आयपीएल फायनलची तिकिटे २ मिनटात 'हाऊसफुल्ल'?

    दिनांक  09-May-2019हैदराबाद : इंडियन प्रीमिअर लीग २०१९ (आयपीएल)ची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबईने धडक मारली असून आता चेन्नई आणि दिल्लीपैकी कोणता संघ मुंबईविरुद्ध खेळणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. अशामध्येच हैदराबादमध्ये रंगणाऱ्या अंतिम लढतीची तिकिटे अवघ्या दोन मिनिटांत विकली गेली आहेत. तर दुसरीकडे सर्व तिकीटे दोन मिनिटांत कशी विकली गेली, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. यंदा आयपीएलचे नाव सामान्यांपेक्षा इतर गोष्टीमुळे जास्त चर्चेत राहिले आहे. कधी अम्पायरचे चुकीचे निर्णय, बुकींचे अटकसत्र आणि आता झपाट्याने विकिली गेलेली तिकिटे.

 

आयपीएलचा अंतिम सामना १२ मे रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर रंगणार आहे. बीसीसीआयने बुधवारी तिकीटांची विक्री सुरू केली. विशेष म्हणजे, त्याची पूर्वकल्पनाही दिली नाही. तरीही अवघ्या दोन मिनिटांत सर्व तिकीटे विकली गेली. याबाबत हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारी समितीच्या एका सदस्यानेच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "अंतिम सामान्यांची तिकीटे काही मिनिटांतच कशी विकली गेली? हे आश्चर्यकारक आहे. याबद्दल बीसीसीआयला अंतिम सामना बघण्याची इच्छा असलेल्या चाहत्यांना उत्तर द्यावे लागेल." असे तो सदस्य म्हणाला.

 

हैदराबादच्या या मैदानाची प्रेक्षक क्षमता ३९ हजार आहे. एरवी २५ ते ३० हजार तिकीटांची विक्री होते. मात्र, यावेळी सर्व तिकीटे कशी विकली गेली? याचं उत्तर अनेकांना मिळाले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, १०००, १५००, २०००, २५००, ५०००, १००००, १२५००, १५०००, २२५०० रुपये किंमतीच्या तिकीटांची विक्री होणार होती. मात्र, 'एव्हेंट्स नाऊ'ने १५००, २०००, २५०० आणि ५००० रुपये किंमतीची तिकीटे विकली. अन्य १२५००, १५०००, २२५०० रुपये किंमतीच्या तिकीटांचे काय झाले?, असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. "याबाबत कोणतीही माहिती देऊ शकत नाही. आम्हाला जी तिकीटे मिळाली होती, ती विकली. यासंदर्भात बीसीसीआय उत्तर देईल." असे 'इव्हेंट्स नाऊ'च्या सुधीर रेड्डी यांनी सांगितले आहे. यावर आता बीसीसीआयकडून काय उत्तर येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat