आता आर. के. स्टुडिओजची मालकी गोदरेजकडे

    दिनांक  06-May-2019



मुंबई : ५०च्या दक्षकापासून दर्जेदार हिंदी चित्रपटांचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या आर. के. स्टुडिओज या ऐतिहासिक वास्तूची जागा गोदरेज प्रॉपर्टीजने खरेदी केल्याची अधिकृत घोषणा नुकतीच केली. येत्या काळात आर.के. स्टुडिओच्या ३३ हजार वर्गमीटर क्षेत्रात आधुनिक निवासी इमारती बांधण्यात येतील, अशी माहिती गोदरेज प्रॉपर्टीजने दिली. रणधीर कपूर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. आर के स्टुडिओच्या जागेवर नवीन बांधकाम करण्यासाठी आम्ही गोदरेज प्रॉपर्टीज कंपनीला निवडले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात या स्टुडिओच्या स्टेज नंबर १ वर सुपर डान्सरया डान्स रिअ‍ॅलिटी शोचा सेट उभारण्यात आला होता. त्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. काहीच क्षणात स्टुडिओच्या अन्य भागांत ही आग पसरल्याने अनेक जुन्या आठवणी क्षणात नष्ट झाल्या होत्या. ऋषी कपूर यांनी याबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले होते. यानंतर काहीच महिन्यांत हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय कपूर कुटुंबाने घेतला होता. "आर.के. स्टुडिओला लागलेल्या भीषण आगीनंतर स्टुडिओचे आणि त्यात संग्रहित केलेल्या स्मृतींचेही अतोनात नुकसान झाले. आता तो पुन्हा उभा करणे शक्य नाही. त्यामुळे स्टुडिओ विकणे योग्य ठरेल, असा निर्णय आम्ही सर्वानुमते घेण्यात आला आहे." असे ऋषी कपूर यांनी स्पष्ट केले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat