मलालाला मलाल वाटतो का?

    दिनांक  31-May-2019   भारताशी स्पर्धा करताना मलालाने आपल्या देशाचा आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि भौगोलिक दृष्टीनेही विचार करायला हवा होता. ६० सेकंदांच्या प्रतिकात्मक खेळात भारताची माघार झाली असेल. पण, जगाच्या व्यासपीठावर वास्तवरूपात सर्वच आघाड्यांवर भारत हा नेहमीच प्रगतिपथावर राहिला आहे.


"पाकिस्तानने ठीकठाक प्रदर्शन केले. आम्ही सातव्या स्थानावर होतो. कमीत कमी भारतासारखे सगळ्यात मागे तर नाही राहिलो." इति नोबेल पुरस्कारप्राप्त मलाला. इंग्लंडमधील क्रिकेट वर्ल्ड कप उद्घाटनाच्यावेळी सहभागी देशातील सदस्यांचा ‘६० सेकंद चॅलेंज गेम’ खेळण्यात आला. यामध्ये सर्वात कमी धावा म्हणजे १९ धावा भारताने बनवल्या. यावर मलालाला प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर तिचे हे उत्तर. यावर काय म्हणावे? मलालाने पाकिस्तानमध्ये जन्म घेतल्याची किंमत चुकवली आहे. केवळ पाकिस्तानमध्ये जन्म घेतला म्हणून तिला वयाच्या ११व्या वर्षी शिक्षणाला मुकावे लागले आणि १२व्या वर्षी धर्मांध तालिबान्यांनी तिच्यावर हल्ला केला. ‘इट हॅपन्स ओन्ली इन पाकिस्तान’च म्हटले पाहिजे. भारतामध्ये मलालाने जन्म घेतला असता तर तिला मानवी शाश्वत मूल्यांना आणि गरजांना पूरक असे वातावरण जन्मत:च मिळाले असते. पण, केवळ पाकिस्तानमध्ये जन्मली म्हणून मलालाला दहशतवादाचा बळी व्हावे लागले, तेही शिक्षणासाठी. हे मलाला विसरली असावी. भारताशी स्पर्धा करताना मलालाने आपल्या देशाचा आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि भौगोलिक दृष्टीनेही विचार करायला हवा होता. ६० सेकंदांच्या प्रतिकात्मक खेळात भारताची माघार झाली असेल. पण, जगाच्या व्यासपीठावर वास्तवरूपात सर्वच आघाड्यांवर भारत हा नेहमीच प्रगतिपथावर राहिला आहे. मग ते क्षेत्र जगभरातील मुस्लीम राष्ट्रांची परिषद असो, पाकपुरस्कृत दहशतवादी अझहर मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचे असो वा दहशवादाला ठेचून एअर स्ट्राईक करण्याचे असो, भारत हा नेहमीच सवाई राहिलेला आहे. आता मलालासारखी भारताची आणि पाकिस्तानची तुलना केली आणि मलालाच्या म्हणण्याप्रमाणे पाकिस्तान हा भारतापेक्षा आघाडीवर कुठे आहे, हे पाहिले तर, हो आहे ना पाकिस्तान विविध क्षेत्रांमध्ये भारतापेक्षा आघाडीवर आहे. सातत्याने रुपयाचे अवमूल्यन होऊन भिकारी होण्याच्या स्पर्धेत पाकिस्तान भारतापेक्षा पुढे आहे. दहशतवाद पोसून त्या दहशतवादामध्ये स्वतःही बरबाद होण्यामध्ये पाकिस्तान भारतापेक्षा नव्हे, तर जगापेक्षा पुढे आहे. भारत हा संघराज्यांनी युक्त एकसंघ देश आहे. मात्र, थोड्याच काळात पख्तून, सिंध, बलुचिस्तान वगैरे वगैरे चार तुकडे पडून जगाच्या नकाशावर लवकरच नामशेष होण्याच्या स्थितीत पाकिस्तान पुढेच आहे.

 

असो. या पार्श्वभूमीवर ‘मलाला फंड’ नावाच्या मलालाच्या वेबसाईटची आठवण झाली. त्या वेबसाईटमध्ये मलाला म्हणते की, "जगभरातल्या मुलींना हक्काचे शिक्षण मिळावे आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी मी काम करते." तिच्या कार्यासाठी तिला जगभरातून आर्थिक मदतीचा भरपूर ओघ येत असतो. मलाला या पैशातून जगभरात प्रवास करते आणि जगभरातील मुलींना न्यायही मिळवून देते, असे ‘मलाला फंड’ या वेबसाईटवर म्हटले गेले आहे. या वेबसाईटवरचे म्हणणे खरे मानले, तर जगामध्ये पाकिस्तान येतो की नाही? कारण, दिव्याखाली अंधार, त्याप्रमाणे मलालाच्या पाकिस्तानमध्ये तर मुलींची स्थिती अत्यंत दयनीय आहे. त्यातही तिथल्या अल्पसंख्याक हिंदूंच्या मुलींची स्थिती तर अत्यंत दुर्दैवी. अपहरण, बलात्कार, जबरदस्तीने लहान वयातच लग्न करणे या सगळ्या नरकयातना हिंदू अल्पसंख्याक मुलींना मलालाच्या पाकिस्तानमधले धर्मबंधू देतात. त्याही मुली आहेत. त्यांचे दुःख मलालाच्या मते दुःखच नाही की काय? की त्या हिंदू आहेत म्हणून मलालाला त्यांचे सोयरसुतक नाही? बरं, त्यांचा विषय सोडूया. पण, मलाला क्रिकेट सामना पाहायला गेली आहे. त्या खेळाचा पाकिस्तानी खेळाडू शाहिद आफ्रिदीच्या मुली तर पाकिस्तानी आणि मुस्लीम आहेत. त्यांच्याबाबत मलालाचे काय म्हणणे आहे? शाहिद आफ्रिदीला चार मुली आहेत. आफ्रिदीने आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहिले आहे की, "माझ्या मुली जन्मजात खेळाडू आहेत. पण, एक पाकिस्तानी पिता म्हणून माझ्या मुलींना मी अजिबात मैदानी खेळ, अगदी क्रिकेटसुद्घा खेळू देणार नाही. कारण, ते समाज आणि मुस्लीम धर्माच्या विरोधात आहे." जागतिक स्तरावर खेळाडू असलेल्या व्यक्तीने आपल्या मुलींच्या अभिव्यक्ती आणि एकंदरच प्रगतीवर बंदी घालण्याचे ठरवून टाकावे, हे केवळ पाकिस्तानमध्येच होऊ शकते. दडपशाही, धर्मांधता आणि लैंगिक असमानता याचे हे उत्तम उदाहरण. यामध्ये मलालाला काही मलाल वाटतो का?

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat