ममतांची ठोकशाही

    दिनांक  07-May-2019   


लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही’ अशी लोकशाहीची व्याख्या केली जाते. ‘लोकशाही’ हे कल्याणकारी राज्य असून यामध्ये प्रत्येकाचे सन्मानपूर्वक हित साधले जाते. तिथे हिंसेला नाही, तर कायदेशीर तत्त्वांना मान्यता असते. संविधानावर लोकशाही चालत असल्यामुळे या लोकशाहीमध्ये कुणीही कुणावर हल्ला करणार नाही वगैरे वगैरे मत सामान्यपणे पापभिरू भारतीय नागरिकांची आहेत. पण, मग ‘लोकशाहीची थप्पड’ हे काय प्रकरण आहे बरं? “लोकशाही हे कल्याणकारी राज्य असून मी त्यांना लोकशाहीची जोरदार थप्पड मारणार आहे.” पण, ही ‘लोकशाहीची थप्पड’ काय असते? तेही हिटलरशाहीशी साधर्म्य सांगणार्‍या ममता बॅनर्जींनी असे म्हटल्यावर तर आणखीनच वाटते की, ही ‘लोकशाहीची थप्पड’ काय असते? ती काय असते, हे ममताच सांगू शकतील, हे मात्र नक्की. कारण, देशभर संविधानात्मक लोकशाही असताना ममता ज्या प. बंगालच्या मुख्यमंत्री आहेत, तिथे ममतांची हेकेखोरशाहीच चालली आहे. इथे लोकशाहीची ठोकशाही झाली आहे. ममतांची लोकशाही नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदच मानत नाही. वादळाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची मदतही ममतांना नको. हीच खरी ममतांची लोकशाही! संविधानात्मकरित्या पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या कानशिलात मारण्याची इच्छा बाळगणे हीच ममतांची दुष्ट आणि मूर्ख लोकशाही. ममता प. बंगालमधील हिंदू धर्मीयांची यथेच्छ मुस्कटदाबी करतात, हे सर्वज्ञात आहे. मुस्लीमधर्मीयांचे तुष्टीकरण करावे यासाठी नवरात्रीमध्ये देवीच्या मिरवणुकीची तारीख आणि वेळही बदलावी, अशी इच्छा असणार्‍या ममतांचे खरे रूप, खरी मानसिकता काय आहे, हे पुन्हा एकदा उघड झालेच आहे. कालपरवाच ‘जय श्रीराम’ शब्द ऐकून या निधर्मी मुख्यमंत्र्यांच्या तळपायाची शिर मस्तकात गेली. लोकशाहीमध्ये कोणताही जनप्रतिनिधी हा कोणत्याही एका धर्माचा, भाषेचा प्रतिनिधी नसतो. मात्र, ममता यांनी ही हद्दपार केली आहे. सत्ताप्राप्तीसाठी त्यांनी विशिष्ट लोकांचे लांगूलचालन कायम केले. ही ममता यांची लोकशाही. खरंतर ममता यांची लोकशाही म्हणजे ठोकशाहीच. त्यांच्या विचारांपेक्षा वेगळे विचार मांडणार्‍यांवर आज प. बंगालमध्ये खुलेआम हल्ले होत आहेत. त्यामधून नागरिक, राजकीय प्रतिनिधीही सुटले नाहीत. या पार्श्वभूमीवर ममता यांच्या लोकशाहीच्या थप्पडकडे पाहिले असता जाणवते की, या प. बंगालमध्ये सुरू असलेल्या झुंडशाही आणि हिंसेची पायवाट ही ममता यांच्या सत्तास्थानातून तर सुरू होत नसावी ना?

 

रिक्षापुराणाचे सुखद स्वप्न

 

सचोटीने आणि मदतीचा भाव ठेवून प्रवाशांची काळजी घेत त्यांना त्यांच्या इच्छितस्थळी सोडणारे असंख्य रिक्षाचालक आहेत, त्या सर्वांना प्रणामच! पण, तरीही समजा पावसाचे दिवस आहेत, पाणी साचले आहे, लोकल बंद झाल्यात किंवा उशिराने धावत आहेत, त्यातच बससेवाही अगतिक होत गोगलगाय झाली आहे, अशावेळी मुंबई उपनगरातले मुंबईकर नाईलाजाने रिक्षाकडे वळाले आहेत, असे दृश्य डोळ्यासमोर येताच मनात काय येईल? त्या अनुषंगाने प्रत्येकाने अनुभवलेला प्रसंग प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येईलच. तो म्हणजे, अशा पावसातल्या किंवा तशाच कुठल्याशा आणीबाणीच्या दिवसांत रिक्षाचालकांनी त्या खास दिवसाचा घेतलेला गैरफायदा, उकळलेले अवास्तव पैसे, वाहकाची मग्रुरी सारे सारे काही आठवते. दूरच्या स्थळाचेच प्रवासी नेणार किंवा शेअरिंग व्यवस्था असेल, तर प्रवाशांना अक्षरशः बॅगाबिगा किंवा वस्तू समजून कोंबून कोंबून बसवणारे रिक्षाचालकही हमखास आढळतात. एक ना अनेक रिक्षाचे अनुभव. असे जर अनुभव मांडण्याची वेळ आली, तर मुंबई उपनगरातील प्रवासी खंडच्या खंड लिहितील, यात शंकाच नाही. असो, तर हे रिक्षापुराण यासाठी की, गेल्या १ मार्चपासून परिवहन विभागाने महामुंबई क्षेत्रातील रिक्षाचालकांचे असे आततायी वर्तन थांबविण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. या कारवाईसाठी १४ भरारी पथके नेमली होती. या पथकात २८ मोटर वाहन निरीक्षक आणि साध्या वेशातील १४ कर्मचार्यांचा समावेश होता. हे कर्मचारी प्रवासी बनून रिक्षामध्ये बसत. त्यावेळी गुप्तपणे व्हिडिओ रेकार्डिंग केले जायचे. यामध्ये ५,५३४ रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये ३,३५१ रिक्षाचालकांकडे परवानाच नव्हता. याचाच अर्थ त्यांनी रिक्षा चालवण्याचे रीतसर प्रशिक्षण घेतलेले नव्हते. याचा अर्थ रिक्षामध्ये बसलेले प्रवासी रामभरोसे प्रवास करत होते. यामध्ये भाडे नाकारणे, जादा भाडे आकारणे, जादा प्रवासी बसवणे या निकषावरही रिक्षाचालकांवर कारवाई केली गेली. यामध्ये २,७२२ रिक्षाचालकांचे परवाना जप्त झाले, तर १७५ रिक्षा जप्त केल्या गेल्या. आता इतक्या मोठ्या प्रमाणावर कारवाई झाली म्हटल्यावर येणारा पावसाळा रिक्षातून प्रवास करणार्‍यांसाठी सुसह्य असेल असे समजूया का? की केवळ रिक्षापुराणाचे सुखद स्वप्नेच म्हणूयात?

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat