राज्यातील आदर्श आचारसंहिता शिथिल

    दिनांक  06-May-2019



मुंबई : दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी राज्यातील आदर्श आचारसंहिता शिथिल करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदर्श आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी केली होती. यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल करत राज्य सरकारला दुष्काळग्रस्त भागात उपायोजना करण्यास परवानगी दिली आहे.

 

राज्यातील अनेक भागांत दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून प्रशासनाकडून यासंदर्भात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीत अडचणी येत होत्या. राज्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे संबंधित कामांसाठी आचारसंहिता शिथिल करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात एका पत्राद्वारे आयोगाकडे केली होती. व्यापक लोकहिताचा विचार करून या मागणीस मान्यता दिल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे.

 

दुष्काळ निवारणाची कामे करण्यास आपली हरकत नसल्याचे आयोगाने कळविल्याने दुष्काळ निवारणासंदर्भात मंत्रिमंडळ सदस्यांना दौरे काढता येणार आहेत. तसेच मतमोजणी प्रक्रियेत समावेश असलेल्या मनुष्यबळाव्यतिरिक्त इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांना मंत्र्यांच्या दौऱ्यात सहभागी होता येणार आहे. त्याचप्रमाणे आढावा बैठका घेऊन उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासनास आदेश देता येणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat