अर्जुन तेंडुलकरवर ५ लाखांची बोली

    दिनांक  04-May-2019मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबई टी-२० लीगमध्ये आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब संघाकडून खेळणार आहे. मुंबई लीगसाठी झालेल्या लिलावात आकाश टायगर्सने ५ लाख रुपये मोजून अर्जुनला आपल्या संघात स्थान दिले.

 

सचिन तेंडुलकर टी-२० मुंबई लीगचा ब्रॅण्ड अँम्बेसेडर असून या लीगचे हे दुसरे वर्ष आहे. या लीगसाठी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात अष्टपैलू गटात अर्जुनसाठी १ लाख रुपये इतके बेस प्राइस निश्चित करण्यात आले होते. अर्जुनवर अन्य संघांनी बोली लावल्यानंतर नॉर्थ मुंबई संघाने ५ लाख रुपयांची सर्वात मोठी बोली लावली. त्यानंतर लिलावाचं सूत्रसंचालन करत असलेल्या चारू शर्मा यांनी आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब आणि ईगल ठाणे स्ट्रायकर्स या दोन अन्य संघांना बरोबरी करण्याची (ओटीएम) संधी दिली. दोन्ही संघांनी हा पर्याय निवडल्यानंतर बॅगमध्ये ठेवण्यात आलेल्या दोन कार्डपैकी एक कार्ड मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उमेश खानविलकर यांनी निवडले. हे कार्ड आकाश टायगर्सचे निघाले. त्यामुळे अर्जुन आकाश टायगर्सच्या पारड्यात गेला.

 

अर्जुनकडे मुंबई १४, १६ आणि १९ वर्षांखालील संघाकडून खेळण्याचा अनुभव आहे. त्याशिवाय गेल्यावर्षी त्याने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यात त्याने ३ विकेट्स घेतल्या होत्या आणि दोन डावांत त्याला केवळ १४ धावा करता आल्या होत्या. मात्र, डॉ. डी वाय पाटील ट्वेंटी-२० चषक स्पर्धेत त्याने उल्लेखनीय कामगिरी केली. याच कामगिरीमुळे त्याला मुंबईच्या २३ वर्षांखालील संघात स्थान मिळाले. गेल्या महिन्यात त्याने एका स्थानिक वन डे सामन्यात २३ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्वही केले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat