आंबेडकरी चळवळीचे नवे युवा पर्व : दलित युथ पँथर

    दिनांक  07-May-2019   
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शुद्ध भारतीयत्व आणि समाजभिमुखता घेऊनदलित युथ पँथर’ कार्य करीत आहे. डॉ. बाबासाहेबांना जो तरुण अभिप्रेत होता, तो तरुण, ती संघटना या ‘दलित युथ पँथर’च्या माध्यमातून उभी राहते आहे, असा आशावाद बाळगायला हरकत नाही.

अन्यायाच्या खोल जखमा, अत्याचाराचे शोषित जिव

दबलेल्या श्वासांच्या अस्पष्ट कहाण्या

नाते अमुचे त्यांच्याशी...बंध अमुचे त्यांच्याशी...

दलित युथ पँथर’ची संकल्पना ही अशीच काहीशी आहे. माणूस म्हणून जगणे हा आमचा हक्क आहे आणि म्हणून आम्ही चित्त्याचा पवित्रा घेऊन त्या हक्कांसाठी लढू, असे म्हणत १९७०च्या दशकात दलित-शोषित जनतेसाठी आवाज उठवणारी ‘दलित पँथर’ तशी सगळ्यांना परिचित. या पार्श्वभूमीवर ‘दलित युथ पँथर’ म्हणजे या ‘दलित पँथर’ची ‘युवा शाखा’ असेल काय असे वाटू शकते. पण, ते तितकेसे संयुक्तिक नाही. या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आणि प्रवक्ते निलेश मोहिते म्हणतात, “दलितांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी आक्रमक संघटना म्हणून ‘दलित पँथर’ची निर्मिती झाली. चळवळीला एका उच्च स्थानावर नेऊन ठेवण्याचे कामही संघटनेने केले. पण, कालांतराने तिची शकले झाली. आज दलितांच्या, शोषित पीडितांच्या नावाने राजकारण करणारे अनेक नेते तयार झाले. पण समाजाचे प्रश्न सुटले नाहीत. याला कारण काय असावे, तर युवा वर्ग त्यातही शिक्षित युवा वर्गाची या चळवळीशी नाळ जुळलेली नव्हती. त्यामुळे ‘दलित पँथर’च्या विचारांशी संयुक्तिक मात्र आजच्या वास्तवतेला अनुसरून युवकांचे एकत्रिकरण होणे आवश्यक होते. या अनुषंगाने निर्माण झालेली संघटना आहे, ‘दलित युवा पँथर.’
  

या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भाई जाधव यांचे म्हणणे आहे की, “आजपर्यंत दलित आणि इतरही समाजातला युवा वर्ग मोर्चे आणि आंदोलने यामध्येच गुरफुटून गेला आहे. या सगळ्यामध्ये त्या युवकाचे किंवा त्याच्या कुटुंबाचे काय होते? या युवकांना योग्य मार्गदर्शन, दिशा मिळाली, तर त्यांची ऊर्जा निश्चित त्यांच्या कुटुंबाच्या, समाजाच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल.” भाई जाधव आणि निलेश मोहिते दोघेही उच्चशिक्षित युवक. ठाण्याला राहणारे भाई अभियांत्रिकी शिक्षण घेतलेले, तर निलेश यांनी एमबीए पूर्ण केलेले. दोघांच्या संपर्कात विभिन्न समाजाचे, विभिन्न स्तरातले युवक-युवती. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये युवकांचे प्रश्न, मनस्थिती आणि त्यांचे एकंदर वास्तव याबाबत दोघांचाही अभ्यास पक्का. त्यातही भाई जाधव यांच्या घरी आंबेडकरी चळवळीचे एक जबरदस्त वातावरण. त्यांचे आजोबा चवदार तळ्याच्या सत्याग्रहामध्ये सहभागी झालेले. त्यामुळे बाबासाहेबांच्या सामाजिक संघर्षाचा वारसा भाईंमध्ये आपसूक उतरलेला.

निलेश हे मूळ रायगड जिल्ह्यातले. ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या निलेश यांनी समाजातली भावकी जवळून पाहिलेली. निलेश सांगतात गावात असताना बौद्धजन पंचायत आणि बौद्ध महासभा या समाजातील दोन संघटनांचे कार्य जवळून पाहिलेले. पण इथेही काही लोक या संघटनांच्या उदात्त कार्याला डावलण्याचा प्रयत्न करत होती, वैयक्तिक हेवेदावे काढीत होती. त्यामुळे समाजाच्या प्रगतीला खिळ बसे. त्यामुळे २०१२ साली मी घोसाळे गावातील या दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांचे एकत्रितकरण करून बौद्धसमाज सेवासंघ स्थापन केला. हेतू हा की, दोन्ही संघटनांमधिल कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन समाजासाठी काम करावे. पुढे याच प्रकारे बौद्ध युवासंघ रायगडही स्थापन केला. ही संघटना संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी काम करते. याप्रकारे भाई जाधव आणि निलेश या दोघांनाही समाजकार्याची मुळातच आवड. समाजाचे प्रश्न मुळापासून काय आहेत, याचेही त्यांना ज्ञान. या दोघांची भेट एका कार्यक्रमात झाली. तेथूनच त्यांची मैत्री झाली. ती मैत्री पुढे समाजासाठी एकत्रितरीत्या काम करू या संकल्पनेत सिद्ध झाली.

त्यातूनच मग २०१४ साली स्थापन झाली संघटना ‘दलित युवा पँथर.’ तसे बघायला गेले, तर या दोघांचेही म्हणणे आहे की, इथे ‘दलित’ हा शब्द जातीवाचक म्हणून वापरलेला नाही. ‘दलित’ हा शब्द जात-धर्म-वंश-लिंग यामध्ये भेद न करता व्यक्तीच्या आर्थिक स्तरावरील भेदावर आधारित आहे. असे जरी असले तरी, इथे मार्क्सचा वर्गवाद या संघटनेला अपेक्षित नाही. कारण, या संघटनेच्या मते, जो ‘आंबेडकरवादी’ आहे तो ‘मार्क्सवादी’ असूच शकत नाही आणि जो ‘मार्क्सवादी’ आहे तो ‘आंबेडकरवादी’ असूच शकत नाही. या संघटनेच्या मते, बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा समाज हा बुद्धाच्या शांतीचा, समानतेचा आणि मानवी न्यायाचा विचार करतो. त्यामुळे रक्तरंजित क्रांतीवर आणि हिंसेवर विश्वास असलेल्या मार्क्सवादावर किंवा त्याहीपुढे जाऊन नक्षलवादावर बाबासाहेबांना मानणार्‍या समाजाचा विश्वास नाही. समाजात बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने त्यांच्या विचारांचे वेगळ्याच प्रकारे प्रस्तुतीकरण केले जाते. यावरही या संघटनेचा आक्षेप आहे. या संघटनेचे म्हणणे आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रपुरुष आहेत. त्यांना एका जातीच्या कुंपणात बंद करू नये. त्यामुळे दुसर्‍या कोणाचे नाही, तर प्रत्यक्ष बाबासाहेबांचा आपण अपमान करत आहोत.

अर्थात, या संघटनेचे विचार हे कोणत्याही समाजभान आणि संवेदनशील व्यक्ती आणि संघटनेचे विचार आहेत हे नक्कीच. या पार्श्वभूमीवर ‘दलित युवा पँथरसंघटनेचा एक स्तुत्य उपक्रम आहे आणि तो म्हणजे वस्तीपातळीवर जाऊन डॉ. बाबसाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नेते नव्हते, तर जागतिक दर्जाचे श्रेष्ठ पुरुष आणि या देशाचे राष्ट्रपुरुष आहेत यावर आधारित कार्यक्रम करणे. यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर सत्याग्रह, चवदार तळ्याचा सत्याग्रह केलाच, पण त्याचबरोबर भाकरा-नांगल धरणामागे डॉ. बाबासाहेबांची दूरदृष्टी होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित-पीडित समाजाचा विचार केलाच, पण त्याचबरोबर देशातील इतर समाजातील स्त्रिया, युवा आणि एकंदर भारतीय नागरिकांच्या प्रश्नाचाही विचार केला होता. बाबासाहेबांची काश्मीर, पाकिस्तान याबद्दल विशिष्ट भूमिका होती. ते निष्ठावान राष्ट्रप्रेमी होते. त्यांचे आर्थिक विचार, देशाच्या सुरक्षिततेबाबतचे विचारही जागतिक पातळीवर महानच होते. या सर्व बाबींचा ऊहापोह करून कार्यक्रम राबवला जातो. संवेदनशील वस्त्यांमध्ये या सर्व गोष्टींशी संबंधित असलेली चित्रप्रदर्शनेही आयोजित केली जातात, व्याख्याने आयोजित केली जातात.

आपण पाहिले की, देशात अशा घटना घडल्या आहेत की, ज्यामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना केली गेली. त्याचे पडसादही उमटले. यावरही ‘दलित युवा पँथर’ काम करत आहे. पण त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. संघटनेचे म्हणणे आणि उद्देश आहे की, पुतळ्याची विटबंना झाल्यावर बंद, मोर्चे, आंदोलने करण्यापेक्षा अशा घटना होऊच नये, यासाठी विधायक कामे केली पाहिजे. हे विधायक कामे म्हणजे बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटबंना करणार्‍यांची मानसिकता बदलायला हवी. त्यासाठी बाबासाहेबांचे खरे विचार आणि स्वरूप वस्तीपातळीवर शुद्ध स्वरूपात पोहोचवायला हवेत. बाबासाहेबांचे समता, न्याय आणि बंधुतेला अनुसरून असलेले राष्ट्रप्रेमी विचार आणि स्वरूप जाणणारा कोणीही बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा विचारही करणार नाही.

संघटनेची कामे जशी वैचारिक आहेत तशीच ती प्रत्यक्षदर्शीसुद्धा आहेत. महाराष्ट्रात कुठेही सामाजिक आणि आर्थिकस्तरावर अन्याय, अत्याचार झाला, तर या संघटनेचे पदाधिकारी कोणी बोलावले नसले तरी, स्वत:हून तिथे जातीने हजर राहतात आणि अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवत पीडितांना न्याय मिळवून देण्याचे काम करतात. हे सगळे करत असताना या संघटनेचे युवक स्वत:ची पदरमोड करत असतात. जागतिकीकरणाच्या उंबरठ्यावर देशात बेरोजगारी वाढली आहे. या बेरोजगारीच्या विषम अंतरामुळे सरकारी आणि खाजगी क्षेत्रातही अन्याय होत असतो. त्यामुळे तरुणांना नोकरी मिळवून देणे, हेसुद्धा या संघटनेचे प्रभावी काम आहे. निलेश संघटनेच्या कामाबद्दल सांगताना म्हणाले की, “२०१७ साली मुंबई महानगरपालिकेची भरती झाली होती. १ हजार, ३८८ लोकांनी ही परीक्षा दिली होती. पण या परीक्षेची प्रश्नपत्रिका अवघड होती आणि इतरही कारणांमुळे या परीक्षेचा निकाल रद्द करावा की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, ही भरतीप्रक्रिया सुरू व्हावी म्हणून ‘दलित युथ पँथर’ने एक समांतर चळवळ उभी केली. आंदोलन, बैठका, पत्रव्यव्हार याद्वारे दबावतंत्र उभे केले. आज ती भरतीप्रक्रिया पूर्ण झाली आणि १ हजार, ३८८ लोकांचीही त्यात भरती झाली. ‘फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’च्या १८४ सुरक्षारक्षकांचा प्रश्न तसेच पुणे परिवर्तन महामंडळातील १ हजार, ५२२ होमगार्डस भरतीचा प्रश्न ‘थायसन ग्रुप कंपनी’ किंवा ‘नवभारत प्रेस’मधील कामगारांचा प्रश्न या सर्वांमध्ये ‘दलित युथ पँथर’ने महत्त्वाची भूमिका निभावली.”

भाई जाधव म्हणाले की, “आमचे या देशावर आणि संविधानावर प्रेम आहे. संविधानाच्या आदेशानुसार सरकार स्थापन होते. ते सरकार कोणाचेही असो, पण ते असते संविधानावर चालणारे. त्यामुळे या सरकारचे दायित्व आमच्यावर आणि आमचे दायित्व सरकारवर असणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारी विविध योजना आणि प्रकल्प यांचा अभ्यास करून त्या कशा लोकाभिमुख होतील, यावरही आमचे काम चालते.” या संघटनेचे दक्षिण जिल्ह्याचे अध्यक्ष प्रितम साळवी हे म्हणाले की, “मुद्रा लोन, स्टार्ट अप योजना किंवा सरकारच्या आरोग्यविषयक योजना यांचा समाजासाठी काय उपयोग होतो, हे पाहताना यामध्ये थोडा बदल होणे आवश्यक आहे. लोकांच्या गरजेचा आणि परिस्थितीचा विचार यामध्ये होणे आवश्यक आहे. लोकांमध्ये उपयोगात आणताना या योजना कशा विस्तारित होतील, यादृष्टीनेही आम्ही काम करतो.”

संघटनेच्यावतीने २०१८पासून ‘दलित पँथर दिन’ २९ मेला साजरा केला जातो. या दिवशी चैत्यभूमी येथे सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये सामाजिक कार्यात तसेच साहित्यामध्ये भरीव कामगिरी करणार्‍या व्यक्तींचा सन्मान केला जातो. यंदाही २९ मे रोजी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने ‘दलित पँथर वर्धापन दिन विशेषांक’ही तयार करण्यात येत आहे. या अंकामध्ये समाजाला स्पर्श करणार्‍या सर्वच आयामांचा मागोवा घेण्यात आला आहे. ‘दलित युथ पँथर’ची महिला शाखाही आहे. या महिला शाखेच्या अध्यक्षा आहेत. समाजामध्ये महिलांना योग्य ते स्थान मिळवून देणे आणि त्यांचे सबलीकरण करणे यामध्ये ही शाखा कार्यरत आहे. ‘दलित युथ पँथर’चे कार्य आजच्या घडीला संयुक्तिकच आहे. जगातील कोणतीही व्यक्ती समता, न्याय आणि बंधुता या तत्त्वांना मानत असेल, तर ती ‘बुद्धवादी’ आहे, तिचा धर्म आणि तिची जात माणुसकी आहे, असे मानणार्‍या संघटनेला समाजात स्थान मिळेल हे नक्की.

9594969638 संपर्क

निलेश मोहिते- 7208009284

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat