चिनी देहव्यापाराचा ना‘पाक’ मार्ग

    दिनांक  07-May-2019   पाकिस्तानी मुलींना चीनमध्ये देहव्यापार करण्यासाठी पैशाचे, लग्नाचे आमिश दाखवून नेण्याचे प्रकार मध्यंतरी प्रचंड वाढले होते. काही पाकिस्तानी एजंटच्या माध्यमातून स्वस्तात पाकी मुलींची खरेदी केली जाते आणि त्यांना चीनमध्ये वेश्याव्यवसायात ढकलले जाते. यातील आणखी एक धक्कादायक प्रकार म्हणजे, या मुली मुस्लीम नाहीत, तर अल्पसंख्याक ख्रिश्चन समुदायातील मुलींना भक्ष्य बनविले जाते.पाकिस्तान-चीनची मैत्री म्हणजे ‘हमे हैं राही प्यार कें’ अशी, अगदी घनिष्ट आणि अरिष्ट आल्यावर एकमेकांच्या मदतीला धावून येणारी! कोणे एकेकाळी ‘हिंदी चिनी, भाई भाई’ असा नारा गुंजायचा, तर आता ‘पाकी चिनी, भाई भाई’ म्हणून दोन्ही देशांचे नेते आणि नागरिकही एकमेकांची स्तुती-प्रशंसा करताना दिसतात. खरंतर, ही मैत्री केवळ नामधारी. गरजेपुरतीच. पाकिस्तानला चिनी गुंतवणूक हवी, तर चीनला पाकिस्तानमार्गे ग्वादार बंदरातून थेट अरबी समुद्रात एंट्री. म्हणजे, ‘एक हात से दो, दुसरे हात से लो,’ असा हा सगळा व्यावसायिक मैत्रीचा आदर्श म्हणा हवं तर... पण, गेल्या काही दिवसांतील काही घटना बघितल्या, तर लक्षात येईल की, चीन-पाकिस्तानच्या या पाकी मैत्रीमध्ये मिठाचा खडा पडलेला दिसतो. त्यामागचं पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे, बेल्ट रोड परिषदेला चीनमध्ये दाखल झालेल्या पाकिस्तानच्या ‘वजीर-ए-आझम’च्या स्वागतासाठी केकियांग किंवा जिनपिंगने लाल पायघड्या तर अंथरल्या नाहीच, पण परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी नाही, तर चक्क एका उपमहापौराकडून इमरान खान यांचं स्वागत करण्यात आलं. साहजिकच, या अपमानास्पद वागणुकीनंतर पाकिस्तानी नागरिकांनी इमरान खानची ट्विटरवर लाज काढली, हे वेगळे सांगायला नको. दुसरी महत्त्वाची आणि अपेक्षित घटना म्हणजे मसूद अझहरची ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ म्हणून घोषणा, जी इतकी वर्षं चीनच्या विशेषाधिकारामुळे पाकिस्तानच्या पथ्यावर पडत होती. त्यामुळे आधीच आर्थिक दारिद्य्राच्या गर्तेत रुतलेल्या पाकिस्तानमध्ये सध्या काहीही आलबेल नाहीच. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानातून आलेल्या आणखी एका बातमीने या दोन्ही देशांचे संबंध अधिक ताणले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्या पाकिस्तानमध्ये मोठमोठ्या चिनी कंपन्यांचीही रस्ते, पूलबांधणी वगैरे कामं जोरात सुरू आहेत. मध्यंतरी या चिनी कामगारांवरही बलुची पथकांनी हल्ले केले होते. त्यामुळे सध्या चक्क पाकिस्तानी आणि चिनी सैन्यांच्या निगराणीत ही कामं कशीबशी सुरू आहेत. त्यातही चिनी कामगारांकडून कायदे पायदळी तुडवले जाणे, पाकिस्तानी कामगारांना-अधिकार्‍यांना न जुमानणे, महिलांची छेड काढणे असले प्रकार सुरूच आहेच. अशात पाकिस्तानमध्ये एका नव्या रॅकेटचा पदार्फाश झाला आहे. हे रॅकेट होते देहव्यापाराचे. पाकिस्तानी मुलींना चीनमध्ये देहव्यापार करण्यासाठी पैशाचे, लग्नाचे आमिश दाखवून नेण्याचे प्रकार मध्यंतरी प्रचंड वाढले होते. काही पाकिस्तानी एजंटच्या माध्यमातून स्वस्तात पाकी मुलींची खरेदी केली जाते आणि त्यांना चीनमध्ये वेश्याव्यवसायात ढकलले जाते. यातील आणखी एक धक्कादायक प्रकार म्हणजे, या मुली मुस्लीम नाहीत, तर अल्पसंख्याक ख्रिश्चन समुदायातील मुलींना भक्ष्य बनविले जाते. याच प्रयत्नात असणार्‍या आठ चिनी आणि चार पाकिस्तानी इसमांना नुकतीच अटक करण्यात आली आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला. देहव्यापाराचे हे रॅकेट उघडकीस येऊ नये म्हणून चक्क विवाह मंडळांच्या नावाखाली पाकिस्तान आणि चीनमध्ये हे विचित्र धंदे सुरू आहेत. म्हणजे, पाकिस्तानी मुलगी आणि चिनी मुलांचा विवाह लावून देण्याचे वरकरणी दाखवून द्यायचे आणि नंतर पाकिस्तानी वधुला चीनच्या देहव्यापाराच्या बाजारात ढकलून द्यायचे. एकदा का ती मुलगी चीनमध्ये आली की तिची सुटका होणे नाही.कारण, चीनसमोर पाकिस्तानी सरकारचे, अधिकार्‍यांचे, सैनिकांचे काही एक चालत नाही. व्यापारी मैत्रीच्या बोझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानला नुसते हतबल होऊन या परिस्थितीकडे दुर्लक्ष करावे लागते. त्याचबरोबर पाकिस्तानी मुलींला चीनमध्ये जबरदस्तीने नेऊन त्यांच्या अवयवांची तस्करी केली जात असल्याच्याही हृदयद्रावक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे महागाईच्या गाळात रुतलेल्या पाकिस्तानी जनतेचेही कंबरडे मोडले आहे. पाकिस्तानी मुलींच्या या बाजारीकरणाचे सध्या पेव फुटले असून त्यासाठी चीनसारखी दुसरी सुरक्षित बाजारपेठ नाही. शिवाय, हा एकटा चीनचा दोष नसून पाकिस्तानातील बेरोजगार, भरकटलेले तरुणही या रॅकेटमध्ये पैशाच्या आमिशापोटी आपल्याच देशातील मुलींचा सौदा करायलाही पुढेमागे बघत नाही. त्यातही आधी म्हटल्याप्रमाणे, मुस्लीम मुलींऐवजी ख्रिश्चन मुलींचे अपहरण करून, त्यांना चीनमध्ये वेश्याव्यवसायाच्या पाताळात ढकलण्याचे मानसिक क्रौर्य त्याहून भयंकर म्हणावे लागेल. त्यामुळे चीन आणि पाकिस्तानला मिळून यासारख्या अमानवीय गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा लागेल; अन्यथा पाकिस्तानचे आधीच बिघडलेले सामाजिक स्वास्थ्य अजून खालच्या पातळीवर जायला फारसा वेळ लागणार नाही, हे निश्चित.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat