धक्कादायक : पाण्याअभावी कोयनातील वीजनिर्मिती बंद

31 May 2019 17:25:20



सातारा : महाराष्ट्रातील महत्वाचे वीजनिर्मिती केंद्र मानले जाणारे केंद्र म्हणजे कोयना धरणावरील वीजनिर्मिती केंद्र. परंतु, सध्या धरणामध्ये कमी पाणीसाठा असल्याने वीजनिर्मिती बंद करण्यात आली आहे, अशी माहिती राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली आहे. पुढील आदेश प्राप्त झाल्यावरच वीजनिर्मिती चालू करावी, असे पत्र महानिर्मिती कंपनीला देण्यात आले आहे. महाराष्ट्रात सध्या पाण्याच्या कमतरतेने पुन्हा एकदा दुष्काळाने डोके वर काढले आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

 

वीजकंपनीने पाण्याचा वापर करू नये, यासाठी कोयना प्रकल्पाने पाणी कपातीचे आवाहन केले होते. या आवाहनाला महानिर्मिती कंपनीने सकारात्मक प्रतिसाद देत वीज निर्मितीसाठी शिल्लक असलेले तीन टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रामध्ये भारनियमनाचे संकट ओढवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महानिर्मिती कंपनीची वीज निर्मितीची क्षमता १३,६०२ मेगावॅट इतकी आहे. यापैकी १,९५६ मेगावॉट वीज निर्मिती कोयना जलविद्युत प्रकल्पातून होते. वीज निर्मितीची क्षमता सुमारे दोन हजार मेगावॉटने अचानक कमी झाल्याने येत्या काही दिवसात राज्यावर भारनियमनाचे संकट ओढवू शकते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0