होमियोपॅथीक तपासणी केस टेकिंग भाग-२२

    दिनांक  10-Jun-2019रुग्णाच्या आयुष्यात अनेक घटना, अनेक प्रसंग व अनेक घडामोडी घडत असतात. यापैकी सर्वच प्रसंग त्याच्या लक्षात नसतात. परंतु, असे काही महत्त्वाचे प्रसंग किंवा घटना असतात की, ज्या विसरल्या जात नाहीत व त्यामुळे रुग्णाच्या मनावर त्याचा कुठे तरी खोलवर परिणाम झालेला असतो.


होमियोपॅथीक केस टेकिंगमध्ये रुग्णाच्या संपूर्ण आयुष्यातील घटनांचा आढावा घेतला जातो. यामध्ये रुग्णाची शारीरिक व मानसिक जडणघडण जाणून घेण्याचा प्रयत्न असतो. शारीरिक व मानसिक स्थितीच्या या अभ्यासामुळे मग त्या रुग्णाला भविष्यात होऊ शकणाऱ्या आजारपणांचासुद्धा अंदाज बांधता येतो व त्याप्रमाणे प्रतिबंधाचे उपाय करून रुग्णाला भविष्यातील होणाऱ्या आजारापासून वाचवता येते. रुग्णाची माहिती घेत असताना विविध प्रसंगांतील रुग्णाची प्रतिक्रिया ही एक महत्त्वाची गोष्ट जाणून घ्यावी लागते. रुग्णाच्या आयुष्यात अनेक घटना, अनेक प्रसंग व अनेक घडामोडी घडत असतात. यापैकी सर्वच प्रसंग त्याच्या लक्षात नसतात. परंतु, असे काही महत्त्वाचे प्रसंग किंवा घटना असतात की, ज्या विसरल्या जात नाहीत व त्यामुळे रुग्णाच्या मनावर त्याचा कुठे तरी खोलवर परिणाम झालेला असतो. अशा प्रसंगांमध्ये रुग्णाची भावना व मानसिक स्थिती जाणून घेणे फार महत्त्वाचे असते. या प्रसंगातून मग आपल्याला रुग्णाची खरी मानसिक स्थिती कळण्यास मदत होते. म्हणून होमियोपॅथीकतज्ज्ञ रुग्णाला अशा प्रसंगांबाबत विचारत असतात. मागील घडून गेलेल्या घटनांच्या आधारे मग रुग्ण स्वत:चा एक समज करून घेत असतो व मग या समजाच्या आधारेच तो स्वत:चे असे एक मत बनवत असतो आणि मग त्या मताच्या आधारेच तो वागत असतो व याच गोष्टीमुळे त्याचा स्वभाव तयार होतो. म्हणूनच स्वभावाचा अभ्यास करताना वरील सर्व गोष्टी जाणून घेणे हे फार महत्त्वाचे असते.

 

रुग्णाची माहिती घेत असताना, रुग्ण त्याच्या बोलण्यातून, वागण्यातून व त्याच्या हावभावांवरून एकप्रकारचे वातावरण तयार करत असतो. तो ज्या प्रसंगाचे वर्णन करतो, त्या प्रसंगाच्या अनुसारही एक प्रकारचे वातावरण तयार होत असते व या वातावरणाचा आजूबाजूच्या लोकांवरही एक प्रकारचा परिणाम होत असतो. हा होणारा परिणामही चिकित्सकाला काही गोष्टींचे ज्ञान देत असतो, म्हणजेच जेव्हा रुग्ण सर्व माहिती देत असताना चिकित्सक व त्यांचे सहकारी यांच्या मनातही काही भावना तयार होत असतात. या भावनांमुळे रुग्णांच्या एकंदरीत स्वभावाबद्दल माहिती कळू शकते. उदाहणार्थ - एखादा रुग्ण दवाखान्यात आल्या आल्या अतिशय आनंदात व उत्साहात बोलत असतो व एकप्रकारचे चैतन्यशील वातावरण तो तयार करत असतो त्याचप्रमाणे एखाद्या रुग्णाच्या चालण्या - बोलण्याच्या व प्रसंग सांगण्याच्या पद्धतीवरून तो अतिशय संथ व कंटाळवाणा आहे, हेदेखील लक्षात येते. परंतु, या प्रकारच्या नोंदी नोंदवून ठेवताना चिकित्सकाला खूप काळजी घ्यावी लागते. कारण, या सर्व नोंदी कुठलाही पूर्वग्रह न ठेवता कराव्या लागतात; अन्यथा या चुकीच्या नोंदींमुळे मग रुग्णाच्या चिकित्सेवर व औषधावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच अशा वेळी चिकित्सकाने उदासिन राहायचे असते व रुग्ण जे सांगतो आहे त्यानुसारच आपले मत नोंदवायचे असते. रुग्णाच्या वागण्यामुळे जे वातावरण तयार होते, ते तसेच्या तसे नोंदवून ठेवायचे असते. पुढील भागात आपण अजून याबद्दल माहिती घेऊया. (क्रमश:)

 

- डॉ. मंदार पाटकर

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat