‘सुयश’कार सुभाष

    दिनांक  06-May-2019   


 

जातीमुळे नव्हे, तर क्षमतेमुळे आयुष्य यशस्वी होते आणि सवलतीमुळे नाही, तर नीती, स्वावलंबनामुळे यश मिळते, असा संदेश देणारे यशस्वी उद्योजक सुभाष चाफेकर.


‘नोटाबंदी’ आणि ‘जीएसटी’ लागू झाल्यानंतरही उद्योजक सुभाष चाफेकरांना चिंता भेडसावली नाही. कारण, त्यांनी व्यवहारात सचोटी आणि पारदर्शकता ठेवली होती. सुभाष चाफेकर हे ‘सुयश इंजिनिअरिंग प्रा. लि.चे सर्वेसर्वा. “सुरुवातीपासूनच स्वकष्टाने मिळवलेल्या संपत्तीचे तुम्ही विश्वस्त आहात, मालक नाही. त्या संपत्तीचा विनिमय स्वहितासोबतच समाजहितासाठी केलाच पाहिजे,” असा चाफेकर यांच्या ‘सुयशा’चा मंत्र आणि तेच त्यांच्या जगण्याचे सूत्र. सुभाष यांनी स्वत:च्या आयुष्याला घडवताना समाजहित आणि देशभानही जपले. “कष्ट करा, कष्ट केल्याशिवाय मिळणारे काहीही अर्थहीन असते. त्याची लालसा अजिबात नको,” असा स्वच्छ विचार असणारे सुभाष. त्यांच्या आयुष्यावर, कर्तृत्वावर सचोटीचे संस्कार रूजले. कारण, ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी.’ सुभाष यांचे वडील यशवंत आणि आई सत्यभामा. हे दोघेही नीती जपणारे आणि पापभीरू प्रवृत्तीचे. त्यामुळे त्यांच्या मुलांवरही तेच संस्कार झाले. सुभाष सांगतात, “बाबा सकाळी ५ वाजता कामानिमित्त घरातून बाहेर पडत. त्यापूर्वी माहीत नाही किती वाजता उठत असतील? पण, बाबा ५ वाजता घरातून निघताना आईने त्यांच्यासाठी भाजीपोळी तयार केलेली असे. घरातली कामे आटोपलेली असत. बाबा पहाटे ५ वाजता लोअर परळहून कुर्ल्याला जात. तिथे ते दुपारी ३ वाजेपर्यंत काम करत. त्यानंतर दादरला जात. तिथे त्यांची एक छोटीशी पत्र्याची शेड होती. तिथे ते स्वत:चे डायमेकिंगचे काम करत. तेथून ते रात्री ११ वाजता घरी येत. इतके कष्ट करूनही त्यांना कधीही त्रासलेले पाहिले नाही. उलट घरात येणारा कोणीही विन्मुख जाऊ नये असेच त्यांचे प्रयत्न असत. शिवाय, दिलेले कधी परत मागायचे नाही, असा त्यांचा नियम.”

 

वडिलांचे अपार कष्ट, सचोटीने वागणे आणि दिलदारवृत्ती पाहत सुभाष लहानाचेमोठे होत होते. घरी संस्कारांची सुबत्ता होती. आर्थिक तंगी नव्हती. असे सर्व आलबेल असूनही आर्थिकतेचा माज नव्हता आणि दिखावाही नव्हता. कारण, वडील कष्टाने कमावलेला पैसा समाजाचे देणे म्हणून समाजासाठी वापरत. मूळ पालघर-चिंचीचे चाफेकर कुटुंब कामानिमित्त मुंबईत आले. पण, पालघरपरिसरातील समाजजीवन हे कुटुंब विसरले नाही. तोच वारसा सुभाष यांनीही पुढे चालवला. आयुष्यात अनेक चढ-उतारआले. पण, समाजहिताला धरूनच वागायचे, ही शिस्त त्यांनी पाळली. जातीवर आधारित सवलती-सुविधा मिळवण्याची सध्या स्पर्धा सुरू आहे. मात्र, सुभाष यांनी आपल्या व्यवसायासाठी सरकारी सवलती किंवा बाह्यमार्ग यांचा अवलंब करणे नाकारले. ध्येय कष्टाने साध्य करणे व हे साध्य करण्यासाठी जे आवश्यक आहे, तेही मेहनतीने मिळवणे हेच त्यांचे उद्दिष्ट. ‘धन जोडण्यासोबतच माणूस जोडणे’ ही वृत्तीसुद्धा महत्त्वाची. ही वृत्ती सुभाष यांची होती. २००० साली जेव्हा वडिलांनी निर्माण केलेला आणि भावंडासोबत भागिदारीत असलेला व्यवसाय सोडून नवीन व्यवसाय त्यांनी उभा केला. तेव्हा ही माणूस जोडण्याची वृत्ती त्यांच्या कामी आली. भांडवल उभे करताना मित्र परिवार पाठीशी उभा राहिला. पत्नी नीताही खंबीरपणे सोबत राहिली. नव्या व्यवसायासाठी घेतलेले कर्ज जोपर्यंत फिटत नाही, तोपर्यंत सुभाष आणि नीता यांनी कोणतीही नवीन खरेदी केली नाही. लोकांनी दिलेल्या मदतीचा पै अन् पै परत करून व्यवसाय जोमाने वाढवला. स्वत:चा व्यवसाय सुरू करताना त्यांनी सर्वप्रथम ठरवले की, पूर्वीच्या सामुदायिक व्यवसायातील ग्राहक नव्या उद्योगाचे ग्राहक नसतील. नवा उद्योग निर्यात व्यवसाय करेल. त्यामुळे परेदशी ग्राहक असतील २००० साल होते ते. कामाची पहिली ‘ऑर्डर’ मिळाली स्वीडन देशातून. पण, त्यासाठी सुभाष यांचे एक वर्ष संवाद, संपर्क आणि त्या स्वीडिश ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात गेले. किती चिकाटी आणि दुर्लभ कर्तव्यकठोरता!

 

सुभाष हे व्यावसायिक म्हणून जितके कर्तव्यकठोर, तितकेच ‘समाजसेवक’ म्हणूनहीकर्तव्यदक्ष. पांचाळ समाज मध्यवर्ती मंडळाचे ते कित्येक वर्षे कार्याध्यक्ष होते. पालघरमध्ये वडिलांच्या नावे एक शाळा, आईच्या नावे एक कनिष्ठ महाविद्यालय आणि वडिलांच्या नावे एक वरिष्ठ महाविद्यालय, तसेच वडिलांच्या स्मृतीचे यशवंत चॅरिटेबल ट्रस्ट या सर्वांच्या माध्यमातून सुभाष यांनी अखंडपणे समाजाचे ऋण फेडण्याचे काम केले. सुभाष विद्यार्थ्यांना कष्ट आणि यशाचा मार्ग यासंदर्भातले प्रेरणादायी मार्गदर्शनही करत असतात. कारण, त्यांना वाटते की, नवीन पिढीला श्रमाची किंमत कळायला हवी. त्यातला आनंद आणि समाधान कळायला आणि मिळायला हवे. आपल्या मार्गदर्शनातून ते तरुणांना सांगतात की, “उद्योजक व्हा, पण नीतिमान उद्योजक व्हा. तुमच्या नावासोबत तुमच्या आई-वडिलांचे नाव असते. त्यांचे नाव राखता येत नसेल, तर ते कमी तरी करू नका.” अर्थातच, त्यांच्या या मार्गदर्शनाने, सल्ल्याने आणि मदतीने अनेक तरुण आज अर्थपूर्णरीत्या उभे राहिले आहेत. त्यांना समाजभान आले आहे. स्वत:च्या व्यवसायाला १०० टक्के योगदान देऊन समाजहितातही १०० टक्के योगदान देणारे सुभाष आज तरुण उद्योजकांचे प्रेरणास्थान आहेत. ‘सुयश’कार सुभाष यांचे हेच सुयश म्हणावे लागेल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat