'मोदी सरकार-२'चा आज शपथविधी; ८ हजार पाहुणे राहणार उपस्थित

    दिनांक  30-May-2019
नवी दिल्ली : देशभरात भाजप आणि एनडीएला मिळालेल्या घवघवीत यशानंतर नरेंद्र मोदी आज दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्याला जगभरातुन तब्बल ८ हजार पाहुणे उपस्थित असणार आहेत. यात विविध चौदा देशांचे प्रमुखही उपस्थित राहणार आहेत.

 

राष्ट्रपती भवनात आज सायंकाळी ७ वाजता हा शपथविधी पार पडणार असून या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हा मोदीसरकार-२ चा हा शपथविधी राष्ट्रपती भवनातील आतापर्यंतचा सर्वात मोठा शपथविधी सोहळा असणार आहे.

 

सायंकाळी ७ वाजता नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची शपथ घेतील. यावेळी मोदींसोबतच मंत्रिमंडळातील इतर सदस्यही यावेळी शपथ घेणार आहेत. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह उपस्थित राहणार आहेत.

 

याशिवाय पश्चिम बंगालच्या हिंसाचार झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबासह पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबालाही या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat