'आजोबा' आणि 'ती'

    दिनांक  09-May-2019


 वन्यजीव संशोधनासारख्या पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या क्षेत्रात 'आजोबा' नामक बिबट्याचा प्रवास जगासमोर आणून बिबट्याप्रती समाजाचा दृष्टिकोन बदलणाऱ्या डॉ. विद्या अत्रेय यांच्याविषयी...


'ती' जे काम करत होती, त्याने वन्यजीव संशोधन क्षेत्रात इतिहास घडेल, याची तिला पुसटशीही कल्पना नव्हती. 'आजोबा' बिबट्याचा माळशेज घाट ते मुंबई असा १२० किमीचा थक्क करणारा प्रवास जगासमोर उलगडणारी 'ती' म्हणजे डॉ. विद्या अत्रेय. महाराष्ट्रात टिपेला पोहोचलेल्या मानव-बिबट्या संघर्षाच्या प्रश्नाचे मूळ जाणून घेऊन तो थोपविण्यामध्ये विद्या यांचा मोठा वाटा आहे. 'आजोबा'च्या प्रवासाने वन्यजीव संशोधन क्षेत्रात नवीन पायंडे पाडले. महत्वाचे म्हणजे हल्लेखोर मानल्या जाणाऱ्या बिबट्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्याचे मुख्य कारण 'आजोबा' झाला. मात्र, “माझ्यामुळे 'आजोबा' नाही, तर, आजोबामुळे 'मी' समृद्ध झाले,” असे विद्या आवर्जून नम्रपणे सांगतातविद्या यांचा जन्म चेंबूर येथील श्रीनिवास मूर्ती यांच्या सर्वसामान्य कुटुंबामधला. आई शारदा यांना मांजरांची विशेष आवड. जखमी पक्ष्यांची निगा राखण्याचे काम त्या करत असत. म्हणूनच प्राण्यांविषयीचा कनवाळूपणा विद्या यांच्या अंगी रुजला. विद्या यांना पशुवैद्यकाचे शिक्षण घेण्याची इच्छा होती. मात्र, तसे झाले नाही. त्यांनी रुईया महाविद्यालयातून 'गणितशास्त्र' या विषयात कला शाखेची पदवी घेतली. परंतु, महाविद्यालयीन वयात त्यांच्या मनी वन्यजीवांप्रतीची आवड खोलवर रुजायला कारणीभूत ठरले ते रुईयाचे 'नेचर क्लब.' या क्लबमुळे त्यांचा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बीएनएचएस या संस्थांशी परिचय झाला. वन्यजीव संवर्धन प्रकल्पांना भेटी देणे सुरू झाले. त्यामुळे शिक्षण 'गणितशास्त्रा'चे सुरू असले तरी,वन्यजीव संशोधन क्षेत्रात काम करण्याच्या प्रबळ इच्छेची पालवी विद्या यांच्या मनी येथूनच फुटू लागली होती. दरम्यान, महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांचे लगेच लग्न झाले आणि त्या बंगळुरूला स्थायिक झाल्या. पती रमणा अत्रेय यांनी त्यांना पुढील शिक्षणकरिता पाठबळ दिले.

 

कला शाखेतील पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना भारतात पर्यावरण किंवा वन्यजीव संशोधन विषयाचे शिक्षण घेता येत नव्हते. म्हणून त्यांनी १९९३ साली पाँडिचेरी हून 'इकोलॉजी' विषयात एम.एस पूर्ण केले. त्यानंतर विद्या तीन वर्ष 'वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' या संस्थेत 'ज्युनियर रिसर्चर' म्हणून कार्यरत होत्या. मात्र, त्यांना पदव्युत्तर शिक्षणाची ओढ स्वस्थ बसू देत होती. म्हणून 'इकोलॉजी अॅण्ड इव्हॅल्युशनरी बायोलॉजी' या विषयात एमएससी करण्यासाठी त्यांनी अमेरिका गाठली. त्यादरम्यान विद्या यांचे पतीदेखील दक्षिण अमेरिकेत नोकरीच्या निमित्ताने वास्तव्यास होते. त्यामुळे एमएससी पूर्ण केल्यानंतर हे जोडपे अमेरिकेत राहू लागले. मुलीच्या जन्मानंतर तिच्या पालनपोषणासाठी विद्या पाच वर्ष घरीच होत्या. २००२ मध्ये रमणा यांच्या नोकरीच्या निमित्ताने हे जोडपे आपल्या मुलीसह पुन्हा भारतात परतले. भारतात परतल्यानंतर विद्या यांनी जोमाने कामाला सुरुवात केली.

 
 
२००१-०२ च्या दरम्यान महाराष्ट्रात मानव-बिबट्या संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढला होता. 'मॅनईटर'चा शिक्का बसवून बिबट्यांना जेरबंद करून त्यांना पकडलेल्या क्षेत्रापासून दूर सोडण्याचे प्रमाण वाढले होते. मात्र यामुळे हा प्रश्न सुटण्याऐवजी अधिक गुंतागुतीचा झाला होता. 'वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट'चे संजय ठाकूर यांच्या मदतीने विद्या यांनी या प्रश्नावर काम करण्यास सुरुवात केलीपशुवैद्यक डॉ. अनिरुद्ध बेलसारे यांच्या सहाय्याने त्यांनी वन कर्मचाऱ्यांसाठी बिबट्याच्या बचावाची परिस्थिती कशी हाताळावी याबद्दलच्या प्रशिक्षणास सुरूवात केली. त्यानंतर २००७ मध्ये अकोल्यामध्ये कॅमेराटॅपिंग प्रकल्प राबवून मनुष्यवस्तीत आढळणाऱ्या बिबट्यांचा अभ्यास केला. हे काम सुरू असतानाच २००९ मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी ढोकेश्वर या गावामधील विहिरीत बिबट्या पडल्याचे वनविभागाला आढळून आले. बिबट्याला विहिरीतून बाहेर काढल्यानंतर त्याला सोडण्यापूर्वी विद्या यांनी त्याच्या गळ्याभोवती 'रेडिओ कॉलर'बसवली. बिबट्याच्या प्रवास जाणून घेण्यासाठी 'रेडिओ कॉलर' बसविण्याची ती पहिलीच वेळ होती. हा बिबट्या प्रौढ असल्यामुळे विद्या यांनी त्याचे नाव 'आजोबा' ठेवले आणि वनविभागाने त्याची माळशेज घाटात पुन्हा सुटका केली. त्यावेळी हा 'आजोबा' इतिहास घडवेल, याची कोणालाच कल्पना नव्हती.


 

२९ दिवसांत महामार्ग, रेल्वे रूळ, वसई औद्योगिक वसाहत आणि वसई खाडी पोहून आजोबा १२० किमीचा टप्पा पार करत बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पोहोचला. या कालावधीत विद्या यांनी त्याच्या थक्क करणाऱ्या प्रवासाची नोंद केली. 'आजोबा'च्या प्रवासाचा समाजावर कसा परिणाम होईल, याचा अंदाज नसल्याने विद्या यांनी या प्रवासाची खबर कोणलाच कानोकान पोहोचू दिली नव्हती. केवळ वनविभागाला या प्रकाराची कल्पना देऊन ठेवली. पण, एका पत्रकार परिषदेत वनअधिकाऱ्याने या गोष्टीचा उलगडा केला आणि विद्या प्रकाशझोतात आल्या. त्यानंतर विद्या यांनी २०१२ मध्ये अकोल्यातील आपल्या कामाच्या आधारावर 'कॉन्फ्लिक्ट रेस्यॉल्युशन अॅण्ड लेपर्ड कॉन्झर्वेशन इन अ ह्युमन डॉमिनेटेड लॅण्डस्केप' या विषयात पीएचडी करून 'डॉक्टरेट' मिळविली'आजोबा'च्या प्रवासाचा समाजावर आणि खास करून त्यांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांवर सकारात्मक प्रतिसाद पडल्याचे विद्या आनंदाने सांगतात. या कामाच्या सुरूवातीला काही संशोधक त्यांच्या कामाची चेष्टा करत होते. मात्र आजोबाचा प्रवास जगजाहीर झाल्यानंतर त्या मार्गाने वन्यजीव संशोधनाचे काम वळले. विद्या यांचे नेमके हेच यश आहे. सध्या त्या 'डब्लूसीएसआय' या संस्थेत 'कॉन्झर्वेशन सायन्स' विभागाच्या'साहायक संचालिका' म्हणून काम करत आहेत. संशोधनाऐवजी या क्षेत्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम त्या आज करतात. त्यांच्या 'आजोबा'वर एक चित्रपटही प्रसिद्ध झाला आहे. जिद्द, चिकाटी आणि निर्भीड स्वभावामुळे विद्या यांनी 'आजोबा'च्या प्रवासाचा इतिहास घडवून इथवर मजल मारली आहे. त्यांच्या पुढील प्रवासासाठी दै. 'मुंबई तरुण भारत' कडून शुभेच्छा!

                                                                                                                                                       - अक्षय मांडवकर
 
 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat