वॉटर कपसाठी श्रमदान करणाऱ्यांवर हल्ला

03 May 2019 14:08:04


 


मनमाड : नाशिकच्या चांदवड तालुक्यात 'पाणी फाऊंडेशन' अंतर्गत श्रमदान करणाऱ्या गावकऱ्यांवर आदिवासींच्या जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात चार जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी चांदवडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यामुळे नागरिकांनी भयभीत होऊन तेथून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच चांदवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंके यांच्यासह पोलीस कर्मचारी दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी तेथील जमावावर नियंत्रण मिळवले आहे.

 

चांदवड तालुक्यातील मतेवाडी येथील वनविभागाच्या हद्दीत स्थानिक नागरिक 'पाणी फाउंडेशन' अंतर्गत जल व्यवस्थेचे काम करत होते. याच वेळी वनविभागाच्या हद्दीत अतिक्रमण केलेल्या दीडशे ते दोनशे आदिवासी नागरिकांनी या नागरिकांवर दगडफेक करत हल्ला केला. या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले असून हल्लेखोरांनी सात मोटरसायकल जाळून टाकल्या आहेत. तसेच चर खोदणाऱ्या पोकलॅण्डची तोडफोड केली आहे. तर पाणी फाउंडेशनच्या एका कार्यकर्त्याला कुऱ्हाडीच्या सहाय्याने मारहान केली आहे. या हल्ल्यात भाऊराव चव्हाण ,संतोष बबन मते ,सुरेखा मते ,मुन्ना शहा पोकलँड चालक यांच्यासह इतर काही जण जखमी झाले आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0