मराठमोळा स्पायडरमॅन

31 May 2019 21:56:58


 

 

कोळ्यांवर संशोधन करणाऱ्या देशातील काही मोजक्या संशोधकांपैकी असलेल्या मराठमोळ्या 'स्पायडरमॅन' राजेश सानपविषयी...


मुंबई (अक्षय मांडवकर) :  पोलिसांच्या घरात जन्मलेला एक मुलगा. त्यामुळे साहजिकच त्यानेदेखील पोलिसांची वर्दी घालावी, अशी त्याच्या घरच्यांची इच्छा. परंतु, या पठ्ठ्याला जंगलाचा नाद लागला. तिथेच तो रमला. पशुपक्ष्यांपेक्षा साप, कोळी, सरडे हे त्याचे सखेसोबती झाले. कोळ्यांच्या जाळीदार विश्वात तो रममाण झाला. मुंबईतील आरे वसाहतीचे शहरी जंगल त्याचे विश्व बनले. या विश्वात खजिना शोधल्यासारखा तो कोळ्यांच्या विविध प्रजाती शोधू लागला. जनसामान्यांना किळसवाण्या वाटणाऱ्या 'कोळी' या अष्टपाद जीवावर तो संशोधनाचे काम करतो. अत्यंत दुर्लक्षित असलेले कोळ्यांचे विश्व जगासमोर उलगडण्यासाठी तो गेल्या १४ वर्षांपासून प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांमध्ये त्याने आजतागायत कोळ्यांच्या १३ नव्या प्रजातींचा शोध लावला आहे. कोळ्यांवर संशोधन करणाऱ्या देशातील काही मोजक्या संशोधकांच्या नावांमध्ये त्याच्या नावाचा समावेश होतो. हा पठ्ठ्या आहे, मराठमोळा 'स्पायडरमॅन' राजेश सानप.


 
 
 
पोलीस खात्यात असलेले विठोबा सानप यांच्या घरात १ ऑक्टोबर, १९८७ रोजी राजेशचा जन्म झाला. आरे वसाहतीच्या हरितक्षेत्राला खेटून वसलेल्या मरोळ पोलीस वसाहतीमध्ये त्याचे बालपण गेले. मरोळमधील 'इंडियन एज्युकेशन सोसायटी'च्या शाळेत त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. घरात साहजिकच वन्यजीवप्रेमाचे काही वातावरण अजिबात नव्हते. पोलिसाच्या मुलाने पोलीस खात्यामध्ये रूजू व्हावे, असे त्याच्या सभोवतालचे वातावरण होते. त्यामुळे तूदेखील पोलीस खात्यामध्येच भरती हो, असे बालपणापासून राजेशच्या मनावर बिंबविण्यात आले. मात्र, हा मुलगा जंगलांमध्येच रमला. त्याच्या शाळेच्या दिशेने जाणारी वाट ही आरेच्या जंगलामधून जाणारी होती. त्यामुळे शाळेत जाताना कुठे कोळीच बघ, सरड्यांचे निरीक्षण कर, असे 'उद्योग' करतच राजेशचे शालेय जीवन गेले. साधारण आठवी-नववीच्या कळत्या वयात आपल्याला वन्यजीव क्षेत्रातच आणि खास करून सरपटणारे प्राणी, कीटक यांच्यामध्ये रस असल्याची जाणीव त्याच्या मनात रूजू लागली. साप पकडण्यासाठी येणारा सर्पमित्र साप कशापद्धतीने पकडतो याचे तो बारकाईने निरीक्षण करू लागला आणि चक्क एका दिवशी त्याने स्वत:च साप पकडला. या घटनेने घरात विरोधी वातावरणाची ठिणगी पडली. 'असली कामं करण्यापेक्षा पोलिसात भरती हो आणि स्थिर पगाराची नोकरी बघं,' अशी बोलणी सुरू झाली. मात्र, राजेशने आपल्या आवडत्या क्षेत्रातच करिअर करण्याचा निश्चय पक्का केला होता.
 

 

राजेशचे महाविद्यालयीन शिक्षण कला शाखेत 'अर्थशास्त्र' या विषयातून पूर्ण झाले. पण, त्याचा अर्ध्याहून अधिक वेळ हा विज्ञान शाखेच्या मुलांबरोबर आणि त्यांच्या जीवशास्त्राच्या प्रयोगशाळेत जायचा. मात्र, वन्यजीव संशोधनाबाबत कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसल्याने त्याने त्यासंबंधीच्या शास्त्रीय पुस्तकांचे वाचन सुरू केले. 'बीएनएचएस'चे सदस्यत्व मिळवून त्यांच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास सुरुवात केली. 'कोळी' या अष्टपाद प्राण्यावर फारसे काही संशोधन न झाल्याचे राजेशच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने घराशेजारीच असणाऱ्या आरेच्या जंगलामधून या संधिपाद प्राण्यावर अभ्यास करण्यास सुरुवात केली. २०१० हे साल त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. आरे वसाहतीमधील हरितक्षेत्रातून त्याने 'ट्रॅप डोअर स्पायडर'मधील नव्या प्रजातीचा शोध लावला. कोळ्यांच्या विश्वात भरीव काहीतरी करण्याच्या दृष्टीने त्याने त्याविषयीची पुस्तके आणि माहिती मिळविण्यास सुरुवात केली. त्याक्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या मदतीला तो जाऊ लागला. आरेमधील शोधकार्यानंतर 'नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स' मधील (एनसीबीएस) एका विद्यार्थ्याला संशोधनकार्यात मदत करण्यासाठी राजेश बंगळुरूला रवाना झाला. राजेश सांगतो की, “वन्यजीव संशोधनामध्ये काम करण्याची खरी ऊर्मी मला 'एनसीबीएस'च्या वातावरणाने दिली.” कोळ्यांवर संशोधन करणाऱ्या त्या विद्यार्थ्यांच्या संशोधनकार्यात तो मदत करू लागला. यादरम्यान त्याचे तिथल्या वातावरणाशी आणि जंगलाशी जवळचे संबंध निर्माण झाले.
 

 
 
 या संशोधनकार्यादरम्यान कोळ्यांचे सखोल निरीक्षण करण्याची संधी त्याला मिळाली. त्याचा कल या विषयाकडे अधिक वाढू लागला. केरळ, त्रिपुरासारखे अजून काही प्रदेश त्याने कोळ्यांच्या मागे पिंजून काढले. त्याचा हा संघर्ष वाखणण्याजोगा आहे. कारण, वन्यजीव संशोधनासंबंधी कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना त्याने अत्यंत दुर्लक्षित राहिलेल्या कोळ्यांच्या प्रजातींवर प्रामाणिकपणे काम करण्यास सुरुवात केली. चिकाटी आणि मेहनत या स्वभाववैशिष्ट्यांमुळे त्याने आजवर निसर्गासाठी नव्या असलेल्या १३ कोळ्यांच्या प्रजातींचा शोध लावला आहे. त्याच्या खांद्याला खांदा लावून त्याची पत्नी अनुराधा जोगळेकरदेखील त्याला या कामात मदत करत आहे. अशा मराठमोळ्या 'स्पायडरमॅन'ला पुढील वाटचालीकरिता दै. 'मुंबई तरुण भारत'कडून शुभेच्छा!
 
 वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat


Powered By Sangraha 9.0