पुराचित्रांचे ‘भीम’संशोधक पद्मश्री डॉ. हरिभाऊ वाकणकर

    दिनांक  03-May-2019


मानववंशाचा हजारो-लाखो वर्षांचा प्राचीन इतिहास, अश्मयुगापासून घडत आलेली त्याची वाटचाल हा नेहमीच सामान्यजनांच्या कुतूहलाचा व शास्त्रज्ञांच्या संशोधनाचा विषय राहिला आहे. भारतातही मानवाच्या प्राचीन इतिहासाच्या खुणा अनेक ठिकाणी सापडल्या आहेत. प्रमुख भारतीय पुरातत्त्व संशोधकांपैकी ज्यांचं नाव अतिशय आदरानं जगभर घेतलं जातं, असे डॉक्टर हरिभाऊ तथा विष्णु श्रीधर वाकणकर यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या प्रचंड कार्याचा आढावा घेणारा हा लेख...

हरिभाऊंचा जन्म मध्यप्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील निमच या गावात ४ मे, १९१९ रोजी झाला. वाकणकर परिवाराचा आठ पिढ्यांचा इतिहास उज्जैनमध्ये उपलब्ध आहे. आर्थिक स्थिती फारशी मजबूत नसली तरी, समाज व राष्ट्राप्रति प्रेम या घराण्यात फार पूर्वीपासून दिसून येते. हरिभाऊंना चित्रकला व इतिहास या विषयांतील विशेष आवडीमुळे त्यांनी शालेय शिक्षणानंतर प्रथम मुंबईला जीडी आर्ट्स व नंतर उज्जैनला विक्रमशीला विद्यापीठात शिक्षण घेतलं. उच्च शिक्षणानंतरही योग्य नोकरी न मिळाल्यामुळे उज्जैनमध्येच त्यांनी काही काळ एक आर्ट सेंटर चालवलं. मग काही काळ मुंबईला एका संग्रहालयामध्ये नोकरी केली. परत उज्जैनलाच ते विक्रमशीला महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यांना मुळात असलेली इतिहास व पुरातत्त्व शाखांची आवड स्वतंत्र संशोधनासाठी खुणावत होती. कालिदासाने ‘मेघदूता’ची रचना ज्या ठिकाणी केली, त्या ‘रामगढ’ या ठिकाणाचा (रामगिरी पर्वत) संशोधनपर अभ्यास व्हावा व तेच हे ठिकाण आहे का, हे सिद्ध करता यावे, या हेतूने हरिभाऊंनी तिथे जाऊन त्या परिसराचा अभ्यास सुरू केला. तिथे त्यांना आश्चर्यकारक खुणा सापडल्या.

रामगिरी पर्वतावर त्यांना स्वच्छ पाण्याचे सरोवर आढळले. हरिभाऊंनी तो सारा परिसर व डोंगर पालथा घातला. रामगिरीच्या पायथ्याशी त्यांना एक गुहा आढळली. त्या गुहेच्या डाव्या बाजूवर ’मेघदूत’ असं कोरलेलं आढळलं. उजवीकडे ’सुतनुका’ असं लिहिलं होतं. तसंच वर चढत गेल्यावर एका जागी ’कालिदासम्’ अशी अक्षरं खोदलेली सापडली. या सार्‍यावरून त्यांनी कयास बांधला की, याच ठिकाणी ‘मेघदूत’ लिहिलं गेलं असावं. कालांतराने अधिक संशोधनानंतर कालिदासाने वर्णन केलेली भौगोलिक स्थिती, हवामान, मार्ग या सार्‍याचा अभ्यास होऊन ‘हेच ते स्थान’ यावर संशोधकांनी शिक्कामोर्तब केलं. उज्जैनजवळ दंतेवाडा गावात सुरू असलेल्या उत्खननातदेखील त्यांनी प्रचंड परिश्रम केले. त्या दरम्यान त्यांचे मध्यप्रदेशात सतत प्रवास सुरूच होते. १९५८ साली भोपाळ ते इटारसी प्रवासात बाहेर दिसणार्‍या डोंगरांचे निरीक्षण करताना, त्यात त्यांना काही गुहासदृश पोकळ्या दिसून आल्या.

सहप्रवाशांना विचारले असता, त्या जागेला ’भीमबेटका’ (भीम बसत असे ती जागा) म्हणतात अशी माहिती मिळाली. हरिभाऊंची उत्सुकता त्यांना स्वस्थ बसू देईना. तिथे जाण्यासाठी कोणताच अन्य मार्ग नाही व वन्य प्राण्यांच्या भीतीनं आजवर तिथं कोणीही गेलेलं नाही, अशी माहिती मिळाल्यावर त्यांनी तिथेच उतरण्याचा निर्णय घेतला. पुढील स्थानकाकरिता गाडीचा वेग मंदावताच त्यांनी गाडीतून उडी मारली व ते त्या डोंगरांच्या दिशेने निघाले. खूप पायपीट केल्यानंतर त्या पोकळ्यांपर्यंत ते पोहोचू शकले.

भोपाळच्या दक्षिणेला रायसेन जिल्ह्यातले ‘भीमबेटका’ हे अज्ञात ठिकाण मानववंशाच्या इतिहासाच्या किती महत्त्वाच्या खुणा सांभाळत आहे, हे तोवर कोणालाच ज्ञात नव्हतं. हरिभाऊ तिथे गेले तेव्हा त्यांना लक्षात आले की, या पोकळ्या म्हणजे प्राचीन गुहा आहेत. कोणत्याही सोयी-सुविधा नव्हत्या, त्या काळीही हरिभाऊ सलग १५ वर्षं तिथं जात राहिले. त्यांचे अभ्यास व संशोधन कार्य सुरुच होते. त्यावेळी त्या जंगलात भोजनाची काही व्यवस्था होणं शक्यच नव्हतं. हरिभाऊ जाताना सोबत बटाटे घेऊन जात. ते तिथे पोहोचताच वाळूत पुरून ठेवत व काम करत राहत. थोड्या वेळानंतर ते वाळूतल्या उष्णतेमुळे आपोआप भाजले जात. त्यावर त्यांची गुजराण होई. त्या परिसराचा इतिहास उजेडात आणण्याकरिता त्यांनी अतिशय खडतर परिश्रम घेतले. त्या गुहांमध्ये त्यांना भिंतींवर, छतावर रंगवलेली प्राचीन चित्रं आढळली. वनस्पतीजन्य वा खनिज रंगात रंगवलेल्या चित्रांचा अक्षरशः खजिनाच त्या गुहांमध्ये त्यांना सापडला. विंध्यपर्वताच्या कुशीत, घनदाट जंगलातील सात डोंगरांमध्ये विखुरलेल्या ७५० गुहांमधल्या ५००च्या वर गुहांमध्ये चित्रं होती. चित्रं प्रामुख्याने लाल व पांढर्‍या रंगात रंगवलेली होती. काही काही ठिकाणी हिरव्या व लाल रंगांचे ठिपके होते.

चित्रांत शिकारीचे प्रसंग होते. त्यात भाला, काठी अशी अवजारं आणि वाघ, हरीण, घोडे, हत्ती असे प्राणीही चित्रित केलेले होेते. काही धार्मिक अशी चिन्हं, समूहनृत्यं व अन्य काही व्यवहारदेखील चित्रांत दिसत होते. मानवी जीवनाच्या विकासाचा जणू आरंभबिंदूच या शैलाश्रयांमध्ये नांदत होता! त्याचं पुरातत्त्वीय महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी ती गुहाचित्रं प्रकाशात आणण्याचं ठरवलं. हरिभाऊ स्वतः अतिशय उत्तम चित्रकार होते. त्यांनी चित्रकलेच्या काही विद्यार्थ्यांना सोबत घेऊन त्या गुहाचित्रांच्या प्रतिकृती बनवल्या. परंतु, याचं रीतसर संशोधन होणं गरजेचं आहे, हे ध्यानात घेऊन त्यांनी त्यांचे मार्गदर्शक प्राध्यापक प्रा. सांकलिया (ज्यांनी रामायणाची कालनिश्चिती केली.) यांच्या मार्गदर्शनाखाली या गुहाचित्रांवर पीएच.डी पूर्ण केली. भारतीय पुरातत्त्व खात्याने ऑगस्ट १९९० मध्ये भीमबेटका ‘राष्ट्रीय वारसा स्थळ’ घोषित केलं. ‘कार्बन डेटिंग’ पद्धतीने या गुहांचा व चित्रांचा काळ शोधला असता, ते शैलाश्रय अश्मयुगीन असल्यचे लक्षात आले. त्या परिसरात आजूबाजूच्या २१ खेड्यांमध्ये अनेक अवशेष विखुरलेले आहेत. त्यात काही किल्ल्यांच्या भिंती, लघुस्तूप, पाषाण भवने, गुप्तकालीन अभिलेख, परमारकालीन मंदिरांचे अवशेष असा पाषाणयुगापासून ते ज्ञात ऐतिहासिक काळापर्यंतचा मानवइतिहासाचा मोठा आलेख सापडतो.

फ्रान्समध्ये भरलेल्या पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या एका परिषदेत त्यांनी सर्वप्रथम आपले संशोधन व त्या चित्रांच्या प्रतिकृती सादर केल्या होत्या. युरोप-अमेरिकेतही अनेक ठिकाणी या चित्रांची प्रदर्शनं व त्याला जोडून व्याख्याने असे अनेक कार्यक्रम हरिभाऊंनी केले. रीतसर संशोधन प्रक्रियेनंतर ‘युनेस्को’ने त्यांच्या संशोधनाला मान्यता दिली व भारतातील ‘भीमबेटका’ हे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलंचंबळ व नर्मदा खोर्‍याचे सर्वेक्षण, नावडातिलि (१९५५), महेश्वर (१९५४), इंग्लंड (१९५९), पनोटी आवरा (१९६०) कायथा, मंदसोर, दांगवाडा इ. पुरातत्त्वीय संशोधनांमध्येही हरिभाऊंचा मोठा वाटा होता. इंग्लंड व फ्रान्समधील उत्खनन कामांतही त्यांनी भाग घेतला.

जवळजवळ ५० वर्षं जंगलात पायी हिंडून त्यांनी हजारो चित्रगुंफा शोधल्या. त्यांच्या चित्रप्रतिकृती बनवून त्याची देशविदेशात प्रदर्शनं भरवली. व्याख्यानं दिली, लेख लिहिले. एकूण २५० हून अधिक संशोधनपर निबंध त्यांच्या नावावर जमा आहेत. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. त्यापैकी 'Rockart of Bhimbetka' हे पुस्तक त्यांनी ऑस्ट्रेलियन अभ्यासक Lothar Wanke यांच्या सहकार्याने लिहिलंअजून एक रोचक सत्य उजेडात येण्यासाठी हरिभाऊ कारणीभूत ठरले. ते एकदा लंडनमधील म्युझियमच्या भेटीवर होते. तिथे त्यांना राजा भोज याच्या दरबारात असलेली सरस्वतीची मूर्ती दिसली. हरिभाऊ त्या मूर्तीचे बारकाईने निरीक्षण करण्यात गुंतले. त्यांच्या लक्षात आलं की, मुस्लीम आक्रमणात क्षतिग्रस्त झालेली हीच ती मूर्ती. त्याच ठिकाणचे रहिवासी असलेले हरिभाऊ सारा इतिहास आठवून भावूक झाले. दुसर्‍या दिवशी ते पुन्हा एक फूल घेऊन गेले. ते वाहून नमस्कार करताना पाहून तेथील प्रमुखाने त्यांची चौकशी केली. हरिभाऊंची ओळख पटताच त्याने स्वतःहून त्यांना एका खास दालनात नेले. तिथे फक्त संशोधकांना प्रवेश होता. त्या खोलीत अनेक डायरी होत्या. भारताला भेट दिलेल्या प्रवाशांच्या या नोंदी आहेत असं त्यानं सांगितलं.

 

हरिभाऊंना त्यात चक्क ‘वास्को-द-गामा’ची रोजनिशी मिळाली. त्यात त्याने भारताच्या सुवर्णभूमीचा शोध घ्यावा असं का वाटलं, तिथं जाण्यास कोणी मदत केली, कसा मार्ग शोधला वगैरे बाबी नोंदिवल्या होत्या. त्या नोंदींवरून असा शोध लागला की, वास्को-द-गामाला एक खुद्द भारतीय व्यापारीच भेटला, जो स्वतःचे जहाज घेऊन नियमित व्यापार करत असे. त्यानेच गामाला मार्ग दाखवला. भारताचे अस्तित्व व इथली संस्कृती प्राचीनतम आहे, हे सप्रमाण सिद्ध करण्यात हरिभाऊंचं खूप मोठं योगदान आहे. आर्य-द्रविड आक्रमण सिद्धांतही खोटा व दूषित असल्याचे हरिभाऊंनी ग्रंथ लिहून सप्रमाण सिद्ध केलं.

सरस्वती नदीचं स्थान भारतीय संस्कृतीत मोलाचे आहे. ऋग्वेदांतील ऋचांमध्येदेखील ’अंबीतमे’, ‘नदीतमे’, ‘देवीतमे’, ‘सरस्वती’, ‘अन्नवती’, ‘उदकवती’ असे तिचे उल्लेख आहेत. सरस्वती व तिचं लुप्त होणं हे मिथक नसून ऐतिहासिक व भौगोलिक सत्य आहे, हे सिद्ध करण्याकरिता अनेक देशी-विदेशी संशोधकांनी काही काम केले होते. या सर्वांचा आधार घेत हे काम पुढे न्यावे याकरिता मोरोपंत पिंगळे यांच्या सूचनेनुसार १० फेब्रुवारी, १९८३ रोजी कुरुक्षेत्र येथे एक चर्चासत्र आयोजित केले. त्यात ’सरस्वती नदी अध्ययन केंद्रा’ची स्थापना झाली. या समितीचे संयोजक म्हणून हरिभाऊंची नियुक्ती झाली. हरिभाऊंच्या ’सरस्वती नदी शोध अभियान’ या संशोधन प्रकल्पातून सरस्वतीचा प्रवाह, तिच्या काठची संस्कृती, याचा शोध घेणं सुरू झालं. या प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेऊन सरस्वती नदीचा मार्ग शोधण्याकरिता ‘इस्रो’ने साहाय्य केले. आदिबिद्री या सध्या पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रांतापासून, कच्छ व गुजरातच्या रणांमधून असा जवळजवळ चार हजार किलोमीटरचा प्रदेश हरिभाऊंच्या चमूनं पालथा घातला. पुरातत्त्व शास्त्रज्ञ, भूवैज्ञानिक, हिमालय अभ्यासक, तज्ज्ञ छायाचित्रकार, लोककला अभ्यासक यांचा समावेश या चमूत होता. या यात्रेत त्यांनी अनेक अवशेष एकत्र केले व उज्जैन विद्यापीठासमोर ठेवले. तिथून सरस्वती नदीवरील संशोधन प्रकल्पांना अधिक गती मिळाली.

हरिभाऊंच्या संपूर्ण आयुष्यात या संशोधन कार्यासोबतच सामाजिक कार्यातील सक्रिय सहभागाचा प्रवाहदेखील तितक्याच ठळकपणे वाहत होता. तरुण वयात स्वातंत्र्य सैनिक असलेल्या हरिभाऊंनी नंतर रा. स्व. संघाचे प्रचारक म्हणून व काही काळ अ. भा. विद्यार्थी परिषदेचे मध्यप्रदेश प्रांताचे अध्यक्ष म्हणून काम केले. १९६६ साली प्रयाग येथे झालेल्या विश्व हिंदू संमेलनाकरिता एकनाथजी रानडे यांच्या विनंतीनुसार प्रदर्शनी विभाग सांभाळण्याकरिता ते गेले. त्यांची कलासक्त वृत्ती व सौंदर्यदृष्टी याचा पुरेपूर वापर त्यांनी संमेलनात केलात्यानंतर अशा मोठ्या संमेलनांत त्यांची ती जबाबदारीच होऊन गेली. त्यानंतर त्यांनी भारतीय संस्कृती, कला व इतिहास या विषयावर व्याख्याने देत देश-विदेशात भरपूर प्रवास केला. १९८१ साली ’सा कला या विमुक्तये’ अर्थात, ’कला तीच जी बंधमुक्त करते’ हा विचार घेऊन ललितकला क्षेत्रात काम करणारी ’संस्कार भारती’ ही संघटना सुरू झाली. तिचे संस्थापक महामंत्री म्हणूनही हरिभाऊंनी काम पाहिले. काही काळ ते संघाचे प्रांत बौद्धिक प्रमुखही होते. संघाशी असलेली आपली बांधिलकी त्यांनी कधीच नाकारली वा लपवली नाही. त्यांच्या पीएच.डीवेळी समितीतील एका सदस्याने त्यांना सांगितले, ’‘तुमच्या प्रबंधातील संघाचा उल्लेख तेवढा काढून टाका.” त्यावर ते उत्तरले, ‘’तुम्ही मला पीएच.डी दिली नाहीत तरी हरकत नाही. पण, माझ्या संपूर्ण संशोधनात मला साहाय्यभूत ठरलेल्या माझ्या संघबंधूंचे ऋण मी कसं नाकारू?”

एका मुलाखतीत त्यांनी आपले संशोधनातले असे काही अनुभव सांगितले आहेत. ते म्हणत की, “पुरातत्त्वशास्त्राच्या दृष्टीने भारतात उत्खननात सापडलेल्या वस्तू या इंग्लंड वा फ्रान्समध्ये मिळालेल्या वस्तूंपेक्षा कितीतरी मौल्यवान आहेत. परंतु, आपल्या देशात सरकार वा सामान्य माणसाला या संशोधनाचं महत्त्व कळत नाही. आजूबाजूचे रहिवासी अशा ठिकाणांचे नीट जतन करत नाहीत. भीमबेटका जगप्रसिद्ध झाल्यानंतरही सरकारला त्याची फारशी जाण नव्हती. एकदा एक जपानी संशोधकांचा चमू भीमबेटका शोधत भारतात आला. आल्या आल्या त्यांनी सरकारी खात्यात चौकशी केल्यावर त्यांना ’अशी काही जागा इथं नाही’ असं उत्तर मिळालं होतं.” सरकार हरिभाऊंना संशोधनाकरिता आर्थिक साहाय्य(?) करत होतं, वर्षाला अवघे दहा हजार! त्याचवेळी अमेरिकेतून आलेल्या एका विद्यार्थिनीला प्रवासखर्चाव्यतिरिक्त दीडलाख रुपये अनुदान मिळत होतं. हरिभाऊ गंमतीनं म्हणत, ’‘मी तहान-भूक विसरून उपाशीपोटी संशोधन करावं अशी सरकारची अपेक्षा आहे.” ते असल्या अडचणींनी कधीच थांबले नाहीत. संशोधनाची अनिवार ऊर्मी व गरजा कमीतकमी ठेवून काम करण्याची वृत्ती यामुळे त्यांच्या हातून इतकं पर्वतप्राय काम उभं राहिलं.
 

संघपरिवाराव्यतिरिक्त त्यांच्या अभ्यासविषयाशी संबंधित अनेक संस्थांवर त्यांनी काम केलं. भारत कला भवन, ललित कला संस्था, शैलाश्रय कला संस्था, विक्रम विद्यापीठ उज्जैनचा उत्खनन विभाग यांचे संचालक, इतिहास संकलन समिती, मध्यप्रदेश व गुजरातचे अध्यक्ष अशा अनेक मार्गांनी त्याचं काम अव्याहत सुरू होतं. त्यांना संशोधनाकरिता दोराबजी टाटा ट्रस्टचे अनुदान मिळाले होते. १९६१ ते १९६३ या काळात फ्रान्स सरकारची शिष्यवृत्तीदेखील त्यांना मिळाली होतीहरिभाऊंची राहणी अत्यंत साधी होती. पॅरिसमधील मुक्कामात ते हाताने स्वयंपाक करून जेवत. त्यांच्या मौलिक संशोधनाबद्दल १९७५ साली त्यांना भारत सरकारनं ‘पद्मश्री’ देऊन गौरवलं. कदाचित आपणच दिलेल्या ‘पद्मश्री’ची आठवण झाल्यामुळे असेल; पण “आणीबाणीत मला सरकारने मुळीच हात लावला नाही,” असं ते गंमतीनं म्हणत. अर्थात, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना हरिभाऊंच्या कार्याबद्दल आदर होता. हरिभाऊ त्यांच्याशी थेट संपर्क करू शकत होते. २००५-०६ पासून भारत सरकार ’संचालनालय पुरातत्त्व अभिलेखागार व संग्रहालय’ यांच्यावतीने पुरासंपदा संरक्षण व पुरातात्त्विक संस्कृती रक्षणाच्या क्षेत्रात रचनात्मक व सृजनात्मक, विशेष उल्लेखनीय कार्य करणार्‍या एका व्यक्तीस दरवर्षी ’डॉक्टर विष्णु श्रीधर वाकणकर सन्मान पुरस्कार’ दिला जातो. दोन लाख रुपये व सन्मानपत्र असं याचं स्वरूप आहे.

असा हा खंदा पुरातत्त्व संशोधक नि सच्चा कार्यकर्ता, मनानं सदैव कलेच्या जवळ होता. संधी व वेळ मिळेल तेव्हा त्यांच्यातील मूळ कलाकार वृत्ती उफाळून येई. हातात पेन्सिल, कुंचला घेऊन चित्रं काढण्यात ते रममाण होत . १९८८ साली सिंगापूरला एका हिंदू संमेलनानिमित्त हरिभाऊ गेले होते. तेथील हॉटेलच्या गॅलरीत बसून ते समोर दिसणारे निसर्गचित्र रेखाटत होते. त्यांच्या ४ एप्रिलच्या नियोजित कार्यक्रमाला ते गेले नाहीत म्हटल्यावर त्यांचा शोध सुरू झाला. हातातली पेन्सिल खाली पडलेली व मांडीवर अर्धवट काढलेलं समुद्राचं चित्र अशा स्थितीत ते गॅलरीत आढळले. ३ एप्रिललाच या सरस्वतीच्या संशोधकाने सरस्वतीच्या सेवेत असतानाच अखेरचा श्वास घेतलाहरिभाऊंना साधं ७० वर्षांचं आयुष्यही मिळालं नाही. पण, त्यांचे अथक परिश्रम, सातत्याने संशोधन करत एकेक प्रकल्प पूर्ण करण्याची चिकाटी, त्याचं शास्त्रशुद्ध दस्तावेजीकरण करणं आणि दुसर्‍या बाजूनं संघ परिवारातल्या विविध जबाबदार्‍या उत्तमपणे पार पाडण्यासाठी वेळ देणं; हे सारं पाहिलं की, एकाच आयुष्यात ते किमान दोन आयुष्यं जगले असं वाटतं. या सार्‍या प्रवासात अपार कष्ट करत असताना त्यांची खेळकर वृत्ती अन् सौंदर्यदृष्टी कधीही मालवली नाही. भारताच्या प्राचीन सांस्कृतिक, ऐतिहासिक वैदिक वारशाचा केवळ ‘उदो उदो’ न करता रीतसर संशोधन करून सरस्वतीप्रमाणे लुप्त झालेला तो ज्ञानाचा प्रवाह पुन्हा वाहता करणं व अखिल जगताला त्याचा लाभ करून देणं ही काळाची गरज आहे व तीच हरिभाऊंना खरी आदरांजली असेल.

 

- विनीता तेलंग 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat