भारताच्या हवामान खात्याचे संयुक्त राष्ट्राकडून कौतुक

06 May 2019 12:53:13



नवी दिल्ली : विनाशकारी फनीचक्रीवादळाने गेल्या आठवड्यात ओडिशाच्या सागरी किनारपट्टीला जोरदार धडक दिली. या वादळामुळे माजलेल्या हाहाकारामुळे जवळपास एक कोटी नागरिकांचे स्थलांतर करावे लागले. मात्र, हवामान खात्याचा अचूक अंदाज व ओडिशा सरकार आणि प्रशासन वेळीच सतर्क राहिल्याने मोठी हानी टळली आहे. फनीचक्रीवादळासंदर्भात अगदी अचूक अंदाज वर्तवल्याबद्दल भारतीय हवामान खात्याचा संयुक्त राष्ट्राने गौरव केला आहे.

फनीचक्रीवादळ जमिनीवर नेमकं कुठे धडकणार, किती वाजता धडकणार, त्याची तीव्रता काय असणार, दिशा काय असणार याचा अगदी बरोबर अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यामुळे सुमारे १० लाख लोकांना वेळेत सुरक्षित स्थानी हलवण्यात आले. रेल्वे आणि विमान सेवांनी या अंदाजानुसार आपल्या वेळापत्रकात बदल केले. त्यामुळे प्रवासी अडकून पडण्याच्या घटना फारशा घडल्या नाहीत आणि मोठे अपघातही वाचले. या वादळाचे गांभीर्य लक्षात घेता यात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या कमी आहे. 


यापूर्वी दहा हजार नागरिकांनी गमावला जीव

यापूर्वी झालेल्या अशा वादळामुळे दहा हजारहून अधिक लोकांचे जीव गेले होते. या वादळामुळे दळणवळण यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झाली. मात्र, भारतीय हवामान विभागाने विकसित केलेल्या प्रादेशिक वादळ प्रणालीने मोठे नुकसान रोखण्यासाठी मदत केली. यावरून या विभागाने हेच दाखवून दिले की, १९९९ च्या वादळानंतर हवामान खाते अशा वादळावर लक्ष ठेवण्यासाठी किती दक्ष आहे.

महानायकाचे मदतीचे आवाहन

ओडिशातील स्थलांतरितांना आता देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. यात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही मदत जाहीर केली. अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. वादळाचा फटका बसलेल्या नागरिकांसाठी अमिताभ बच्चन यांनी मदत जाहीर केली असून इतरांनाही मदत करण्याचे अवाहन केले आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी एक कविताही पोस्ट केली आहे. त्या कवितेतून न खचण्याचा संदेश त्यांनी दिला आहे. ‘चाहे जितना भी हो प्रचंड तूफ़ान हर तूफ़ान से लड़ेंगे हम, न अकेले तुमको छोड़ा था, न अकेले कभी छोड़ेंगे हम, जो घर उजड़ गए, उन्हें फिर से बसायेंगे हम, हर चोट पर मरहम लगाएंगे हम’, असा संदेश अमिताभ यांनी या कवितेतून दिला आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0