मुजोर रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा; परवाने जप्त

    दिनांक  08-May-2019मुंबई : मुंबई शहरातील रिक्षाचालकांच्या मनमानी कारभारावर परिवहन खात्याकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या २ महिन्यात ५,००० रिक्षा चालकांना दंड भरावा लागला आहे. तसेच २,६८९ रिक्षा चालकांचे परवाने जप्त करण्यात आले आहेत. ज्यात ७१९ परवाने हे भाडे नाकारल्यामुळे रद्द करण्यात आले आहेत.

 

परिवहन विभागाकडून ही कारवाई करण्यासाठी तब्बल १४ पथके बनविण्यात आली होती. या पथकातील अधिकारी सामान्य प्रवासी बनून रिक्षा चालकांना इच्छित स्थळी नेण्यास सांगायचे. यात शेकडो रिक्षाचालकांनी जवळचे भाडे नको म्हणून भाडे नाकारत असताना या पथकाने या संदर्भात या रिक्षाचालकांवर कारवाई करीत २६०० परवाने रद्द केले आहेत. रद्द केलेले परवाने या रिक्षाचालकांना पुन्हा न मिळावेत म्हणून त्यांच्या वर झालेल्या कारवाईचे संपूर्ण व्हिडीओ रेकॉर्डिंग या दरम्यान करण्यात आले आहेत.

 

परिवहन विभागाने केलेल्या कारवाईत गेल्या २ महिन्यात ५,४२६ प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. यात रिक्षा भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांची संख्या ७१९ एवढी असून प्रमाणापेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्या ३९ रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. मर्यादेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या ३५८ रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली असून तब्बल ३,२६८ परवाना व बॅच नसलेल्या रिक्षा चालकांवर कारवाई झाली आहे. एकूण २,६८९ रिक्षाचालकांचे परवाने जप्त करून १७३ रिक्षाही परिवहन विभागाने जप्त केल्या आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat