पवारांचे तथाकथित 'गांधीप्रेम'

    दिनांक  09-May-2019राष्ट्रपिता महात्मा गांधींचा आणि पुढील इंदिरा, राजीव, संजय, सोनिया, राहुल, प्रियांका या गांधींचा तसा काही थेट संबंध नाही. परंतु, स्वातंत्र्यकाळातील 'गांधी माहात्म्या'मुळे देशवासीयांनी राष्ट्रपिता गांधींवर व यापुढील गांधींवरही अतोनात प्रेम केले. त्यानंतर मात्र हे गांधी संमोहन बरेचसे कमी झाले. परंतु, देशाच्या राजकारणातील बरेच नेते गांधीप्रेमाबाबत संभ्रमित होते. त्यांना स्वार्थ साधण्यासाठी 'गांधी' हवे होते. परंतु, प्रत्यक्ष राजकारण करताना मात्र त्यांना कधीकधी याच गांधींची अडचण होत होती. या नेत्यांमध्ये अग्रभागी नाव येते ते शरद पवारांचे. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर आताच्या देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार हे बरोबर दोन दशकांपूर्वी सोनिया गांधी यांच्या विरोधात बंड पुकारून काँग्रेसबाहेर पडले. त्यांनी सोनिया गांधींच्या विदेशी वंशाचा मुद्दा समोर आणून 'राष्ट्रवादी काँग्रेस'ची स्थापना मोठ्या थाटात केली होती. 'झाले तेवढे पुरे, असे म्हणत नुसते नाव गांधी आहे म्हणून एखाद्या व्यक्तीला देशाच्या सर्वोच्च पदावर बसू द्यायचे नाही,' असा म्हणे पणच त्यावेळी पवारांनी केला होता. (त्याआधी सोनियांना राजकारणात आणण्यासाठी ज्या राजकारण्यांनी पुढाकार घेतला होता, त्यात शरद पवार हे नाव आघाडीवर होते, हा भाग वेगळा.) गांधी घराण्याला असा थेट विरोध करण्याचे धाडस काँग्रेसमधील फार कमी लोकांनी दाखवले. त्यात एक शरद पवार होते. मात्र, त्यांनी त्यानंतर झालेल्या निवडणुकीनंतर पुन्हा सोनिया यांच्या काँग्रेसशीच हातमिळवणी केली. आपण घेतलेल्या भूमिकेला आपणच हरताळ फासणे, हा पवारांच्या राजकारणाचा 'युएसपी' आहे, हे सगळेच जाणतात. हे आता आठवण्याचे कारण म्हणजे, गुरुवारी साताऱ्यात झालेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात शरद पवार यांनी आपले अख्खे भाषणच गांधीस्तुतीसाठी खर्च केले. “दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना भ्रष्टाचारी म्हणणे गैर आहे. तसेच इंदिरा गांधी सर्वोत्तम पंतप्रधान होत्या. या मायलेकाची हत्या हा या कुटुंबाचा देशासाठी केलेला त्याग होता,” असे बरेच काही पवारांनी 'गांधीस्तोत्रा'त म्हटले. वर्षभरापूर्वीपर्यंत पवारांना राहुल गांधी अपरिपक्व नेते वाटत होते. अलीकडे मात्र राहुल यांच्यातील परिपक्वतेचा साक्षात्कार पवारांना झाला. गांधीविरोधी पवार खरे की गांधीप्रेमी पवार खरे, याबाबत आता त्यांचे राष्ट्रवादीप्रेमी कार्यकर्ते डोके खाजवत आहेत. पवारांच्या आताच्या वागण्याचा अर्थ कळेपर्यंत पवार अजून वेगळी भूमिका घेतील, हा भाग वेगळा.

 

भतिजाची बुवावरील 'माया'

 

'मोदी लाटे'मुळे २०१४ची लोकसभा निवडणूक अभूतपूर्व झाली होती. अशी निवडणूक पुन्हा होणार नाही, असे त्यावेळी म्हटले जात होते. परंतु, आता पाच वर्षांनी २०१९ची लोकसभा निवडणूकही वेगळ्या पद्धतीने अभूतपूर्वच पार पडत आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध सर्व' असे या निवडणुकीचे स्वरूप दिसत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यापासूनच सहिष्णुता व सद्भाव यांचे दर्शन होते. सर्वच पक्षांमध्ये मोकळे व खुले संबंध आहेत. महाराष्ट्रात जसे वैयक्तिक द्वेषाचे व शत्रुत्वाचे राजकारण सहसा केले जात नाही, तशी परिस्थिती मात्र इतर राज्यांत नाही. दक्षिणेतील विशेषतः तामिळ आणि उत्तर भारतीय राजकारण आजतागायत कमालीच्या द्वेषावर आधारलेले आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील मायावती व यादव पितापुत्र, काका यांचे राजकारण तर कुप्रसिद्ध आहे. दक्षिणेत जसे जयललिता आणि करुणानिधी यांचे अखेरपर्यंत शत्रुत्व होते, तशीच अवस्था उत्तरेत मायावती व यादव पितापुत्रांमध्ये होती. मायावती व यादव कधी एकत्र येतील, असे कोणालाही वाटले नव्हते. परंतु, 'मोदी' नावाच्या तुफानाने ही किमया केली. मोदींना सामोरे जाण्यासाठी उत्तर प्रदेशातील या कट्टर शत्रूंना एकत्र यावे लागले. मायावती व अखिलेश नुसते एकत्र आले नाहीत, त्यांनी महाआघाडीही केली. तसेच आता ही बुवा-भतिजाची जोडी एकमेकांचे अथकपणे गोडवे गात फिरत आहे. एवढेच नव्हे, तर “मायावती यांना पंतप्रधान करण्यासाठी जे शक्य आहे, ते करू” अशी घोषणाच अखिलेश यांनी केली आहे. त्याचबरोबर “मला किंवा वडील मुलायम यांना पंतप्रधान होण्यात रस नाही,” असेही त्यांनी सांगितले आहे. बुवा-भतिजाच्या या टिपिकल उत्तर भारतीय प्रेमामुळे देशाच्या राजकारणात 'मोदी' नावाच्या महालाटेला विरोध करण्यासाठी कोणताही राजकारणी काहीही करू शकतो, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. मोदींना विरोध करण्यासाठी एरवी एकमेकांच्या उरावर बसणारे सपा, बसपासारखे पक्ष एकत्र आले असले, तरी ही आघाडी तळातील कार्यकर्त्यांना कितपत झेपेल, तसेच या निवडणुकीनंतर या बुवा-भतिजाच्या आघाडीचे काय होईल, हे पाहणेही मनोरंजक ठरणार आहे.

 

- शाम देऊलकर

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat