इंग्लंडमधील हवामान आणिबाणी आणि भरतवनचा लढा...

    दिनांक  08-May-2019   
गेल्या आठवड्यात दोन बातम्या काळीज आणि मेंदू दोन्ही ठिकाणी प्रभाव टाकत्या झाल्या. कुठलीही घटना, आविष्कार, हृदय आणि मेंदूपर्यंत पोहोचत असेल तर ती अभिजात असते. या दोन बातम्यांत भौगोलिक विचार करता एक बातमी फारच स्थानिक अशी होती आणि दुसरी वैश्विक वगैरे होती. मात्र, अंत:स्थ भाव पाहिला तर दोन्ही बातम्या विश्वाचे आर्त सांगणार्याच होत्या. नागपुरातील भरतनगर भागातून तात्पुरती सोय म्हणून रस्ता काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्याचा निर्णय शासन-प्रशासनाने घेतला होता. आता भरतनगर ही उच्चभ्रू-सुखवस्तूंची वसती आहे. कुंपणाबाहेरचे चटके आत येऊ नये याची काळजी घेणारी प्रवृत्ती सहसा असते; पण भरतनगरवासीयांनी त्या विरोधात लढा उभारला आहे. ‘भरतवन’ नावाच्या हिरवळीच्या जागेतील हे वृक्ष तोडू नये यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन उभारले. मानवी साखळी उभी केली. ही त्यांची कृती वैश्विकच आहे. मानवी जगण्याकडे इतक्या जिवंत जाणिवेने पाहता आले पाहिजे आणि तुमच्या संवेदना तितक्या हळव्याही असल्या पाहिजेत. ती झाडे भरतनगर नावाच्या नागपुरातील एका उपनगरातील जागेवर लागली असली तरीही ते वृक्ष जगाचा भाग आहेत...
दुसरी बातमी ब्रिटनमधली आहे. तिथल्या संसदेत 1 मे रोजी मतदान झाले. मतदान व्हावे आणि सरकारने हा निर्णय घ्यावा, यासाठी तिथल्या मजूर पक्षाने सरकारवर दबाव आणला होता. तिथे आता पर्यावरण आणि हवामान आणिबाणी जाहीर करण्यात आली आहे. त्यांनी आता पर्यावरणाच्या संदर्भात काही लक्ष्यं ठरविली आहेत आणि ती आणिबाणीच्या पातळीवर साध्य केली जाणार आहेत. त्यासाठी तिथल्या पर्यावरणसजग नागरिकांनी गेल्या काही महिन्यांपासून लढा उभारला होता. त्याला ‘रीबेल फॉर लाईफ’ असे नाव दिले आहे. ‘एक्सटिन्शन रीबेलियन’ असे त्या चळवळ्यांनी नाव धारण केले होते. त्यासाठी त्यांनी अत्यंत अभ्यासान्ती हवामानबदलावर काय केले पाहिजे, याची योजनाच सरकारला दिली होती. त्यासाठी पाठपुरावा केला. अखेर एप्रिल महिन्यात 16 तारखेला, आपल्याकडे ज्याला चक्का जाम म्हणतात तसे आंदोलन केले. ऑक्सफोर्ड सर्कस, मार्बल आर्च, वार्टलू ब्रीज या लंडन शहरातील महत्त्वाच्या भागात त्यांनी वाहतूक रोखून धरली होती. लोकांनीही त्यांना अगदी समजून साथ दिली. 113 लोकांना अटक करण्यात आली. त्यानंतर आंदोलन अधिक वाढले, त्याला लोकांचे समर्थनही मिळू लागले आणि मग हाऊस ऑफ कॉमन्ससमोर अर्धनग्न आंदोलनही करण्यात आले. दबाव वाढत गेला आणि मग ब्रिटनच्या संसदेत मतदान घेऊन हवामान आणि पर्यावरण आणिबाणी जाहीर करण्यात आली. मजूर पक्षाचे प्रमुख जेरेमी कोर्बेन म्हणाले की, आता सरकारने यावर काम करावे, हीच ती वेळ आहे. आता त्यांनी काही टप्पे नक्की केले आहेत. 2030 मध्ये 2010 पेक्षा ग्रीन हाऊस गॅसचा परिणाम पन्नास टक्क्यांवर आला पाहिजे. 2050 मध्ये तो ‘शून्य’ टक्केच झाला पाहिजे.
हा विषय काही आजचा नाही. जागतिक पर्यावरण परिषदेत हा विषय गेल्या काही सत्रांपासून सतत चर्चेत आहे. पॅरिसच्या परिषदेत अमेरिकेने असे काही निर्बंध लादून घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर जगभर त्याची चर्चा झाली. आपल्याकडे आत्ताच निवडणुका संपत आहेत. त्यातील महत्त्वाच्या मुद्यांचा विचार करायला हवा. आपल्या सार्वत्रिक निवडणुकांतील मुद्दे अद्यापही मूलभूत सोयींच्या पलीकडे गेलेले नाहीत. अमेरिकेत अन् पाश्चात्त्य देशांत पर्यावरण हादेखील निवडणुकीचा विषय असतो. अल गोर यांनी जॉर्ज बुश यांच्या विरोधात राष्ट्राध्यक्षाची निवडणूक साधारण 15-16 वर्षांपूर्वी लढविली होती. त्यांनी हरीत वायू हाच विषय केला होता. त्या वेळी अमेरिकनही त्यांच्या या मुद्यावर जाणिवेच्या पातळीवर त्यांच्या सोबत नव्हते. एकतर उद्योगपतींची मोठी लॉबी त्यांना विरोध करणारी होती. आता ट्रम्प यांनीही पॅरिस परिषदेतील निकषांना विरोध करण्याचे कारण उद्योगपतींचा अनुनय करणे, हेच होते. गोर त्या वेळी पराभूत झाले. मात्र, आता अमेरिकेसह जगाला त्यांचा हा मुद्दा मान्य करावा लागला आहे. जगायचे असेल तर या विषयावर काम करावेच लागेल...
आपल्या विकासाचे मॉडेलच पर्यावरणविरोधी असेच आहे. हरीत वायूत कार्बन आणि मिथेन हे दोन वायू अत्यंत घातक असे आहेत. त्यात सर्वाधिक प्रमाण कार्बनचे असते. मिथेन अगदी नगण्य असले तरीही त्याचे विघटन होत नाही. कार्बन संपविता येतो. त्याचे विघटन होते. त्यावर एकच उपाय आहे तो म्हणजे झाडे लावणे. दुसरा उपाय म्हणजे कार्बनचे उत्सर्जन रोखणे, कमी करत नेत संपविणे, हा आहे. जगात यावेळी कार्बनचे प्रमाण 415 पार्ट पर मिलियन आहे. काही देशांत ते याहीपेक्षा जास्त आहे. त्याचे आदर्श प्रमाण 350 पार्ट पर मिलियन असे आहे. आताच आपण (म्हणजे जग) सावरले नाही, तर याच दशकात हे प्रमाण 425 ते 50 पर्यंत जाऊ शकते आणि त्याचे अत्यंत घातक असे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत. आताच ते दिसताहेत. ऋतूंचे चक्र बदलते आहे. इकडे प्रचंड उष्णता आहे, तर आसामात पूरस्थिती आहे. वादळाचा तडाखा बसला आहे. हे असेच सुरू राहिले तर सारेच जलार्पण होईल. शेती पिकणारच नाही. जगबुडी नावाचा प्रकार जो आपण ऐकत आलो आहोत तो प्रत्यक्षात आपल्यालाच बघावा लागणार आहे. आमच्या पिढीचे आयुष्य तर गेले आहे. कधीचीच ही धमकी देत असतात हे पर्यावरणवादी. काहीच झाले नाही. आता पुढच्या पिढीलाही काही धोका नाही, असे हलक्यात घेण्याचे काही कारण नाही. कारण, आताच त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. भारतातील अनेक शहरांची हवा प्राणघातक झाली आहे. गेल्या वर्षी श्रीलंकेचा क्रिकेट संघ मास्क घालून खेळला दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर आणि नंतर तर त्यांनी खराब हवेमुळे सामनाच सोडून दिला. अनेक देशांत, एक दिवस इंधनावर चालणारी वाहनेच वापरायची नाहीत, असा निर्णय घेतला गेला आहे आणि त्याची कडक अंमलबजावणी केली जात आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्री आटोक्यात आणली पाहिजे. रस्त्यावर गरजेपेक्षा जास्त वाहने आहेत. सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा वापर करणे अनेकांना त्यांच्या प्रतिष्ठेच्या आड येणारे वाटते.
कार्बनपासून दूर जाणे, हाच एकमेव पर्याय आहे. त्यासाठी आम्हाला आमच्या विकासाच्या संकल्पना बदलाव्या लागतील. वीज हा आमचा प्राण झाला आहे. विजेशिवाय तर आता शेतीही शक्य नाही. कोळसा आणि पाण्यापासून वीज तयार केली जाते. कोळसा तर खाणीतून बाहेर काढला तरीही हवेतले कर्बाचे प्रमाण वाढते. त्यामुळे औष्णिक विद्युत प्रकल्प बंदच केले पाहिजेत. त्यासाठी विजेचा वापरही कमी केला पाहिजे. तसे प्रयत्न भारतात सुरू झाले आहेत. एलईडी दिव्यांमुळे कमी वीज खर्च होते. त्यासाठी एक दिवस थर्मल पॉवरविना, असाही निर्णय इंग्लंडमध्ये घेतला गेला. 116 वर्षांनी असे घडले. त्यासाठी आता सौरऊर्जेचा वापर जास्तीत जास्त करणेही आवश्यक झाले आहे. घर बांधताना रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट लावणे अत्यंत आवश्यक करावे तसेच सौरऊर्जेचे पॅनेल्स लावणेही सक्तीचे करण्यात यावे... असे सगळे बोलू लागल्यावर उद्योग विश्व त्यावर आक्षेप घेते. यांना औद्योगिक विकासाचा गळाच घोटायचा आहे, अशी ओरड केली जाते. सरकारे उद्योगपतींच्या स्नेहावर चालतात, हे जागतिक सत्य आहे. त्यामुळे सुरुवातीला विरोध झाला, मात्र आता त्याचे गांभीर्य लक्षात येते आहे. पर्यायांचा शोध घेणेही सुरू झाले आहे. आर्थिक गणित नीट जुळवायचे असेल, तर खर्च कमी करणे आणि बचत करणे हे दोन उपाय असतात. तसेच हेही आहे. कार्बनचे उत्सर्जन कमी करत नेत असताना आता वाढलेले प्रमाण कमी करण्यासाठी कार्बनचे विघटन घडवून आणण्यासाठी सोपा उपाय म्हणजे झाडे लावणे. तुम्ही नवे झाड लावू शकत नसाल, तर तुम्हाला असलेले झाड तोडण्याचा अधिकार नाही. तो जागतिक गुन्हाच आहे. म्हणूनच इंग्लंडची पर्यावरण आणिबाणी आणि भारतवनसाठीचा लढा एकाच पातळीवरचा वाटतो...