आयपीएलमध्ये पुन्हा बुकींचे सावट ; २ एनआरआय अटकेत

    दिनांक  03-May-2019
मुंबई : भारतीय क्रिकेट प्रेमींना इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) भलतेच वेड आहे. सध्या आयपीएल शेवटच्या टप्प्यात आले आहे. प्लेऑफसाठी कुठले ४ संघ पात्र ठरणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. अशामध्ये या उत्साहाला विरझण घालणारी घटना नुकतीच मुंबईत घडली आहे. मुंबईत २ एनआरआय बुकींना अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या क्राईम ब्रांचने ही कारवाई केली आहे. एका मोठ्या नामांकीत हॉटेलमधून या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पकडण्यात आलेले दोन्ही बुकी एनआरआय आहेत. पोलिसांच्या चौकशीत या दोघांकडे हाँगकाँगची नागरिकता असल्याचे उघड झाले आहेत. या दोघांची नावे ऋषी कन्हैयालाल दरियानानी आणि महेश खेललानी अशी आहेत. पकडण्यात आलेले दोन्ही आरोपी चेन्नई आणि दिल्ली दरम्यान सुरू असलेल्या आयपीएल मॅचवर एका रात्रीचा सट्टा लावत असताना त्यांना अटक करण्यात आली.

 

दोन्ही आरोपींकडून सात मोबाईल, दोन लॅपटॉप, डायरी, अनेक बँकांचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड तसेच १,३७,९९३ रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहेत. परदेशातही या रॅकेटची पाळेमुळे आहेत का? याबद्दल पोलीस अजूनही चौकशी करत आहेत. दोन्ही आरोपी एनआरआय असल्याने परदेशातील बुकींशीही त्यांचे संबंध असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat