‘ती’ची जिद्द सुवर्णविजयाची...

    दिनांक  30-May-2019   
एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रिंकीने स्वप्न पाहण्यासाठी कोणतीही ठराविक वेळ किंवा परिस्थिती नसते, हे दाखवून दिले. तिच्या या सुवर्णविजयाची कहाणी...

 

रिंकी शाह... एक सर्वसामान्य शालेय विद्यार्थिनी. मात्र, जेव्हा ती ज्युडोच्या मैदानात उतरते, तेव्हा भल्याभल्या निष्णात खेळाडूंना अवाक करून सोडेल असे कौशल्य तिने विकसित केले आहे. ‘कटामे-वाझा’ (ग्रॅपलिंग) व ‘नागे-वाझा’ (थ्रोंग) या खेळप्रकारात तिने मिळवलेल्या प्राविण्याद्वारे पहिल्याच स्पर्धेत सुवर्णपदकाची मानकरी होण्याचा बहुमान तिने मिळवला होता.

 

एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या रिंकी शाहने विलेपार्ले येथील हिंदी म्युनिसिपल स्कूलमध्ये आयोजित केलेल्या एका उन्हाळी शिबिरात ज्युडोमध्ये प्रवेश केला. सुरुवातीच्या प्रशिक्षणानंतर तिला या खेळाची आवड निर्माण झाली. आपल्या आवडीच्या क्षेत्रात झोकून देण्याचा निर्णय तिने घेतला आणि नियमित व शिस्तबद्ध सराव सुरू केला. सरावानंतर स्वतःला आजमावायची वेळ आली होती. त्यामुळे थेट स्पर्धेत उतरण्याची तयारी तिने केली.

 

नोव्हेंबर, २०१८ मध्ये कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत विजयी खेळाडूला राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार होती. त्यासाठी रिंकीने सरावाचा वेळ दुप्पट केला आणि आणखी मेहनत घेण्यास सुरुवात केली. स्पर्धेचा दिवस उजाडला आणि तिची मेहनत फळाली आली. पहिल्या स्पर्धेत तिला सुवर्णपदक मिळाले. ठरल्याप्रमाणे ती डिसेंबरमध्ये झारखंडच्या रांची येथे झालेल्या राष्ट्रीयस्तरावर स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र ठरली आणि कांस्यपदक आपल्या नावावर केले.

 

एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रिंकीने स्वप्न पाहण्यासाठी कोणतीही ठराविक वेळ किंवा परिस्थिती नसते, हे दाखवून दिले. पार्ल्यातील छोट्याशा घरात राहणार्‍या शाह कुटुंबीयांनी रिंकीसह इतर दोन मुलांची जबाबदारी असतानाही मुलीच्या जिद्दीपुढे परिस्थिती आड येऊ दिली नाही. रिंकीने आता राष्ट्रीय ज्युडो चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. पुन्हा अजिंक्य राहण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. “एक दिवस मला ऑलिम्पिक्समध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करायचे आहे आणि माझ्या देशाचे आणि कुटुंबाचे नाव उंच करायचे आहे,” असा तिचा निश्चयाचा सूर आहे.

 

केवळ ज्युडोतच नव्हे, तर रिंकी ही उत्तम व मेहनती विद्यार्थिनीही आहे. खेळाच्या सरावात व्यस्त असूनही ती अभ्यासालाही तितकेच महत्त्व देते. वडील रिक्षाचालक आणि तिची आई घरकाम करते. यामुळे कोवळ्या वयातच तिला घरातील परिस्थितीची पूर्णपणे जाणीव आहे. बेताचे उत्पन्न असल्याने तिच्या वडिलांनी तिच्या खेळाचा खर्च भागवण्यासाठी एका ट्रस्टची मदत घेतली. रिंकीने ‘के. सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट’च्या ‘नन्ही परी’ची लाभार्थी आहे. १९९६ मध्ये सुरू झाला आणि तो मुलींच्या शिक्षणासाठी व मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी काम करतो. या प्रकल्पामुळे तिला अभ्यास करण्यासाठी आणि खेळामध्ये पुढे जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निरोगी आहार घेण्यासाठी मदत होते. कारण, तिच्या पालकांना हा खर्च करणे शक्य नव्हते.

 

रिंकीचे पालक शिक्षणाचे व खेळाचे महत्त्व समाजातील अन्य पालकांना आज आवर्जून समजावून सांगतात. भारतीय पालकांची मानसिकता अजूनही खेळांमध्ये भवितव्य घडवण्याची तितकीशी दिसत नाही, याची खंत त्यांना आहे. अभ्यासाबरोबरच मुलांनी खेळाकडे वळायला हवे, त्यासाठी ते मार्गदर्शन करत असतात.प्रकल्प ‘नन्ही परी’चा एक भाग असल्याने रिंकीला तिच्या अभ्यासामध्ये मोठी मदत झालीच, शिवाय तिला तिचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठीही बळ मिळाले.

 

महिंद्रा समूहाच्या सीएसआरच्या वरिष्ठ उपाध्यक्ष व ‘के. सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट’च्या कार्यकारी संचालिका शीतल मेहता यांनीही रिंकीच्या पंखांना बळ देण्यासाठी मदतीचा हात कायम तत्पर ठेवला. गरिबीतून बाहेर येण्यासाठी व स्वाभिमानाने जगण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे साधन असल्याचे ओळखत रिंकीने शिक्षणही सुरू ठेवले आहे.

 

रिंकीची चिकाटी व उत्कृष्ट खेळाडू होण्याची महत्त्वाकांक्षा आहे. योग्य संधी आणि पोषक वातावरण मिळाल्यास यशाच्या शिखरावर पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, हे रिंकीने दाखवून देत तिच्यासारख्या अनेकांसमोर उदाहरण ठेवले आहे. रिंकीची महत्त्वाकांक्षा केवळ खेळामध्ये यश मिळवण्यापुरती मर्यादित नाही, तिला अभ्यासातही पुढे जायचे आहे. ‘के. सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट’च्या एका सर्वेक्षणातून ७४ हजार मुलींच्या सर्वेक्षणानुसार ७० टक्के मुलींना उच्च शिक्षण घेण्याची इच्छा आहे.

 

७४.३० टक्के मुलींना शिक्षण आणि नोकरी दोन्ही करण्याची इच्छा आहे. देशात महिला सशक्तीकरण व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे. रिंकीच्या मते, “ही आकडेवारी बोलकी असून मला आणि माझ्यासारख्या ‘नन्ही परी’ या प्रकल्पाचा हिस्सा असणार्‍या सार्‍याजणींच्या महत्त्वाकांक्षा सांगणारी आहे.” रिंकू आणि तिच्यासारख्या अनेक सावित्रीच्या लेकींना भरारी घेण्यासाठी बळ मिळो हीच सदिच्छा...!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat