ममतांना २४ तासांत दुसरा धक्का : सहा आमदार भाजपत जाणार

    दिनांक  29-May-2019



नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना गेल्या २४ तासांमध्ये पुन्हा एक धक्का बसला आहे. तृणमुल कॉंग्रेसच्या दोन आमदारांसह आणखी एका आमदाराने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मुनीरुल इस्लाम, असे या आमदाराचे नाव आहे. येत्या काळात तृणमुलचे आणखी सहा आमदार भाजप प्रवेश करणार असल्याचा दावा भाजपने आता केला आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांची डोकेदुखी आणखी वाढणार आहे. तृणमुलचे वरिष्ठ नेते गदाधर हाजरा, मोहम्मद आसिफ इक्बाल आणि निमई दास यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले होते. त्यानंतर टीएमसीच्या दोन आमदारांनी आणि नगरसेवकांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

 

बुधवारी आमदार मुनीरुल इस्लाम यांनी टीएमसीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची चिंता वाढत आहे. याच कारणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. मोदींचा शपथविधी सोहळा हा राजकारणाचा एक भाग असल्याने या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे ममता दीदींनी स्पष्ट केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat