बिगर राजकीय पार्लेकरांनी अनुभवला हृद्य राजकीय सत्कार

    दिनांक  01-Jun-2019मुंबई : अत्यंत हृद्य असा राजकीय सत्कार विलेपार्लेकरांनी शनिवारी विलेपार्ले येथे अनुभवला. नवनिर्वाचित खा. पूनम महाजन यांचा लोकमान्य सेवा संघाच्या पटांगणावर सत्कार आयोजित करण्यात आला होता. या सत्काराला विलेपार्ल्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्थांच्या प्रमुखांनी खा. पूनम महाजनांना शुभेच्छा दिल्या आणि आपले मनोगत व्यक्त केले.

 

मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांच्या हस्ते खा. महाजन यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या अत्यंत ओजस्वी व शैलीदार भाषणात डॉ. देशमुख यांनी पूनम महाजन यांचे कौतुक केले. पूनम महाजन यांच्या आई रेखा महाजन यादेखील या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. डॉ. देशमुख यांनी रेखा महाजन यांचे कौतुक केले आणि आई म्हणून त्यांनी पार पाडलेल्या भूमिकेबद्दलही त्या बोलल्या. आपल्या शुभेच्छांच्या अखेरीस खा. पूनम महाजन एक दिवस पंतप्रधान होतील, असे आशीर्वादही दिले. विलेपार्ल्याचे आ. पराग अळवणी यांनी जनसंघ ते भाजप या प्रवासात विलेपार्ल्याच्या योगदानाचा प्रवास उलगडला आणि आपल्याला आपल्या हक्काचा खासदार मिळाल्याबद्दल समाधानही व्यक्त केले. खा. महाजन यांनी या सत्काराला उत्तर देताना आपल्या राजकीय संघर्षाची कथा उपस्थितांसमोर उलगडली. प्रमोद महाजनांचा राजकीय प्रवास त्यांनी विशद केला. युवा मोर्चाच्या अध्यक्ष म्हणून केरळ, बंगाल इथे विचारसणीचा म्हणून करावा लागणारा रक्तरंजित संघर्ष त्यांनी मांडला. निवडणुकीत या सगळ्या विधानसभांमध्ये विलेपार्ले विधानसभेने आपल्याला कशाप्रकारे आधार दिला हेदेखील सांगितले.

 

यावेळी जनसेवा समितीच्यावतीने मिलिंद करमकर, प्रबोधन मंचाचे मृगांक परांजपे, योगेंद्र राजपुरीया, सुनील मोने, यांनीही यावेळी शुभेच्छापर भाषणे केली. लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष मुकुंद चितळे यांनी आपल्या शुभेच्छांमध्ये आम्ही अपेक्षा व्यक्त करण्यापेक्षा ज्या विषयात तुम्हाला आमची मदत लागणार असेल, ते तुम्ही सांगा. पार्लेकर मंडळी तुमच्यासाठी सदैव तत्पर असतील, असे सांगितले. लोकमान्य सेवा संघाचे शतक महोत्सवी वर्ष सुरू होत आहे. त्यावेळी नरेंद्र मोदी या वास्तूत यावेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली. या कार्यक्रमाला स्थानिक नगरसेविका ज्योती अळवणी, नगरसेवक अभिजित सामंत, जनसेवा बँकेचे अध्यक्ष संतोष केळकर व अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat