धक्कादायक : मुंबईत जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा

04 May 2019 17:11:56



मुंबई : राज्यभरात दुष्काळाच्या झळा बसत असताना मुंबैकरांनाही पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल असे सध्या दिसत आहे. यापूर्वीच मुंबईत पाणी कपात सुरु असून येणाऱ्या काळात गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. मुंबईत जुलै अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. तरीही, अधिक पाणी कपात न करण्याचा निर्णय मुंबई महानगर पालिकेने घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांना सध्यापुरती तरी दिलासा मिळाला आहे. पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

मुंबईत जुलै अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असल्याने अधिक पाणीकपात करणार नसल्याचे मुंबई महापालिका प्रशासनाने स्थायी समितीत स्पष्ट केले आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये गेल्यावर्षी पाऊस कमी पडल्याने २ लाख दशलक्ष लीटर पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे पालिकेने नोव्हेंबर २०१८ पासून १०% पाणी कपात लागू केली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये सध्या २ लाख ४३ हजार दशलक्ष लीटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

 

गेल्यावर्षी याचवेळी ४ लाख २७ हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा होता. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत १ लाख ८४ हजार दशलक्ष लीटर इतका कमी आहे. मात्र हा पाणीसाठा जुलै २०१९ पर्यंत पुरेल इतका आहे. जूनमध्ये चांगला पाऊस झाला तरच मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0