‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’चा मराठी मानकरी

    दिनांक  03-May-2019   
कलेची साधना करत असतानाच सामाजिक भान जपणार्‍या मंदार वैद्य यांना ऑस्ट्रेलिया सरकारतर्फे दिला जाणारा सर्वोच्च सन्मान नुकताच मिळाला आहे. त्यांच्याविषयी...

ऑस्ट्रेलिया सरकारतर्फे दिला जाणारा मानाचा ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हा पुरस्कार यंदा मुंबईतील विलेपार्ल्यातील मंदार वैद्य यांना मिळाला आहे. ऑस्ट्रेलियात नाट्य व सामाजिक क्षेत्रात आपल्या कामाचा जबरदस्त ठसा उमटवणार्‍या मंदार वैद्य यांना हा बहुमान मिळाला आहे. महाराष्ट्रासाठी आणि किंबहुना पार्लेकरांसाठी ही नक्कीच अभिमानाची गोष्ट ठरली. ऑस्ट्रेलियातील हा मानाचा पुरस्कार मराठी माणसाला मिळाल्याने नाट्यक्षेत्र आणि सामाजिक क्षेत्रातूनही वैद्यांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हा मानाचा पुरस्कार ऑस्ट्रेलियात विविध क्षेत्रातील बहुमूल्य योगदान देणार्‍यांना प्रदान करण्यात येतो.

 

मंदार वैद्य यांचे कुटुंब मूळचे पार्लेकर. त्यामुळे त्यांच्यावर पार्ल्यातील मराठी मातीचे संस्कार झाले. बालपणी शिक्षणासह विलेपार्ले येथील रामानंद संकुल येथे त्यांची अभिनयाशी तोंडओळख झाली. बालपणापासूनच ते अभिनयाचे धडे गिरवू लागले. पुढील शिक्षणासाठी विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. तिथे त्यांची ओळख विक्रम वाटवे यांच्याशी झाली. अभिनय क्षेत्राला आपले ध्येय मानत आनंदाने विक्रम गुरूजींच्या मार्गदर्शनाखाली नाट्यशास्त्र शिकण्यास सुरुवात केली. बालपणी नाटकाची तालीम संपल्यावरही आईसमोर ते नाटक सादर करून दाखवत. तासन्तास नाटक पाहण्यात त्यांचे बालमन रमत असे. परिणामी, मराठी रंगभूमीसाठी जागतिक पातळीवर योगदान देणारा एक अवलिया घडणार होता.

 

महाविद्यालयांतील एकांकीका, नाट्यस्पर्धा आणि प्रायोगिक रंगभूमीवर मंदार यांनी सहभाग घेण्यास, स्वतःवर प्रचंड मेहनत घेण्यास सुरुवात केली. या सार्‍या पसार्‍यात त्यांनी कधीही शिक्षण मागे पडू दिले नाही. मुंबई विद्यापीठाद्वारे आयोजित केल्या जाणार्‍या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत, त्यामध्ये त्यांनी यशस्वीपणे भूमिका बजावली. याची पोचपावती म्हणजे त्याकाळी मंदार यांना मिळणारी बक्षिसे आणि प्रदान केले जाणारे विविध पुरस्कार.

 

१९९२ मध्ये भवन्स महाविद्यालयात ‘कोपवुड सर्वोत्कृष्ट अभिनेता’ हा पुरस्कार त्यांना मिळाला होता. १९९४ मध्ये विद्यापीठाच्या शेवट्या वर्षी त्यांनी ‘भूमी के कौए’ (हिंदी), ‘आम्ही लटिके न बोलू’ (मराठी), ‘प्रतिबिंब’ (हिंदी आणि मराठी) आदी नाटके साकारली होती. त्यांच्या गटाने आजवर अडीचशेहून अधिक यशस्वी प्रयोग केले. त्यात प्रामुख्याने ‘पृथ्वी थिएटर,’ ‘टाटा नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स’ आदींसह महाराष्ट्र आणि दिल्लीतील दौरेही त्यांनी केले आहेत. 

 

पुढील शिक्षणासाठी त्यांनी ऑस्ट्रेलियाला जाण्याचा निर्णय घेतला. तेथील स्वीन बर्न विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. विपणन क्षेत्रात एमबीए केल्यानंतर २००० मध्ये त्यांनी माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील पदविका पूर्ण केली. तिथे त्यांना डेटा अ‍ॅनालिसिस्ट कंपनीत नोकरी मिळाली. त्यानंतर ते तिथेच स्थायिक झाले. सुरुवातीला मंदार यांनी महाराष्ट्रातील काही मंडळींना सोबत घेत संगीत-नृत्याचे कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली. तिथे मिळालेला प्रतिसाद पाहिल्यानंतर त्यांनी नोकरीसह विविध नाट्यक्षेत्रातील आपले काम सुरूच ठेवले. मंदार यांच्या मुख्य मार्गदर्शनात ऑस्ट्रेलियात ‘कलाविष्कार’ ही ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर चालणारी संस्था सुरू केली. याअंतर्गत त्यांनी नाट्य, दिग्दर्शन, निर्मिती, अभिनय आदी क्षेत्रात काम सुरू ठेवले. नाट्य क्षेत्रात काम करणारे लेखक, दिग्दर्शक, अभिनय, निर्मिती आदी क्षेत्राशी निगडित प्रशिक्षण देण्याचे काम ही संस्था करते.

 

सातासमुद्रापार आपल्या कलेसाठी काम करत असताना त्यांनी ३६ नाटके, सहा नाट्य कार्यशाळा आणि दोन एकपात्री नाटके सादर केली आहेत. कलेसाठी वाहून घेणार्‍यांपैकी हा एक मराठमोळा चेहरा कोणत्याही प्रसिद्धी किंवा मोबदल्याविना आपले योगदान देत आहे. समाजाप्रति आपले दायित्व निभावण्यासाठी सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा हातभार राहिला आहे. ऑस्ट्रेलियात ‘गुड फ्रायडे अपीलया सामाजिक चळवळीद्वारे त्यांनी २० हजार डॉलर्सचा निधी उभा केला. कलेतून मिळणारा मोबदलाही समाजकार्यासाठी अर्पण करत त्यांनी या क्षेत्रासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. आजवर ‘वनवासी कल्याण आश्रम,’ ‘साल्वेशन आर्मी,’‘कॅन्सर कौन्सिल, ’ ‘फ्रेण्डस् ऑफ चिल्ड्रन हॉस्पिटल फाऊंडेशन’ आदी सामाजिक संस्थांसाठी निधी उभारणी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. आपल्या कमाईचा काही हिस्सा नेहमी दान करण्याच्या हेतूने त्यांनी हे कार्य गेली कित्येक वर्षे अविरत सुरू ठेवलं. परिणामी, ऑस्ट्रेलिया सरकारलाही त्याची दखल घ्यावी लागली.

 

गेली १५ ते २० वर्षांची त्यांची कारकीर्द घडवण्यामागे त्यांच्या मित्रपरिवाराचाही मोलाचा वाटा असल्याचे ते आवर्जून सांगतात. या कामाचे श्रेयही ते त्यांनाच देऊन आपण मात्र नामनिराळे राहतात. त्यांच्या याच स्वभावामुळे आजवर शेकडो हात त्यांच्यामागे उभे राहिले आहेत. या सार्‍यांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे स्वप्न मंदार यांनी पाहिले. त्यांना ‘नाट्यदर्पण’ या संस्थेचा पसारा आता जगभरात पोहोचवायचा आहे. याच ध्येयावर ते आणि त्यांची टीम काम पाहणार आहे. मराठी रंगभूमीच्या जगभरातील रसिकांना एकसंध ठेवणे, त्यांचे मनोरंजन करणे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आजवर त्यांनी काम केले आहे. रंगभूमी हा जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून अहोरात्र त्यासाठी ते मेहनत घेत असतात.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat