणांमुळे शारीरिक आजार होतात. तसेच संपूर्ण, शांत झोप होत नसल्यास चक्कर येणे, गरगरणे, शौचास साफ न होणे, वारंवार तोंड येणे इ. लक्षणे उत्पन्न होतात. त्यामुळे फक्त उत्तम आहार आणि औषधे घेणे पुरेसे नाही. सकारात्मक दृष्टिकोन बाळगणेही अत्यंत गरजेचे आहे. आयुर्वेदामध्येविविध मानसिक त्रासांमुळे जन्माला येणाऱ्या बाळावर कसे अनिष्ट परिणाम होतात, याबद्दल सविस्तर सांगितले आहेत.

 
उदाहरणादाखल - गर्भवती जर खूप शोकमग्न, चिंताग्रस्त राहत असली तर होणारे बाळ भित्रे होऊ शकते. तसेच त्याची वाढ खुरटलेली होते आणि असे बाळ अल्पायुषी असू शकते. गर्भवती जर खूप झोपाळू असेल, तर गर्भात असलेले बाळ झोपाळू व मंद बुद्धीचे होते, असे आयुर्वेदात नमूद केले आहे. त्याचबरोबर त्या अपत्याची पचनशक्तीही मंद (कमी) असते. एखाद्या गर्भवतीला चुगल्या लावण्याची सवय असली, चोरीमारी करणे, निंदानालस्ती करणे इ. असल्यास तिचे होणारे अपत्य हे वाईट कर्मे करणारे होते. गर्भवती खूप चिडचिड करणारी असल्यास मूलही तापट व रागीट होते. तसेच त्या अपत्याच्या शारीरिक वाढीवर, रंगावर आणि इतर अवयवांवरही दुष्परिणाम होऊ शकतोयामुळे गर्भिणीला सकारात्मक विचार, आचार व आनंदी राहण्यास सांगितले जाते. उत्तम संगीत (कर्णकर्कश्श आवाजात ऐकू नये), चांगले वाचन व मन शांत व तणावरहित राहील अशी दिनचर्या अवलंबवावी. हल्लीच्या काळात आर्थिक चिंतादेखील गर्भिणीला सतावत असते. त्याचासुद्धा ताण येतो. पण एक लक्षात ठेवावे जर त्या ताणाने स्वतःच्या आणि गर्भाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होणार असेल, तर अशा ताणाचा फायदा न होता तोटाच होतो. तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार गर्भधारणेपूर्वी करावा. planned conceptionमध्ये आर्थिक बाबींचाही अवश्य विचार करावा. करिअर आणि शिक्षणामुळे हल्ली लग्न व गर्भधारणा उशिरा होते. तिशीनंतर गर्भधारणा होणे हे मेडिकल सायन्सनुसार उशिरा मानले जाते. त्याबरोबरच जर नकारात्मक बाबींची जोड झाली, तर सुंदर, सुदृढ आणि आरोग्यदायी अपत्यप्राप्ती होणे कठीण होईल. तेव्हा गर्भवतीने रिलॅक्स राहणे अत्यंत गरजेचे आहे. याचा अर्थ झोपून राहावे, असे कदापि नाही. कारण, गर्भवती अवस्था ही एक स्वाभाविक अवस्था आहे, कुठला रोग नाही. हे कायम लक्षात ठेवावे. (क्रमशः)
 

- वैद्य कीर्ती देव

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat