खोट्याच्या कपाळी गोटा

    दिनांक  05-May-2019   जसे लोक कर्तृत्वाची साक्ष देतानाकेंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र’ म्हणतात, तसेच बिनबुडाच्या फुकटच्या मनोरंजनासाठी हेच लोक म्हणतात, "केंद्रात राहुल आणि राज्यात राज"(म्हणजे आपले कृष्णकुंजवाले हो). राहुल गांधी काहीही म्हणाले किंवा राज ठाकरेंनी कितीही खर्जातल्या आवाजात, ‘लावा रे, तो व्हिडिओ’ म्हणत खाजवून खरूज काढली तरी परिणाम शून्यच असतो. मात्र, असे जरी असले तरी काही लोक "आलूपासून मशीन" बनविण्याच्या प्रतिक्षेत आहेत. ते विचारतात की, "आलूपासून सोनं बनवणारी मशीन आली का? की काँग्रेस जिंकल्यावर येईल." यावर कुणी म्हणेल की किती खोटं? बटाट्यापासून सोनं बनवणारी मशीन असते का कधी? आणि असली तरी काँग्रेस जिंकणार आहे का? बरं, या दोन्ही गोष्टींशी संबंध असणारे राहुल यांचा आणि सत्याचा काही संबंध आहे का? कारण, राहुल गांधी या व्यक्तीची सत्यता उभ्या जगाने पाहिली आहे. त्यांनी पंतप्रधानांची गळाभेट घेतली होती. पण काही क्षणातच मागे बसलेल्या सहयोगीला त्यांनी डोळा मारला. आपण मोदींना दिलेली गळाभेट ही स्नेहाने-आदराने नव्हे तर मुद्दाम त्यांना संभ्रमात टाकण्यासाठी होती, असाच त्या आविर्भावाचा अर्थ होता. असो, असा ही बनवाबनवीचा खेळ जरी राहुल आणि त्यांच्या काँग्रेसच्या टीमने रंगवला असला तरी ‘झूट के पाँव नही होते’ हे सत्य त्यांना स्वीकारावे लागेल. काही एक कर्तृत्व न गाजवता केवळ मोदींवर टीका करणारे राजपुत्र राहुल गांधी असोत, लेकी नातवंडांसाठी पक्ष जिवंत ठेवणारे शरद पवार असोत की मग आपला पक्षच्या पक्ष दुसऱ्या पक्षाच्या दावणीला बांधणारे राज ठाकरे असोत, सत्तेची भूक त्यांना गप्पच बसू देत नाही. पण, खोट्याला काही मर्यादा? अर्थात, हा प्रश्नही अनाठायी. एका नेत्याला हरवण्यासाठी सतराशे साठ गोळा झालेले नेते, त्यांचा उद्देश एकच, मोदींना हरवायचे. त्यासाठी हाताशी सत्य असे काही नाही. मग जनतेला मूर्ख समजून खोट्याचा आधार घेत सध्या देशभरातले विपक्ष एकवटले आहेत. मात्र, या सगळ्यांचा खरेखोटेपणा जनतेने जोखला आहे. खोटारडेपणाचा कळस करणाऱ्या काँग्रेस आणि आघाडीला सत्ता मिळेल का? तर उत्तर आहे, खोट्याच्या कपाळी गोटा. खोटारड्यांना जनता पराभवाचा नुसता गोटा नव्हे तर जमालगोटा देणार आहे.

 

अजूनही ‘सत्यमेव जयते’

 

जहाँ सच ना चले वहाँ झुट सही

जहाँ हक ना मिले वहाँ लूट सही

 

काही दशकांपूर्वीच्या एका लोकप्रिय चित्रपटगीतातली ओळ आठवली. कारण ‘नॅशनल हेराल्ड’ वृत्तपत्र.. इटली माहेर असलेल्या सोनियाराणी आणि इंग्लंडचे नागरिकत्व आहे का, यावरून वादंग माजलेले राजपुत्र राहुल यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपातले मुख्य पात्रे ‘नॅशनल हेराल्ड‘ वृत्तपत्र. तर या ‘नॅशनल हेराल्ड’मध्ये एक लेख छापून आला. लेखामध्ये प्रश्न विचारला आहे की, "मोदींनी पर्यायाने भाजपने २०१४ साली २०० टन सोने स्वित्झर्लंडला गुपचूप पाठवले काय? मोदींना त्यामुळे काय मिळाले असेल?" काँग्रेसचे उमेदवार असलेले नवनीत यांनी त्यांच्या ब्लॉगवर खरडलेले मनोगत. त्याचा आधार घेत ‘नॅशनल हेराल्ड’ वृत्तपत्राने याची हेतूपुरस्पर बातमी केली की, मोदी सरकारने २०० टन सोने स्वित्झर्लंडला पाठवले? तसेही स्वातंत्र्यानंतर काँग्रेसची भूमिका आणि उद्देश नेहमीच गोंधळलेला आणि गोंधळ घालणाराच राहिला आहे. त्यामुळे ‘नॅशनल हेराल्ड’ मध्ये आलेल्या या बातमीमध्येही गोंधळ आहे. बातमी न सांगता, लोकांपुढे प्रश्नचिन्ह उभे केले गेले. या सोन्याबाबत नवनीत यांनी माहितीच्या आधारावरून माहिती मागितली होती. तेव्हा रिझर्व्ह बँकने उत्तर दिले होते की, "हे सोने बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंटमध्ये सुरक्षित आहे." हे सोने आपल्या देशात न ठेवता परदेशात का ठेवले गेले? तर याचेही स्पष्टीकरण आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिले की, "सुरक्षिततेसाठी आपले सोने दुसऱ्या दशात ठेवणे ही जगभराची वहिवाट आहे. त्यामुळे भारताने असे सोने दुसऱ्या देशात ठेवले असले तरी त्यात गैर काहीच नाही." पण तरीही रा. स्व. संघ आणि गांधीजींच्या हत्येचा संबंध लावणाऱ्या, तसेच ‘चौकीदार चोर है’ किंवा राफेल करारावर खोटारडेपणाचा कळस करणाऱ्या काँगेसींनी आपला खोटारडेपणा कायम ठेवला. कारण, ‘जहाँ सच ना चले, वहाँ झूठ सही’ हेच त्यांचे ब्रीदवाक्य. तरीही काँग्रेसच्या खोटारडेपणाला ना जनतेने भीक घातली ना न्यायव्यवस्थेने. कारण, काँगेसचे ब्रीद, ‘जहाँ सच ना चले, वहाँ झूठ सही’ असले तरी भारतीय न्यायव्यवस्था आणि जनतेची नीती ‘सत्यमेव जयते’वरच आधारित आहे, अजनूही..

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat