विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेसचे हात वर

01 Jun 2019 21:55:00



नवी दिल्ली : "पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे आम्ही विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार नाही." असे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी स्पष्ट केले आहे. एकीकडे ५२ खासदार भाजपशी लढण्यास पुरेसे आहे असे म्हणणाऱ्या काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावरून हात वर केले आहेत.

 

सुरजेवाला यांनी सांगितले की, "विरोधी पक्षनेता बनण्यासाठी लोकसभेच्या १० टक्के संख्याबळ असणे गरजेचे आहे. परंतु, आमच्याकडे २ खासदार कमी आहेत ही वस्तुस्थिती आहे. आमच्याकडे पर्याप्त ५४ खासदारांचे संख्याबळ येत नाही तोपर्यंत आम्ही विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करणार नाही. कोणत्याही एका पक्षाला प्रमुख विरोधी म्हणून निवडण्याचे काम आता सरकारच्या हातात आहे. सरकारला विरोधी पक्ष हवा आहे की नाही हे त्यांच्यावरच अवलंबून आहे."

 

२०१४ लोकसभा निवडणुकीवेळीही काँग्रेसकडे विरोधी पक्ष नेतेपदी दावा करण्यासाठी अपेक्षित खासदार संख्या नव्हती. त्यावेळी काँग्रेसचे केवळ ४४ खासदार निवडून आले होते. त्यामुळे गेली पाच वर्ष संसदेत विरोधी पक्ष नेतेपद नव्हते. याही वेळेस खासदारांचा अपेक्षित आकडा नसल्याने संसदेत विरोधीपक्ष नेतेपद रिक्त राहण्याची शक्यता आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0