'टाइम' बदलला : टाइम मासिकातून मोदींचा गौरव

    दिनांक  29-May-2019


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'डिव्हायडर इन चिफ', असे संबोधणाऱ्या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय 'टाइम' मासिकाने लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर घुमजाव केला आहे. १० मे या दिवशी प्रसिद्ध झालेल्या टाइम मासिकात लेखाच्या शिर्षकाहून उलट असे शिर्षक दिले आहे. नव्या लेखाला 'मोदी हॅज यूनायटेड इंडिया लाइक नो प्राइम मिनिस्टर इन डेकेड्स', म्हणजेच भारताला एकजूट करणारा मोदींसारखा नेता गेल्या दशकभरात झालेला नाही, असे म्हटले आहे.

 

टाइम मासिकाचे स्तंभलेखक मनोज लडवा यांनी हा लेख लिहिला आहे. लडवा यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत 'नरेंद्र मोदी फॉर पीएम' हे अभियान चालवले होते. मोदी यांच्या सामाजिकदृष्ट्या प्रगतीशील धोरणांनी अवघ्या भारतीयांना (यात हिंदू आणि धार्मिक अल्पसंख्याक अंतर्भूत) गरिबीतून बाहेर काढले. हे कोणत्याही मागील सरकारांच्या तुलनेत अतिशय वेगाने झाले आहे, असे लेखात नमूद करण्यात आले आहे.
 

'मोदींच्या धोरणांवर कटु आणि बहुधा अन्यायकारक टीकेनंतर त्यांनी गेल्या कार्यकालात आणि या निवडणुकीत गेल्या पाच दशकांमध्ये इतर कोणत्याही पंतप्रधानाने केले नाही अशा प्रकारे त्यांनी भारतीयांना एकजूट केले आहे.' पंतप्रधान मोदी यांच्यावरील हा लेख टाइम मासिकाच्या १० मेच्या अंकात प्रकाशित पत्रकार आतिश तासीर यांच्या कव्हर स्टोरीहून अगदीच वेगळा आहे.

 

यापूर्वीच्या लेखानंतर भारतीयांकडून त्यावर कठोर शब्दात टीका करण्यात आली होती. पंतप्रधान मोदी यांची प्रशंसा करणारा ताजा लेख 'टाइम'च्या वेबसाइटवर सर्वाधिक वाचला गेला आहे. या लेखात मोदींचा एक व्हिडिओ देखील पाहायला मिळतो. कोणासोबतही कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही असे, मोदी या व्हिडिओद्वारे सांगताना दिसत आहेत. दरम्यान यापूर्वीही टाइम मासिकाने माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावरही अशीच टीका केली होती.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat