विधानपरिषदेवर पृथ्वीराज देशमुख बिनविरोध

    दिनांक  01-Jun-2019मुंबई : विधानपरिषदेच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेचे उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांची बिनविरोध निवड झाली. विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. देशमुख यांची बिनविरोध निवड झाल्याचे महाराष्ट्र विधिमंडळाचे सचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे यांनी शुक्रवारी जाहीर केले.

 

विधानपरिषदेत सत्ताधारी भाजपाचे संख्याबळ अधिक असल्याने विरोधकांनी देशमुख यांच्याविरोधात अर्जच दाखल केला नाही. त्यामुळे देशमुख यांची आमदार म्हणून बिनविरोध निवड झाली. या पदाची मुदत २४ एप्रिल २०२० पर्यंतच असल्याने देशमुख यांचा कार्यकाळ हा ११ महिन्यांचा असणार आहे.

 

पृथ्वीराज देशमुख हे युतीच्या काळात अपक्ष आमदार म्हणून निवडणून आले होते. त्यानंतर त्यांनी युतीला पाठिंबा जाहीर केला होता. पृथ्वीराज देशमुख हे भाजपचे सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष असून या काळात त्यांनी पक्ष संघटनेवर अधिक भर दिला होता. याच पक्ष संघटनेच्या जोरावर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे संजय काका पाटील हे विजयी झाले. याशिवाय त्यांच्याच काळात सांगली जिल्हा परिषदेवर आणि सांगली महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकला होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat