नाच हृदया आनंदे...

    दिनांक  05-May-2019   ज्या नेपाळमध्ये अजूनही महिलांना दुय्यम वागणूक दिली जाते, नाचगाणे महिलामुलींसाठी नाहीच, असा समज असताना, बंदनाच्या या नृत्यविक्रमामुळे एक सकारात्मक संदेश नेपाळी समाजातही आपसूकच गेला आहे.


नाच हृदया आनंदे ।

मिरवित आपले भाग्य हे ॥

शुभदिन मंगल हा ।

 

‘एक होता म्हातारा’ या नाटकातील मो. ग. रांगणेकर यांच्या गीताच्या या पंक्ती. आज या पंक्ती स्मरण्याचे कारणही अगदी तसेच. कारण, नेपाळच्या एका नृत्यांगनेने २४ तास नाही, ४८ तास नाही, ७२ तासही नाही, तर तब्बल १२६ तास सलग नृत्य सादर करून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये एक विश्वविक्रम आपल्या नावावर सुवर्णाक्षरात कोरून घेतला आहे आणि म्हणूनच आनंदी हृदयाने नृत्य करणाऱ्या या १८ वर्षीय बंदनासाठी शनिवारचा दिवस मंगल, शुभ दिनच ठरला. कारण, नोव्हेंबरमध्ये संपन्न झालेल्या या ‘मॅरेथॉन नृत्या’चे निकाल नुकतेच घोषित करण्यात आले. त्यानंतर शनिवारीच नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांच्या निवासस्थानी बंदनाचा हा सन्मान-सत्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. म्हणायला गेलं तर ही अत्यंत कौतुकाची, आनंदाची बाब की, एक १८ वर्षीय किशोरी पूर्ण जिद्दीने जवळपास १०० तास सलग नृत्य करते. पण, अशा या बंदनाने रेकॉर्ड मोडला आहे, तो एका भारतीय नृत्यांगनेचा. २०११ साली १२३ तास, १५ मिनिटे इतका वेळ नृत्य करून भारताच्या कलामंडलम हेमलता या नृत्यांगनेने हा विश्वविक्रम तिच्या नावावर केला होता. त्यावेळी हेमलतावरही जगभरातून प्रशंसावर्षाव झाला होता. पण, ते म्हणतात ना, विश्वविक्रम मुळी असतातच मोडण्यासाठी, त्यातलाच हा प्रकार. १२३ तासांऐवजी सलग १२६ तास नृत्य करण्याचा हा विश्वविक्रम आता भारताच्या नावावर नाही, तर नेपाळच्या नावावर अंकीत झाला आहे.

 

बंदना नेपाळ (देशाचे नाव हेच तिचे आडनाव!) ही पूर्व नेपाळमधील धनकुटा गावची. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षीपासून बंदनाची पावलं नेपाळी संगीतावर थिरकू लागली. नृत्याकडे असलेला तिचा हा ओढा तिच्या पालकांनीही वेळीच ओळखला आणि महिला-संस्कृतीच्या नावाखाली बंदनाच्या पायात बेड्या न घालता, तिच्या पायांमधील घुंगरूंच्या आवाजाने या कुटुंबाला मनमुराद आनंदच दिला. बंदनाचा भाऊही नृत्यात निपुण आहेच. सुरुवातीला त्याच्याकडूनही बंदनाने नृत्याचे धडे गिरवले. बंदनाची नृत्याची आवड पाहता, तिने नेपाळमध्ये नृत्यशैलीला अधिकृत शिक्षण घेतलेच, शिवाय भारतातही काही काळ राहून तिने आपल्या नृत्याला पैलू पाडले. दि. २३ नोव्हेंबर, २०१८ साली नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये हा अनोखा नृत्याविष्कार सुरू झाला. काठमांडूच्या बिग फुडलँड रेस्टॉरंटमध्ये कुटुंबीयांच्या, मित्रपरिवाराच्या पूर्ण सहकार्याने बंदनाची पावलं नेपाळी संगीतावर मनमुराद थिरकू लागली. २३ नोव्हेंबरला आरंभलेल्या या नृत्यपटाला पूर्णविराम मिळाला तो २८ नोव्हेंबरच्या दुपारी. म्हणजे जवळपास सहा दिवस. शारीरिक त्रास, तहानभूक अगदी सगळं सगळं विसरुन बंदना आपल्या नृत्यात पूर्णपणे रममाण झाली होती. ती आणि तिची पावलं नेपाळी संगीतावर अगदी लीलया थिरकत होती. पण, हे करताना बंदनाच्या कपाळावर चिंतेच्या आठ्या नव्हत्या की, चेहऱ्यावर परिश्रमाचे भाव; तिचे शरीर, मन, मेंदू अगदी एकरूप होऊन तिची ही नृत्यसाधना विश्वविक्रमी व्हावी म्हणून अगदी समरस झाले होते. तिचे पाय सुरातालात नाचत होते, हस्तमुद्रा उत्तम साथ देत होत्या आणि चेहऱ्यावरील हास्य या नृत्याची रंगत अधिक खुलवत होते.

 

खरंतर, सलग इतका वेळ नृत्य करणे हे तसे कर्मकठीणच. नृत्य प्रशिक्षित असलात तरी एक-दोन तासांनंतर तुमचे पाय आपसूक गळून पडतील आणि जे प्रशिक्षित नाहीत, ते तासभर नाचले तरी त्यांना धापा लागतील. म्हणजे, हे नक्कीच येरागबाळ्याचे काम नाही. बंदनाच्या या विश्वविक्रमामागे होती तिची अपार जिद्द आणि अपरंपार कष्ट. म्हणूनच या मॅरेथॉन नृत्यविक्रमापूर्वी बंदनाने अशीच जवळपास १०० तास सलग नृत्याची प्रॅक्टिसही केली होतीच. नेपाळी संगीत, नेपाळी संस्कृती जगभर पोहोचविण्यासाठी हा अनोखा मार्ग पत्करल्याचे बंदना सांगते. त्यामुळे हा बंदनाचा वैयक्तिक पराक्रमी विक्रम असला तरी संपूर्ण नेपाळची मान आज बंदनामुळे अभिमानाने उंचावली आहे. शिवाय, ज्या नेपाळमध्ये अजूनही महिलांना दुय्यम वागणूक दिली जाते, नाचगाणे महिलामुलींसाठी नाहीच, असा समज असताना, बंदनाच्या या नृत्यविक्रमामुळे एक सकारात्मक संदेश नेपाळी समाजातही आपसूकच गेला आहे. त्यामुळे बंदनाच्या या नृत्याविष्कारामुळे नेपाळमधील बंधनाच्या जोखडात अडकून पडलेल्या कित्येक किशोरींमध्ये एक नवीन प्रेरणा, ऊर्जा संचारली असेल, यात शंका नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat