होमियोपॅथीक तपासणी केस टेकिंग भाग-१७

    दिनांक  06-May-2019रुग्ण कसा बघतो, त्याची तक्रारी सांगताना होणारी डोळ्याची हालचाल फार महत्त्वाची ठरते. कारण, असे म्हटले जाते की, डोळे हे कधीही खोटे बोलत नाहीत. म्हणूनच डोळ्यातील भाव जाणण्याचे कौशल्य चिकित्सकाला आत्मसात करावे लागते.


होमियोपॅथीक चिकित्सेमध्ये रुग्णाची माहिती घेत असताना निरीक्षण करणे आणि कोणताही पूर्वग्रह न ठेवता निरीक्षण करणे महत्त्वाचे ठरते. चिकित्सकाने रुग्णाच्या इतरांपासून त्याला वेगळ्या ठरवणाऱ्या गोष्टी बघाव्यात आणि त्यांचे निरीक्षण करावे. उदा. केसटेकिंगमधील ‘निरीक्षण’ सुरू होते ते अपॉईंटमेंटसाठी आलेल्या फोनबरोबरच. जेव्हा रुग्ण अपॉईंटमेंट घेण्याकरिता फोन करतो, तेव्हा एखादा रुग्ण म्हणतो, “डॉक्टर, कृपया तुमच्या सवडीनुसार तुमची अपॉईंटमेंट द्या.” दुसरा एखादा रुग्ण म्हणतो, “डॉक्टर, मला तुमची आत्ताच्या आत्ता अपॉईंटमेंट हवी आहे. मी येतो.” आता आपण पाहिले की, दोन्ही रुग्णांना डॉक्टरचा वेळ हवा आहे. पण, दोघांचीही वागण्याची-बोलण्याची पद्धत वेगळी आहे. ही पद्धत म्हणजेच त्यांचे वैयक्तिक गुणधर्म. हे गुणधर्म त्यांचे स्वत:चेच असतात. ते थेट चैतन्यशक्तीकडून आलेले असतात. त्यामुळे या लक्षणांना फार महत्त्व असते. कारण, होमियोपॅथी केवळ आजाराला बरे करत नाही, तर आजारी माणसालासुद्धा बरे करते. पुढील निरीक्षण हे रुग्ण कशाप्रकारे वावरतो, कसा दिसतो, कसे कपडे घालतो, कसा बसतो याद्वारेच करायचे असते. उदा. रुग्ण टापटीप कपडे घालून आला असेल किंवा केशरचना अतिशय नीटनेटकी असेल, तर त्याचे व्यक्तिमत्त्व कसे आहे, याची कल्पना येते. त्याचप्रमाणे एखादा रुग्ण गबाळ्यासारखा येतो, त्यावरून त्याचे व्यक्तिमत्त्व कळते. त्याचप्रमाणे वेळेवर येणारे रुग्ण, वेळ न पाळणारे रुग्ण हे पाहणेसुद्धा महत्त्वाचे निरीक्षण असते. काही रुग्णांना दवाखान्याच्या प्रतीक्षा कक्षात अजिबात बसायचे नसते. जरा बसायला लागले, प्रतीक्षा करावी लागली, तर त्यांची तगमग सुरू होते. ते सतत डॉक्टरांच्या चिकित्सा कक्षात डोकावत राहतात किंवा डॉक्टरना फोन वा मेसेज करत राहतात.

 

प्रतीक्षा कक्षातील त्यांचा अस्वस्थपणा हेसुद्धा एक महत्त्वाचे निरीक्षण असते. पुढे रुग्ण डॉक्टरांच्या समोर कसा बसतो, हेसुद्धा पाहणे महत्त्वाचे असते. उदा. काही रुग्ण डॉक्टरांच्या जवळ खुर्ची ओढून बसण्याचा प्रयत्न करतात, तर काही रुग्ण खुर्चीच्या अगदी अग्रस्थानी बसतात, काही रुग्ण तर स्वत:च्या घरी किंवा हॉटेलमध्ये बसल्यासारखे हातपाय ताणून आरामात बसतात. काही रुग्ण अतिशय अवघडून बसतात, तर काही रुग्ण शांत बसतात. काही रुग्ण सतत काहीतरी हालचाल करत राहतात, तर काही रुग्ण तर चक्क उभेच राहतात. या व अशा अनेक प्रकारच्या पद्धती या त्या रुग्णाच्या वैयक्तिक (individual) असतात व त्यामुळे त्या रुग्णाची मानसिकता व स्थिती समजण्यास डॉक्टरना मदत होते. हे सर्व निरीक्षण हे रुग्णाच्या नकळतच होत असल्यामुळे रुग्णाला ते कळत नाही व स्वत:च्या चेहऱ्यावर त्याला खोटा मुखवटा लावता येत नाही. थोडक्यात काय, तर केसटेकिंग करत असताना रुग्णाचे निरीक्षण करणे हा प्रमुख गाभा आहे, ज्यामुळे त्याची मूळ स्थिती कळण्यात मदत होते. निरीक्षणामधील पुढील निरीक्षण म्हणजे रुग्णाच्या डोळ्यांची हालचाल. रुग्ण कसा बघतो, त्याची तक्रारी सांगताना होणारी डोळ्याची हालचाल फार महत्त्वाची ठरते. कारण, असे म्हटले जाते की, डोळे हे कधीही खोटे बोलत नाहीत. म्हणूनच डोळ्यातील भाव जाणण्याचे कौशल्य चिकित्सकाला आत्मसात करावे लागते. खरोखर ‘केसटेकिंग’ ही एक कला आहे. या कलेच्या अन्य कंगोऱ्यांबद्दल आपण पुढील भागात अजून माहिती घेऊया.

 

- डॉ. मंदार पाटकर

(लेखक एम.डी होमियोपॅथी आहेत.)

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat