राष्ट्रवादीच्या प्रफुल्लवर ईडीची तलवार; लवकरच तिहार वारी?

    दिनांक  01-Jun-2019
नवी दिल्ली : राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते आणि माजी नागरी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने समन्स बजावले आहे. दिपक तलवार-विमान घोटाळा प्रकरणी कारवाई करताना ईडीने हे समन्स जारी केले आहे. येत्या गुरुवारी म्हणजेच दि. ६ जूनला ईडीने प्रफुल्ल पटेल यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश यातून दिले आहेत. दिपक तलवार-विमान घोटाळा प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल करतेवेळी प्रफुल्ल पटेल यांचे नाव समोर आले होते. दिपक तलवार यांना प्रफुल्ल पटेल यांच्या निकटचे मानले जाते. प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय मंत्रीपदी असताना दिपक तलवार यांना विशेष सवलत दिल्याचा आरोप आहे. आता ईडीने बजावलेल्या समन्सनुसार प्रफुल्ल पटेल यांना गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात हजर राहावे लागेल, इथे त्यांची चौकशी होईल. तसेच यावेळी ईडीचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

 

ईडीने पाठवलेल्या समन्सबद्दल माहिती मिळताच प्रफुल्ल पटेल मुंबईत सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतून उठून गेले. बाहेर आल्यानंतर ईडीच्या समन्सबद्दल माध्यमांनी विचारताच ते म्हणाले की, अंमलबजावणी संचालनालयाला पूर्णपणे सहकार्य केले जाईल व मला त्याचा आनंदही आहे, जेणेकरुन विमान क्षेत्रातील गुंतागुंत मला त्यांना समजावून सांगता येईल. दरम्यान, दिपक तलवार यांने एअर इंडियाच्या एअरबस कंपनीच्या विमान खरेदीवेळी दलालाचे काम केल्याचे आणि त्यातून आर्थिक हेराफेरी करत एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ९० कोटींपेक्षा अधिक रुपयांचा अपहार केल्याचा दावा करण्यात येत आहे. शिवाय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग तलवारने खाजगी कंपन्यांना मिळवून दिले होते. या मोबदल्यात तलवारला २००८-०९ दरम्यान २७२ कोटी रुपये मिळाले, असा दावा इडीने न्यायालयात केला होता. यावेळी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे हवाई वाहतूक मंत्रीपदाचा कार्यभार होता. दुसरीकडे तलवार यांच्यावर एफसीआरए कायद्याच्या उल्लंघनाचाही आरोप आहे. ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणातही दिपक तलवार यांचे नाव आले होते. तद्नंतर दिपक तलवार फरार झाले होते. परंतु, त्यांना पुन्हा मायदेशी आणण्यात आले.

 

नेमके प्रकरण काय?

 

अंमलबजावणी संचालनालयाने ऑगस्ट २०१७मध्ये या एकूणच प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. सीबीआयनेदेखील याप्रकरणात नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे अधिकारी, एनसीआयएल, एअर इंडिया आणि अज्ञात व्यक्तिंविरोधात गुन्हा दाखल केला होता. चौकशीतून वाचण्यासाठी दीपक तलवार देशाबाहेर फरारही झाला होता. पुढे त्याचे दुबईतून प्रत्यार्पण करण्यात आले व ईडीने त्याला अटकही केली. एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सचे विलीनीकरण, आर्थिक स्थिती नसताना ७० हजार कोटी रुपये किंमतीच्या १११ विमानांची खरेदी, परकीय गुंतवणूकीतून प्रशिक्षण संस्था सुरु करणे तसेच आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग खासगी कंपन्यांना देणे अशा चार प्रकरणांचा सध्या ईडीकडून तपास सुरु आहे. हा घोटाळा झाला तेव्हा नागरी उड्डाण खाते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे होते. त्यामुळेच पटेल यांची चौकशी करण्यात येणार आहे.

 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat