'निसर्गव्रती'

    दिनांक  10-Jun-2019आजच्या आधुनिक जगातही विजेशिवाय ६० वर्षांपेक्षा जास्त काळ निसर्गाच्या सान्निध्यात जगणाऱ्या डॉ. हेमा साने यांच्या जगावेगळ्या निसर्गप्रेमाविषयी आपण जाणून घेऊया.


या विजेशिवाय आपण आपल्या रोजच्या जगण्याची कल्पना तरी करू शकतो का? तर नक्कीच नाही. कारण, विजेशिवाय आपण राहूच शकत नाही, इतकी वीज सर्वांसाठीच खूप महत्त्वाची आहे. मात्र, पुण्यातल्या ७८ वर्षीय डॉ. हेमा साने विजेशिवाय गेल्या अनेक वर्ष राहत आहेत. डॉ. हेमा साने या पुण्यात राहणाऱ्या एक वनस्पतिशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी वनस्पतिशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त करून त्यात डॉक्टरेट मिळवलेली आहे. त्यांनी भारतविद्या शास्त्रात एम.ए. आणि एम.फिल. केलेले आहे. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र विभागाच्या त्या प्रमुख होत्या. त्या निसर्गप्रेमी असून त्यांनी इतिहासाचादेखील अभ्यास केला आहे. हेमा साने यांनी इ. स. १९६० पासून विजेचा वापर केलेला नाही. त्यामुळे घरात विजेचा दिवा, दूरचित्रवाणी संच, फ्रिज, वॉटर हीटर, मायक्रोवेव्ह, मिक्सर यांसारखी आधुनिक उपकरणेही नाहीत. नोकरीतील शेवटची दहा वर्षे त्यांनी 'लुना' हे वाहन वापरले. तोपर्यंत तसेच नोकरीव्यतिरिक्त इतरत्र त्या पायीच जात. अजूनही त्या विहिरीवरून पाणी आणतात. त्यांनी दूरध्वनीही वापरलेला नाही. डॉ. साने यांनी वनस्पतिशास्त्र ते भारतीय इतिहासाच्या विषयावर पुस्तके लिहिली आहेत. "मी काही एकटीच अशा पद्धतीने राहत नाही. ही आमच्या घराण्याची परंपरा आहे. आपले पूर्वज असेच राहत होते. पूर्वी वीज नव्हती तेव्हा कंदील, रॉकेलची चिमणी यांच्या प्रकाशामध्ये माणसांनी आयुष्य काढले होते. मीसुद्धा तीच जीवनपद्धती जगत आहे," असे हेमा साने म्हणतात.

 

निसर्ग आणि पर्यावरण याविषयी बोलणारे खूप असतात, लिहिणारेही खूप असतात, पण प्रत्यक्षात कृती करण्याची वेळ आली की अनेक जण मागे हटतात. निसर्ग आपल्याला खूप काही देत असतो. आपण मात्र निसर्गालाच ओरबाडत असतो. त्या निसर्गप्रेम फक्त बोलून दाखवत नाहीत, तर प्रत्यक्ष कृतीमधून आचरणातही आणतात."किमान ६० वर्षे या घरामध्ये वीज नाही. वीज वापरली नाही म्हणून काही अडलेदेखील नाही," असाही अनुभव त्या सांगतात. आता काळाची पावले ओळखूनत्यांनी सौरऊर्जेवर चालणारे दिवे घेतले आहेत. शिधापत्रिकेवर मिळणारे रॉकेल बंद झाल्यामुळे त्यांनी गॅसदेखील घेतला. पण या गॅसचा वापर खूपच मर्यादित आहे. त्यांच्या जुन्या वाड्याचे बांधकाम काही वर्षांपूर्वी कोसळले आणि या वाड्यामध्ये असलेले भाडेकरू तेथून दुसरीकडे वास्तव्यास गेले. त्यामुळे हेमाताई साने या वाड्यामधील एका खोलीत एकट्याच राहतात. "पण मी एकटी नाही," असे त्या आवर्जून सांगतात. "माझी चार मांजरे, दोन कुत्री आणि भल्या पहाटेपासून झाडांवर येणारे वेगवेगळे पक्षी हे माझे सखे-सोबती आहेत," अशीच त्यांची भावना आहे. त्यांच्या वाड्यामध्ये एक विहीर आहे. घरामध्ये महापालिकेच्या नळाचा वापर केवळ पिण्याचे पाणी घेण्यापुरताच केला जातो. बाकी वापरण्याचे पाणी त्या विहिरीतून काढतात. पाणी ही संपत्ती आहे आणि या संपत्तीचा विनाकारण नाश करू नये, असेही त्या सांगतात. दिवसभर लख्ख सूर्यप्रकाशामध्ये त्यांचे लेखन-वाचन सुरू असते. त्या म्हणतात, ''मला एकटीला फारसे जेवण लागत नाहीच. माझी मांजरे उपाशी राहू नयेत म्हणून मी स्वयंपाक करते." पुणे विद्यापीठात पदवीधर विद्यार्थ्यांसाठीच्या अभ्यासक्रमांचा एक भाग वनस्पतिशास्त्रावरील त्यांच्या काही पुस्तकांचा आहे. वृक्षांच्या पौराणिक गोष्टींवर त्यांनी या पुस्तकात चर्चादेखील केली आहे. आजही त्यांनी आपले लिखाण थांबवलेले नाही. त्यांचे घर अगदी साधे आहे. घराचा परिसर झाडांनी वेढलेला असून तिथे वेगवेगळ्या पक्षांचा वावर असतो. त्या वीज वापरत नसल्याने लोकांनी त्यांना वेड्यात काढले. त्या म्हणतात की, "१९४० च्या दशकाच्या अखेरीस माझे आई-वडील आणि आजी-आजोबा इथेच राहायला आले होते. तेव्हा मला याचे महत्त्व समजले नव्हते. पण आता मात्र मी त्यांच्या विचारसरणीला पाठिंबा देत तेच करतेय."

 

हेमाताई साने यांचा भाऊ आई-वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्यासोबत राहावयास आला होता. परंतु, त्याचा चार वर्षांपूर्वी मृत्यू झाला. त्या म्हणतात की, "मला कोणीही नातेवाईक नाहीत आणि या मार्गाने जगणे मला खूप आवडते." लोकांनी त्यांना घर विकून भरपूर पैसा कमवण्याचा सल्ला दिला, पण तो त्यांनी फेटाळून लावला. आपल्या प्राण्यांची आणि झाडांची काळजी कोण घेणार, याची चिंता त्यांना सतावते. हेमाताई साने यांच्या पर्यावरणपूरक जीवनशैलीचे समाजातील विविध स्तरांतून कौतुक होत असते, तशीच त्यांच्यावर टीकाही होत असते. त्याबाबत त्या बोलतात की, 'निंदकाचे घर असावे शेजारी' असे तुकाराम महाराजांनी म्हणूनच ठेवले आहे. त्यामुळे अशा टीकेची मी फारशी दखल घेत नाही. मी माझे जीवन कुणालाही त्रास न देता जगतेय, मग लोकांना यात काय चुकीचे वाटते?" त्यांनी आजवर वनस्पतिशास्त्र आणि पर्यावरणावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. डॉ. सानेंचा वाडाही पुस्तकांनी भरलेला आहे. त्यांचे आजच्या आधुनिक जगातले हे विजेशिवाय जगणे, नक्कीच खूप वेगळे आहे. ज्येष्ठ वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांच्यावर आधारित 'ग्लो वॉर्म इन ए जंगल' हा माहितीपट तयार झाला आहे. राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) टीव्ही डीरेक्शन विभागाचा विद्यार्थी रमणा दुम्पला याने हा माहितीपट दिग्दर्शित केला असून, हा माहितीपट फ्रान्समधील महोत्सवासाठी निवडला गेला होता. फ्रान्समधील पॉईंटर्स फिल्म फेस्टिव्हलसाठी एफटीआयआयच्या दोन लघुपटांची निवड झाली. यात रमणा दुम्पलाच्या 'ग्लो वॉर्म इन ए जंगल' या लघुपटाचीही निवड झाली होती. पर्यावरणाविषयी अत्यंत सजग असलेल्या साने यांची आजच्या काळात अनोखी ठरणारी जीवनशैली आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे.

 

- कविता भोसले

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat