जागतिक तंबाखूविरोधी दिन : ई-सिगारेटही करू शकते तुमचे फुफ्फुस निकामी

    दिनांक  31-May-2019मुंबई : 'ई-सिगारेट्स' ही इतर सिगरेटपेक्षा कमी धोकादायक असतात, असा खोटा समज व्यसन करणाऱ्या व्यक्तींचा झाला आहे. मात्र, ई-सिगारेट ओढल्यानंतर तंबाखूच्या व्यसनाधीन होणाऱ्यांचे प्रमाण सर्वात जास्त आहे, असे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त सलाम फाऊंडेशनतर्फे केलेल्या सर्वेक्षणात ई-सिगारेट पिणाऱ्यांमध्ये तंबाखूच्या व्यसनाधीन झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे.

 
 

ई-सिगारेट्स वापरणाऱ्यांपैकी ८० टक्के व्यक्तींनी त्यापूर्वी कोणतेही तंबाखूयुक्त उत्पादन वापरले नाही. ई-सिगारेट्स हा तंबाखूच्या सेवनाकडे जाण्याचा मार्ग बनू लागला आहे. तंबाखूयुक्त कोणतेही पदार्थ सेवन करणाऱ्यांनाही ई-सिगारेटमुळे तंबाखूचे व्यसन लागले आहे. तरुणांना वाटते की, ई-सिगारेट्स म्हणजे धूम्रपानासाठीचा एक सुरक्षित पर्याय आहे, हा भ्रम अनेकांना असल्याने तरुण पीढी व्यसनांच्या आहारी ओढली जात आहे.


 

ई-सिगारेटचे सेवन करणाऱ्या १२ वर्षाच्या तरुणाने सांगितलेल्या अनुभवानुसार, शाळेतील मुले केवळ मजेसाठी ई-सिगारेटचे सेवन करतात. त्यानंतर व्यसन जडत जाते. मुंबईतील केलेल्या एका सर्वेक्षणात धक्कादायक माहीती हाती लागली आहे. मुंबईत एका सर्वेक्षणानुसार, ७३ टक्के तरुणांना ई-सिगारेट्सची माहीती आहे. त्यातील ३३ टक्के जणांनी ई-सिगारेटचे सेवनही केलेले आहे आणि १५ टक्के जणांना नियमित ई-सिगारेट घेण्याची सवय आहे, असा सर्वेक्षण अहवाल सांगतो.


 

ई-सिगारेट आणि धोका

ई-सिगारेट्स निश्चित आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. हे धोके सिगारेट्सच्या दुष्परिणामांसारखेच आहेत. पंजाब, कर्नाटक, जम्मू आणि काश्मीर, बिहार आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये 'व्हेपिंग'वर आधीच सरसकट बंदी आणली आहे. ई-सिगारेट्सच्या वापरावर निर्बंध आणण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश केंद्राने राज्यांना दिले असूनही त्यांची विक्री राजरोसपणे सुरूच आहे.

 
 

४.४ दशलक्ष रुपयांची उलाढाल

भारतामध्ये या उद्योगक्षेत्राचा विस्तार पाहिल्यास ई-सिगारेट्सची बाजारपेठ वर्षाकाठी चक्रवाढगतीने ३४ टक्क्यांनी विस्तारणार आहे. जागतिक आकडेवारीनुसार २०१७ साली या क्षेत्राची उलाढाल ४.१ दशलक्ष रुपये इतकी होती, ज्यात वाढ होऊन २०१९ साली ७.४ दशलक्ष रुपयांवर पोहोचला आहे.

 

बंदी आणण्याची मागणी

सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या कार्यक्रमामध्ये 'महाराष्ट्राभरात ई-सिगारेट्सवर सर्वंकष बंदी आणण्याच्या मागणी'वरही लक्ष केंद्रित करण्यात आले. ई-सिगारेट्सवर बंदीची मागणी करणारी तरुणांच्या स्वाक्षऱ्यांची मोहीमही यावेळी राबवण्यात आली आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat