एक्झिट पोलचा सुगावा?

    दिनांक  05-May-2019   

 
 
महाराष्ट्राच्या अखेरच्या किंवा लोकसभेच्या चौथ्या फेरीतील मतदानानंतर अकस्मात शरद पवार यांची भाषा बदलली आहे. तेही इतर उपटसुंभ राजकीय नेत्यांच्या सुरात सूर मिसळून मतदान यंत्रावर शंका घेणार्यांच्या गोतावळ्यात सहभागी झाले आहेत. मात्र इतरांपेक्षा पवारांची प्रतिक्रिया सावध आहे. बारामती यंदा भाजपाने जिंकली तर मतदान यंत्रात गडबड असल्याचे मानावे लागेल, लोकांचा निवडणुकीवरचा विश्वास उडून जाईल अशी ही प्रतिक्रिया थक्क करून सोडणारी आहे. प्रामुख्याने चौदा निवडणुका लढवून सलग जिंकणार्या नेत्याच्या तोंडी ही भाषा शोभणारी नाहीच. पण त्याहीपेक्षा त्यांचाच लोकशाहीवरचा विश्वास उडाल्याचे ते लक्षण आहे. दर पाच वर्षांनी किंवा ठरावीक मुदतीनंतर निवडणुका कशाला घेतल्या जातात, त्याचाही पवारांना पत्ता नाही काय? तेच तेच उमेदवार आपल्या बालेकिल्ल्यातून सहज निवडून येतात म्हणून लोकांचा निवडणुकीवर विश्वास आहे, असेच पवारांना म्हणायचे आहे काय? अशा बालेकिल्ल्यात कोणी नेता वा त्याचा उमेदवार पराभूत झाला, मग निवडणुकांमध्ये गफलत होते, असेच त्यांना म्हणायचे नाही काय? बारामती हा आपला बालेकिल्ला आहे आणि तो शाबूत ठेवण्यावरच लोकशाही टिकून आहे; असेच पवार सांगत आहेत. पण त्यांचा आपल्या बालेकिल्ल्यावरचा विश्वासच उडालेला दिसतो. अन्यथा त्यांनी इतकी टोकाची भाषा केली नसती. आजवर त्यांना कधी आपल्या या बालेकिल्ल्यात प्रचाराची मेहनत घ्यावी लागलेली नव्हती. अर्ज भरावा आणि अन्यत्र प्रचाराला निघून जावे. स्वत: पवारांना तिथे कधी ठाण मांडून प्रचार करावा लागला नव्हता. पण यावेळी त्यांना तिथेच आसपास मुक्काम ठोकून बसावे लागलेले आहे. पराभवाची ती पहिली चाहूल होती काय? आणि आता पराभव झाल्यास अशी भाषा आत्मविश्वास किती ढासळलेला आहे, त्याचाच पुरावा आहे. पण त्याचे कारण काय? एक्झिट पोल?
ओपिनियन पोल हा प्रकार मतदानाची पहिली फेरी सुरू होण्याच्या आधीच थांबलेला असतो. पण मतदान होत जाते, तसतसा एक्झिट पोल चाचणीकर्ते गोळा करत असतात. प्रत्येक फेरीत मतदान संपते, तेव्हा त्यात प्रत्यक्ष मतदान केलेल्यांची चाचणी घेऊन हा निकाल काढला जातो. सहसा एक्झिट पोल चुकणारा नसतो. कारण तेव्हा चाचणीत सहभागी झालेला मतदार मत देऊन आलेला असतो. मात्र अनेक फेर्यांमध्ये मतदान चालू असल्याने त्याचे निकाल अंतिम फेरीचे मतदान होईपर्यंत जाहीर केले जात नाहीत. पण तो निकाल हाताशी असतो. त्यामुळेच पहिल्या फेरीतील मतदानाचा एक्झिट पोल लगेच तयार झाला आणि पुढल्या प्रत्येक फेरीत होणार्या मतदानाच्या एक्झिट पोलचे आकडे चाचणीकर्त्यांच्या हाताशी तयार आहेत. मात्र त्याची जाहीर घोषणा करण्यावर प्रतिबंध आहे. पण असे आकडे राजकारणात गुंतलेल्यांसाठी पैसे मोजल्यास उपलब्ध असतात. कुठल्याही प्रकारे त्याची जाहीर वाच्यता केली जाणार नाही, या अटीवर राजकीय पक्षांना चाचणीकर्त्यांकडून हे आकडे मिळू शकत असतात. अगदी अमेठी वा बारामती अशा मतदारसंघाचाही एक्झिट पोल मिळू शकतो.
 
 
 
बहुधा शरद पवारांनी तसा पोलचा आकडा मिळवलेला आहे. त्यात नवल कुठलेच नाही. यावेळी पवार प्रथमच चहुकडून घेरले गेलेले आहेत आणि आपला बालेकिल्लाही धोक्यात असल्याची जाणीव त्यांना खूप आधी झालेली होती. म्हणून त्यांनी माढ्यातून माघार घेतली आणि आपली सर्व शक्ती बारामती टिकवण्यासाठी लावलेली होती. पण तिचा उपयोग झाला नसल्याची खातरजमा एक्झिट पोलच्या माध्यमातून झाल्यावर निकालापूर्वीच त्यांनी मतदान यंत्रावर खापर फोडण्यास सुरूवात केलेली दिसते. अन्यथा बारामतीत पवारांचा किंवा त्यांच्या लाडक्या कन्येचा पराभव, असे शब्द कोणी सहसा उच्चारण्याची हिंमत करत नाही. मग पवारांनीच त्याची मतदान संपताच सुरुवात करून द्यावी का?
इथे आणखी एक संदर्भ तपासून बघायला हरकत नाही. मागील खेपेस प्रथमच बारामती मतदारसंघात अटीतटीची लढत झालेली होती आणि इतक्या कमी फरकाने प्रथमच कोणी पवार कुटुंबीय बारामतीतून लोकसभेत पोहोचला होता. त्याही आधीच्या निवडणुकीत माढा मतदारसंघात पवार उभे होते आणि त्यांच्याशी टक्कर देताना धनगर नेते महादेव जानकर यांना काही हजार मते मिळाली, तरी पवार नाराज होते. आपल्या विरोधात कोणालाही लाखभर मते मिळतात, याचे त्यांना बारामतीच्या नजिकच्या मतदारसंघातही वैषम्य वाटलेले होते. पण पाच वर्षांनी तेच महादेव जानकर खुद्द बारामतीत आले आणि त्यांनी पवार कन्येच्या तोंडचे पाणी पळवले होते. प्रथमच सुळे इतक्या कमी मताधिक्याने जिंकल्या होत्या आणि सहापैकी चार विधानसभा मतदारसंघात त्यांना जानकरांनी मागे टाकलेले होते.
 
 
त्यामुळे बालेकिल्ला म्हणावा अशी बारामतीची तटबंदी अभेद्य उरलेली नव्हती. खरेतर त्यानंतरच्या पाच वर्षांत पवारांनी व सुप्रियाताईंनी ती ढासळलेली तटबंदी डागडुजी करून ठिकठाक करायला हवी होती. पण त्याऐवजी पिता व कन्या उचापती करीत राहिले आणि पाच वर्षे संपल्यावर कुलवृत्तांत देण्याची वेळ आल्यावर तोंडचे पाणी पळालेले होते. म्हणूनच जिंकण्या-हरण्याच्या गोष्टी सुरू झाल्यावर सुप्रियाताईंनी प्रथमच नरमाईचे वक्तव्य केले. मताधिक्याला महत्त्व नाही, एका मतानेही जिंकले तरी तो विजयच असतो, असे ताई म्हणाल्या. तेव्हाच बारामती डळमळीत असल्याचे उघड झालेले होते. आता मतदान संपल्यावर पित्यानेच यंत्रावर शंका घेताना बारामती गेली तरची भाषा उगाच केलेली नाही. पायाखालची वाळू सरकली असल्याचा तो संकेत आहे. अर्थात एक्झिट पोल अंतिम निकाल नसतो. काठावरची लढत असेल तर ऐन मोजणीत काही हजार मतानेही विजय पराजय ठरत असतो आणि त्याचीच ग्वाही पवारांनी ताज्या विधानातून दिलेली आहे.
एक्झिट पोलने त्यांना भयभीत केलेले असावे. त्यातूनच मग ही प्रतिक्रिया आलेली असावी. आजवर लाखांच्या फरकाने जिंकण्याची सवय लागलेली होती आणि मागल्या खेपेस चार विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर पडावे लागलेले होते, आज त्यात फारसा फरक पडलेला नव्हता आणि अधिकच वातावरण तापत गेले, आपले म्हणावे अशा राजकीय मित्रांनीही दगाफटका करण्याचा विडा उचललेला असेल, तर मनात शंकेची पाल चुकचुकणारच. पण कितीही झाले तरी पराजयाची तयारी करूनच लढत द्यायची असते. इंदिराजी, वाजपेयी यासारखे दिग्गजही इथल्या मतदाराने पराभूत करून दाखवले आहेत. त्यांच्या तुलनेत बारामती, शरद पवार किंवा सुप्रिया सुळे कोणी अफाट व्यक्तिमत्व नाहीत. त्यांच्या पराभूत होण्याने लोकशाही धोक्यात येत नसते, की लोकांचा निवडणुकीवरचा विश्वास संपण्याची बिलकुल शक्यता नसते. उलट असे निकालच लोकांचा निवडणुका व लोकशाहीवरील विश्वास द्विगुणित करीत असतात.
 
 
 
कितीही दिग्गज वा पराक्रमी नेता असला तरी मतदाराच्या इच्छेसमोर त्याची काही मातब्बरी नसते, हेच निवडणुका सिद्ध करीत असतात. त्यावर ज्याचा विश्वास नसतो, त्याचा लोकशाहीवर विश्वास असूच शकत नाही. शेकडो पराभव पचवून भाजपा या विजयाच्या रिंगणात पोहोचला आहे. त्यालाही आजवर अनेकदा बालेकिल्ल्यात पराभव पचवावे लागले आहेत. चारच महिन्यांपूर्वी तीन हक्काच्या राज्यातली सरकारे भाजपाने गमावली आहेत. तेव्हा लोकांचा विश्वास उडाला नव्हता. कारण ती सरकारे मतदारानेच पराभूत केली आणि यापुढेही असे कोणी मुजोर माजलेले पुढारीही मतदार संपवून टाकत राहिले. त्या नेत्यांनी जनतेच्या लोकशाही व निवडणुकीवरील विश्वासाची फिकीर करायचे कारण नाही. त्यापेक्षा आपण कुठे व कसे चुकलो, त्याचा काळजीपूर्वक अभ्यास करावा. लोकांच्या विश्वासापेक्षा आपल्या ढासळलेल्या आत्मविश्वासाची डागडुजी करावी.