'जय श्रीराम'च्या घोषणेने ममतांचा संताप; सात जणांना केली अटक

31 May 2019 14:26:48


 


कोलकत्ता : लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पश्चिम बंगालमध्ये 'जय श्रीराम' या घोषणांचा मुद्दा चांगलाच गाजला होता. निवडणूक संपली तरी 'जय श्रीराम' घोषणेचे तीव्र पडसाद बंगालमध्ये पाहायला मिळत आहेत. असाच एक व्हिडीओ एक समोर आला असून यात काही जणांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्या. यावर ममतांनी नेहमीच्या सवयीनुसार आपली चिडकी प्रवृत्ती दाखवून देत 'जय श्रीराम' घोषणा देणारे हे भाजपचे गुंड असल्याचे, त्या म्हणाल्या.

 

पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगना जिल्ह्यातील हा व्हिडीओ असल्याचे समोर आले आहे. ममतांचा ताफा या ठिकाणावरून जात असताना काही जणांनी 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्या. त्यानंतर ममता घोषणा देणाऱ्यांवर चिडताना दिसून आल्या. आपला ताफा थांबवत त्या म्हणाल्या, "माझ्यासमोर या.. तुमच्यात हिमनत असेल तर समोर या आणि माझ्यासमोर घोषणा द्या. तुम्ही लोक भाजपचे गुंड आहात. आमच्यामुळे तुम्ही आज इथे राहतात. तुमच्यासारख्या गुंडाना मी इथून आता हाकलून देऊ शकते. तुम्ही सगळे बदमाश लोक आहात. माझ्या गाडीवर हल्ला करायची तुमची हिमंत झालीच कशी? मी तुमच्या सर्वांचे चामडे सोलून काढीन. ज्या सर्वानी इथे गोंधळ घातला त्या सर्वांची नावे मला पाहिजेत. या सर्वांच्या घराची झडती झाली पाहिजे."

 

यानंतर ममतांचा ताफा थोडा पुढे गेल्यानंतर उपस्थितांनी पुन्हा जय श्रीरामच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. यानंतर मात्र ममतांचा तिळपापड झाल्याचे पाहायला मिळाले. हे भाजपाचे लोक आहेत मात्र ते बंगालचे रहिवासी नाहीत. त्यांनी आपल्याबाबद अपशब्द वापरल्याचा आरोपही ममतांनी केला. दरम्यान, या प्रकरणानंतर सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0