अंतकाळीचे कोणी नाही...

    दिनांक  06-May-2019दुसऱ्याला तुच्छ मानणारी ही मंडळी न्यायालयातील न्यायधीश नाहीत किंवा देवस्वरूप नाहीत. म्हणूनच 'जग हे सुखाचे, दिल्या-घेतल्याचे बा अंतकाळीचे कोणी नाही' या संत तुकारामांच्या उक्तीप्रमाणे आपण दुसऱ्याचे व्यर्थ अवडंबर आपल्याआयुष्यात माजवू नये हे खरे. वास्तवाची कास कधी सोडू नये.


'विधायक आयुष्य' लाभणे ही आयुष्याला मिळालेली सर्वात सुंदर भेट आहे. अशावेळी तुम्ही स्वत: जसे आहात तसेच जगा. 'Be yourself' या 'तत्त्वज्ञाना'प्रमाणे आपल्याला जगता आले, तर ती एक अमूल्य भेट नक्कीच असेल. 'स्वत: ओळखा' या तत्त्वज्ञानाला आयुष्यात अंमलात आणणे ही एक विलक्षण कला आहे. आपण कोणाला आवडतो, कोणाला आवडत नाही, आपल्याबद्दल कोण प्रेमाने बोलेल, कोण दुष्टपणाने बोलेल, आपल्यावर कोण प्रेम करील, कोण आपला तिरस्कार करील, या गोष्टी आपल्या हातात नाहीत. आपल्यावर कोण अन्याय करील वा कोण आपल्याला न्याय देईल, कठीण परिस्थितीत कोण कधी आपल्याला झिडकारेल वा कोणाचा आधार आपल्याला मिळेल, याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. आपल्यामागे कोण आपली स्तुती करीत असेल व कोण निंदानालस्ती करत असेल, याचा आपल्याला कधीच अंदाज नसतो. खरे सांगायचे, तर दुसरी कुठलीही व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करीत असेल, आपल्याशी कशी वागेल, यावर आपण ताबा ठेवू शकत नाही. हे सत्य आपल्याला जेवढ्या लवकर लक्षात येईल, तेवढा आपला ऐहिक शहाणपणा वाढेल.

 

आपण आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे इतरांना खूश ठेवण्यासाठी, त्यांची मर्जी सांभाळण्यासाठी घालवत असतो. या सर्व सगेसोयऱ्यांची मर्जी सांभाळता सांभाळता आपल्याला आपल्या 'मर्जी'चे सोयरसुतकसुद्धा नसते. या लोकांनी आपल्यामधील 'चांगले' ओळखावे, यासाठी आपण आटोकाट प्रयत्न करत असतो. आपल्याला सुंदर दिसायचे असते, 'स्मार्ट' व्हायचे असते, वजन काबूत ठेवायचे असते, चांगले वागायचे असते, यशस्वी व्हायचे असते वा श्रीमंत व्हायचे असते, यापलीकडे जाऊन लोकांना आपल्याबद्दल जे जे योग्य वाटते ते ते सगळे करायचे असते. या सगळ्या अथांग व अवघड प्रयत्नांनंतरसुद्धा इतर मंडळी खूश दिसत नाहीत. कोणीतरी येऊन आपण कसे कमी पडलो हे आवर्जून सांगतोच. आपण सगळ्यांच्या आपल्याबद्दलच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या गारुडात पूर्ण फसलेले असतो. अशा वेळी आपल्याबद्दलच्या इतरांच्या नकारात्मक दृष्टिकोनामुळे आपले मानसिक खच्चीकरण होते. आपला आत्मविश्वास ढासळतो. दुसरे आपल्याबद्दल जे काही वाईटसाईट बोलतात, त्यावर आपला विश्वास बसतो. आपण स्वत:ला मनापासून निरखायला हवे. स्वत:ची कुवत व पत स्वत:च ठरवायला हवी, जेणेकरुन स्वत:ची खरी, सत्य प्रतिमा आपल्याला समजू शकेल.

 

जग आपले मूल्यमापन कसे करते, यापेक्षा आपण आपल्याला किती जाणतो हे खूप महत्त्वाचे आहे. सॉक्रेटिस या जगप्रसिद्ध तत्त्ववेत्याने म्हटले आहे की, 'To know thyself is the beginning of wisdom.' 'स्वत:ला ओळखण्याची प्रक्रिया' हे प्रजेचे लक्षण आहे. आपले व्यक्तिमत्त्व, स्वभाववृत्ती आणि एकूणच अस्तित्व जर दुसऱ्यांनी ठरविले, तर माणूस 'आपण कोण आहोत'हे समजून घेण्याची क्षमता गमावून बसेल. स्वत:चा आनंद अनुभवण्याची शक्ती माणूस का गमावतो, याची अनेक कारणे आहेत. यातील एक अतिशय महत्त्वाचे कारण म्हणजे दुसऱ्याच्या हातात आपला आनंद अनुभवण्याचे सामर्थ्य देणे. ही दुसरी माणसं खोडसाळ मते व्यक्त करतात. काहीही अभिप्राय देतात. त्यातील सत्यता न पडताळता आपण वाहत जातो, तेव्हा आपली आत्मनिरीक्षण करण्याची, अंतर्मुख होण्याची क्षमता ढासळायला लागते. अशावेळी माणसाचा स्वत:मधील आत्मविश्वास कमी होतो, स्वाभिमानही कमी होतो.

 

या जगात अशी अनेक माणसे आहेत की, ज्यांना दुसऱ्यांमध्ये ते कसे अपूर्ण आहेत, त्यांच्यात किती कमतरता आहेत, हे सांगण्यात संतोष मिळतो. ही मंडळी असे का करतात? कारण, त्यांच्यातच अनेक गोष्टींची कमतरता असते. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना यश मिळालेले नसते. त्यांच्यात स्वत:च्या अस्तित्वाबद्दल असुरक्षिततेची तीव्र भावना असते. ही मंडळी सर्वसामान्यपणे अतृप्त असतात. अशावेळी इतरांना आपल्या खेदजनक व्यथेत ओढल्यावर त्यांना कुठेतरी तृप्त वाटते. ही तृप्ती अर्थात नकली असते, मिथ्या असते. पण, आपण लक्षात घ्यायला पाहिजे की, दुसऱ्याला तुच्छ मानणारी ही मंडळी न्यायालयातील न्यायधीश नाहीत किंवा देवस्वरूप नाहीत. म्हणूनच 'जग हे सुखाचे, दिल्या-घेतल्याचे बा अंतकाळीचे कोणी नाही' या संत तुकारामांच्या उक्तीप्रमाणे आपण दुसऱ्याचे व्यर्थ अवडंबर आपल्याआयुष्यात माजवू नये हे खरे. वास्तवाची कास कधी सोडू नये.

 

- डॉ. शुभांगी पारकर

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat