फलनिष्पत्ती संघटित प्रयत्नांची

    दिनांक  08-May-2019   संघटित आणि दिशादर्शक प्रयत्न केल्यास यशप्राप्ती निश्चित होते, हे सार्वजनिक जीवनाचे तत्त्व आहे. याच तत्त्वाची अनुभूती नाशिक जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या रूपाने पाहावयास मिळाली. नुकतीच राष्ट्रीय आरोग्य अभियान उपक्रमाअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या राज्यस्तरीय 'कायाकल्प' पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेत नाशिक जिल्हा रुग्णालयाने प्रथम क्रमांक पटकावला. सलग दुसऱ्या वर्षी जिल्हा रुग्णालयाने प्रथम क्रमांकाचा हा मान संपादित केला आहे. यापूर्वी २०१५-१६ मध्ये जिल्हा रुग्णालयाने पहिला क्रमांक मिळवला होता. २०१७-१८ ला झालेल्या स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवणारे नाशिक जिल्हा रुग्णालय हे राज्यात नव्हे, तर देशातील पहिले रुग्णालय ठरले आहे. यानुसार नाशिक जिल्हा रुग्णालयाने ५० लाखांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही पटकावले आहे. यामध्ये रुग्णालय आवार, आतील भागातील स्वच्छता, निर्जंतुकीकरण, रुग्णांच्या बिछान्यांची स्वच्छता, उपलब्ध साधनांचा वापर, अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, रुग्णसेवा, बायोमेडिकलसह घन व द्रवरूप कचऱ्याची विल्हेवाट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व पाणीबचत, सांडपाण्याचा निचरा आदी बाबींचे समितीकडून सूक्ष्म परीक्षण करून पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. कमी मनुष्यबळ असूनही या रुग्णालयाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्युच्च दर्जाच्या सुविधा प्रदान करत हे यश संपादित केले आहे, हे विशेष. हे यश म्हणजे जिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर आणि कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नांची फलनिष्पत्ती आहे. जिल्हा रुग्णालये ही तेथील सेवा आणि रुग्ण मृत्यूदर यांमुळे कायमच टीकेची धनी होत असतात. मात्र, नाशिक जिल्हा रुग्णालयाने सलग दुसऱ्यांदा या सर्वांच्या पलीकडे जाऊन यश संपादित केल्याने ते नक्कीच अभिनंदनास पात्र ठरले आहेत. तर, कायाकल्प योजनेअंतर्गत उत्तेजनार्थ पारितोषिक हे जिल्ह्यातील कळवण, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, डांगसौंदाणे, घोटी, नांदगाव, वणी, लासलगाव, देवळा, निफाड, दाभाडी या रुग्णालयांना देण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक उत्तेजनार्थ ११ बक्षिसे पटकाविण्याचा मानदेखील नाशिक जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाला आहे. नाशिक जिल्ह्याचे हे उदाहरण निश्चितच देशातील इतर सरकारी रुग्णालयांसाठी प्रेरणादायी आहे, असे म्हटले वावगे ठरणार नाही.

 

आकड्यांचा अट्टाहास कशासाठी?

 

नुकताच सीबीएसई बोर्डाचा निकाल घोषित झाला. यावेळी महाराष्ट्राचा दहावीचा निकाल ९९ टक्के लागला. या परीक्षेत ५०० गुणांपैकी ४९९ गुण प्राप्त करून राज्यातील तब्बल १३ विद्यार्थी हे सामाईकपणे पहिल्या क्रमांकावर आले, तर ४९८ गुणांसह २५ तर ४९७ गुणांसह ५९ विद्यार्थी अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर उत्तीर्ण झाले आहेत. हे सांगण्याचे प्रयोजन इतकेच की, सुधारणेच्या उंबरठ्यावर असणारे शिक्षण अजूनही संख्येचे वर्तुळ भेदू शकले नाही, असेच या आकडेवारीवरून दिसून येते. 'शिक्षण' या तीन अक्षरी शब्दांत मानवाचे भविष्य सामावले आहे. याचा अर्थ शिक्षणातून ज्ञानप्राप्ती होणे. मात्र, आजमितीस शिक्षण म्हणजे प्रमाणपत्रावर १०० पैकी १०० येण्यासाठी केलेला अट्टाहास अशीच व्याख्या होताना दिसते. या निकालातून एका अभ्यासक्रमातून दुसऱ्या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी नंबरशिवाय पर्याय नाही, हाच संदेश मिळाला आहे काय, असे वाटते. यातील काही विद्यार्थ्यांनी आपले छंद जोपासत हे यश संपादन केले असण्याचीदेखील शक्यता आहे. मात्र, एकूण प्रविष्ठ असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत हे प्रमाण अगदीच कमी असण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनातील हे आकडे तत्पश्चात आयुष्यात किती कामास येतात? परीक्षार्थी हा परिवेषाभिमुख आणि ज्ञानार्थी असतो का? त्याची समायोजन साधण्याची दृष्टी विकसित होते का? यांचा विचार होणे आवश्यक आहे. याउलट परीक्षा आणि अभ्यासक्रम यांच्या माध्यमातून ज्ञानार्थी कसे निर्माण होतील, याकडे बालक, पालक आणि शिक्षक यांनी आजच्या आधुनिक काळात अवधान केंद्रित करण्याची गरज आहे. वर्तमान आणि भविष्य हे समायोजित वेळेला तुम्ही कसा प्रतिसाद देतात, यावर भर देणारे आहे आणि प्रतिसाद देण्याची क्षमता अंगी बाळगण्यासाठी व्यक्तिमत्त्वाचा चौफेर विकास आणि अष्टपैलूत्वाची आस धरणे खऱ्या अर्थाने आज आवश्यक आहे. यासाठी गुणांकनापेक्षा गुणवत्तेची कास धरणे, हेच खऱ्या अर्थाने शिक्षणाचे फलित असेल, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आकड्यांवर अवधान केंद्रित न करता इतर उपक्रमात सक्रिय राहून शिक्षण घेणे, हेच जीवनाचा पाया मजबूत करण्यासाठी आवश्यक आहे. हे आपण सर्वांनी समजून घेणे भारताच्या भावी पिढीसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat