राम नाम तू जप कर देख...

    दिनांक  31-May-2019   मुख में राम का नाम हो, दिल में हो तस्वीर

काम सफल होते सभी, बिगडी बनती तकदीर...

 

. बंगालमध्ये एकीकडे ‘जय श्रीराम’च्या नाऱ्यांनी, रामभक्तांच्या मतांनी भाजपला भरभरून आशीर्वाद दिले, तर दुसरीकडे रामनामाचा तिरस्कार करणाऱ्या ममतांची राजकीय तकदीरच पुरती बिघडवून टाकली. निवडणुकांच्या काळातही ‘जय श्रीराम’चे नारे बंगालमध्ये गुंजत होते आणि ममता पदोपदी घायाळ होत होत्या. कारण, या रामनामाच्या गजरात ममतांना त्यांच्या पराभवाची गुंजच क्षणोक्षणी कानी आदळत होती. झालेही अगदी तसेच. भाजपने ममतांच्या अभेद्य मानल्या जाणाऱ्या बंगालच्या गडाला जोरदार हादरा दिला आणि ४२ पैकी तब्बल १८ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. ममतांना २२ जागांवर, काँग्रेसला २ जागांवर समाधान मानावे लागले, तर सीपीआय-एमला आपले खातेही बंगालमध्ये उघडता आले नाही. भाजपच्या, रामाच्या या भगव्या लाटेनेच ‘माँ, माटी, मानूष’च्या नावाखाली तुष्टीकरणाचे राजकारण करणाऱ्या ममतांना त्यांची जागा दाखवून दिली. पण, निवडणुकीच्या निकालांनंतर खवळलेल्या ममतादीदी शांत होतील, अशी अपेक्षा होती. पण, झाले नेमके उलट. दीदींच्या गाड्यांचे ताफे एका गावातून जाताना काही गावकऱ्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. त्यावर दीदींनी चक्क गाडीतून उतरून अशा घोषणा देणाऱ्यांना राज्याबाहेरचे ठरवून थेट त्यांची चामडी सोलून काढीन, अशी धमकी दिली. शिवाय, घोषणा करणाऱ्यांची नावे मला द्या, त्यांच्या घरावर छापेच टाकले पाहिजेत, अशी उद्दाम भाषादेखील केली. म्हणूनच प्रश्न पडतो की, सेक्युलरवादाच्या बुरख्याखाली राजकारण करणाऱ्या ममतांना रामानामाचे नारे एवढे का झोंबतात? ‘जय श्रीराम’ची घोषणा देणारे बंगालमध्ये गुन्हेगार आणि गुंड ठरवले जात असतील, तर ती हिंदूंच्या दृष्टीने निश्चितच चिंताजनक बाब म्हणावी लागेल. ममतांनी निवडणूक काळातही ‘जय श्रीराम’च्या नाऱ्यांकडे एकवेळ दुर्लक्ष केले असते, त्याला एवढा प्रखर विरोध केला नसता, तर रामजपामुळे त्यांचा तिळपापड झाला नसता. पण, ‘जय श्रीराम’ला विरोध म्हणजेच हिंदूंना विरोध अशी आता दीदींची हिंदूविरोधी प्रतिमा बंगालमध्ये अधिक दृढ झाली. म्हणून दीदी, आता तुम्हीही रामनामाचे माहात्म्य ओळखा. कारण,

 

वो तो सदा सबका है, कभी तू उसकी बनकर देख,

बनेंगे तेरे बिगडे काम, राम नाम तू जप कर देख...

 

‘तृणमूल’ उखडताच ‘कोयत्या’ला धार

 

जपच्या प. बंगालमधील विजयाने केवळ भगव्याचा मार्ग त्या राज्यात सुकर केला नाही, तर लाल बावट्यालाही संजीवनी मिळाल्याचे चित्र आहे. कारण, ममतांच्या दहशतीने तृणमूलच्या राज्यात कम्युनिस्टांचीही पाचावर धारण बसली. ममतांच्या कार्यकर्त्यांनी सीपीआयच्या कार्यालयांना कायमचे टाळे ठोकले, तर काही कार्यालयांचा ताबा घेतला. कार्यकर्त्यांचे रक्त सांडले. जवळपास तीन दशके राज्य केलेल्या कम्युनिस्टांच्या मानगुटीवर बसून ममतांनी सीपीआयची अगदी तळागाळातही वाताहत केली. विधानसभाच नाही, तर पालिकेच्या, पंचायती निवडणुकांतही लाल बावट्याला ममतांनी सळो की पळो करून सोडले. ज्या गुंडगिरीमुळे कोणे एकेकाळी सीपीआय हा पक्ष बदनाम होता, त्याची जागा २०११ पासून ममतांनी घेतली. सीपीआयचा प्रभाव बंगालमधून हळूहळू पद्धतशीरपणे कमी करण्यात ममता यशस्वी ठरल्या. त्यासाठी साम-दाम-दंड-भेदाची रणनीती वापरत दीदींनी या कोयत्याची धारच काढून टाकली. पण, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मात्र बाजी पलटली आहे. या निवडणुकीत बंगालमध्ये पहिल्यांदा शून्यावर गोठलेल्या सीपीआयमध्ये तरीही नवचैतन्याचा संचार झालेला दिसतो. कारण, तृणमूलच्या पराभवामुळे दीदींच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या नाराजी आणि नैराश्याचे शोकाकुल वातावरण आहे. याचाच नेमका फायदा घेत, सीपीआयने प. बंगालमधील आपल्या जवळपास धुळीत माखलेल्या सर्वच कार्यालयांंची दारे पुन्हा एकदा उघडण्याचा धडाकाच लावला आहे. कुठे लालेलाल रंगरंगोटी सुरू आहे, तर काही ठिकाणी रॅली काढून शक्तिप्रदर्शनाचा प्रयत्न. त्यामुळे ‘तृणमूल’ उखडताच ‘कोयत्या’ला धार देण्याची ही राजकीय प्रकिया बंगालमध्ये सुरू झालेली दिसते. त्यामुळे कुठेतरी भाजप-तृणमूलच्या संघर्षाची धार एकीकडे तीव्र असताना, सीपीआयने २०२१च्या विधानसभा निवडणुका लक्ष्य ठेवून पक्षसंघटना बांधणीवर अधिक भर दिलेला दिसतो. दीदींची हुकूमशाही, भाजपचे हिंदुत्व याला तिसरा पर्याय म्हणून सीपीआय स्वत:ला मतदारांसमोर आणण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे बंगालमध्ये घवघवीत यश संपादित केलेल्या भाजपलाही गाफील राहून चालणार नाही. कारण, २०१९ची लढत दीदींविरोधात भाजपने जिंकली असली तरी २०२१च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलसोबतच सीपीआयमध्ये प्राण फुंकले गेल्यास दुहेरी आव्हानांचा भाजपला सामना करावा लागू शकतो.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat