स्वा. सावरकर हे खर्‍या अर्थाने द्रष्टे नेते : डॉ. सच्चिदानंद शेवडे

    दिनांक  31-May-2019सर्व मान्यवरांकडून दै. ‘मुंबई तरुण भारत’वर कौतुकवर्षाव

 
 

मालेगाव : “स्वा. वि. दा. सावरकर हे खर्‍या अर्थाने द्रष्टे होते. कारण, त्यांचे विचार आणि दूरदृष्टी ही देशाला सशक्त बनविणारी होती. स्वा. सावरकरांच्या निधनानंतर तशी दूरदृष्टी असणारा माणूस सत्तेत येण्यासाठी २०१४ साल उजडावे लागले. तसेच, अनेक गांधीवादी मंडळीदेखील आजमितीस स्वा. सावरकर यांचा मार्ग अनुसरताना दिसत आहे,” असे प्रतिपादन स्वा. सावरकर यांचे अभ्यासक, लेखक, वक्ते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले. ते मालेगाव येथे दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने आयोजित कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.

 

स्वा. सावरकरांच्या जयंतीच्या औचित्याने बुधवारी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने ‘कालजयी सावरकर’ या विशेषांकाचे प्रकाशन तसेच, ‘डॉ. हेडगेवार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आविष्कार,’ ‘कालजयी सावरकर’ आणि ‘भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते’ या संग्रही ग्रंथसंपदेचे प्रकाशन, तसेच डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मंचावर राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, मालेगाव शहर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संघचालक अशोक कांकरिया, पश्चिम महाराष्ट्र प्रांत जनजाती परियोजना प्रांत प्रमुख प्रदीप (आबा) बच्छाव, दै. ‘मुंबई तरुण भारत’चे व्यवसाय प्रमुख रविराज बावडेकर यांसह मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना डॉ. शेवडे यांनी सावरकरांनी हाती घेतलेल्या भाषाशुद्धी चळवळीची उपयोगिता आजच्या काळात किती व कशी महत्त्वाची आहे, याचे विवेचन केले. सावरकरांनी एका जन्मात अनेक जन्मांची कामे केले असल्याचे सांगताना शेवडे यांनी त्यांच्या ब्रिटनमधील कार्याची सोदाहरण मांडणी केली. स्वा. सावरकर यांनी विद्यार्थी दशेत किती महान कार्य केले, हे सांगताना आजची तरुण पिढी ही कारणांच्या मागे लपत कार्यापासून दूर जात असल्याची खंतदेखील त्यांनी यावेळी व्यक्ती केली. ‘हुवा तो हुवा’ असे म्हणणारे राजकारणी असणे हे आजच्या काळात दुर्दैवी असल्याचे मत त्यांनी मांडले.

 

दै. ‘मुंबई तरुण भारत’मुळे माझ्या ज्ञानात भर पडत असून, हे वर्तमानपत्र नसून हा विचार असल्याचे मत शेवडे यांनी यावेळी मांडले. याप्रसंगी डॉ. शेवडे यांनी सावरकरांच्या बोटीवरील पलयानाची, अंदमानातील सावरकरांना भोगाव्या लागलेल्या हालअपेष्टांची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी त्यांनी स्वा. सावरकर यांनी अंदमानमध्ये ज्या हालअपेष्टा सहन केल्या, याची माहिती देताना अंदमानात स्वा. सावरकर यांचे निधन झाले नाही, हेच त्यांना बोल लावणार्‍या व्यक्तींना सलत असल्याचे मत डॉ. शेवडे यांनी मांडले. तसेच, स्वा. सावरकर यांनी कोणतेही माफीपत्र ब्रिटिशांना सादर केले नसल्याचे डॉ. शेवडे यांनी सांगितले. गांधीहत्येत स्वा. सावरकर यांचा सहभाग हा केवळ राजकीय हेतूने दाखविला जात आहे. तसेच स्वा. सावरकर यांच्यावर आक्षेप घेणार्‍यांच्या ज्ञानाची कीव येत असल्याचे प्रतिपादन यावेळी डॉ. शेवडे यांनी केले.

 

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना, दादाजी भुसे यांनी मालेगावकरांच्यावतीने दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे प्रकाशित ‘कालजयी सावरकर’ या विशेषांकाचे व तीनही पुस्तकांचे स्वागत केले. स्वा. सावरकरांच्या विचारांचे सरकार भारताला लाभले असल्याचा आनंद होत असल्याचे भुसे यावेळी म्हणाले. दै. ‘मुंबई तरुण भारत’ हे राष्ट्रीय विचारांचे वर्तमानपत्र असून त्याला बळकटी देणे, ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त करताना मालेगावात दै. ‘मुंबई तरुण भारतचे निश्चितच स्वागत करण्यात येईल व काही अडचणी असल्यास त्यादेखील दूर करण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी भुसे यांनी दिली.

 

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्रदीप बच्छाव म्हणाले की, “मला कार्य करण्याची प्रेरणा मालेगाव येथील शाखेच्या माध्यमातून मिळाली.” स्वा. सावरकरांच्या विचारांच्या अंकांचे प्रकाशन झाले, याचा मोठा आनंद असल्याचे मत यावेळी बच्छाव यांनी मांडले. ‘राष्ट्रवाद’ व ‘राष्ट्रभक्ती’ यात दै. ‘मुंबई तरुण भारत’ने कधीही मागे हटण्याची भूमिका घेतली नाही, असे यावेळी बच्छाव म्हणाले. याप्रसंगी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना व दै. ‘मुंबई तरुण भारत’ची भूमिका मांडताना रविराज बावडेकर म्हणाले की, “दै. ‘मुंबई तरुण भारत’ हे राष्ट्रवादी विचारांचे दैनिक आहे. तसेच, अश्लीलतेला चालना देणार्‍या, असामाजिक, राष्ट्रहित न जोपासणार्‍या आणि राष्ट्रविरोधी कृत्यांना थारा देणार्‍या विचारांना दै. ‘मुंबई तरुण भारत’ मध्ये स्थान नसल्याचे बावडेकर यांनी अधोरेखित केले. उपस्थितांचे आभार रा. स्व. संघाचे कार्यकर्ते सतीश काजवाडकर यांनी मानले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat