विद्यात्रयी... चत्वारो वेदा:!

    दिनांक  29-May-2019
यस्माद् ऋचोऽपातक्षन् यजुर्यस्मादपाकषन्।

सामानि यस्य लोमानि अथर्वाङ्गिरसो मुखम्।

स्कम्भं तं बू्रहि कतम: स्विदेव स:॥

(अथर्ववेद-१०/७/२०)

अन्वयार्थ

(यस्मात्) ज्या सर्वव्यापक परमेश्वरापासून (ऋच:) ऋचा, ऋग्वेद (अपातक्षन्) निर्मिले गेले, (यस्मात्) ज्याच्यापासून (यजु:) यजु, यजुर्वेद (अपाकषन) उत्पन्न झाले. (यस्य) ज्या भगवंताचे (लोमानि) लोम हे (सामानि) साम, सामवेद आहेत. तसेच ज्याचे (अथर्वा आंगिरस:) आंगिरस अथर्वा, अथर्ववेद हे (मुखम्) मुख स्वरूप आहेत. (तं) त्या (स्कम्भं) सर्वाधार परमेश्वराविषयी (बू्रहि) सांगावे की (स:) तो (कतम:) कोणता, कितवा (स्वित् एव) आहे?

विवेचन

अथर्ववेदातील दहाव्या कांडातील सातव्या सूक्तात एकूण ४४ मंत्र आले आहेत. यात प्रारंभिक कांही मंत्रात जगन्नियंत्या परमेश्वराविषयी प्रश्न विचारण्यात आले आहेत. शेवटच्या चरणात ‘स्कम्भं तं ब्रूहि कतम: स्विदेव स:।’ असा प्रश्न केला आहे. म्हणजेच ज्याने या समग्र सृष्टीची सुव्यवस्थितपणे रचना करून त्याच्या पालन-पोषणाकरिता विविध पदार्थ, औषधी वनस्पती इत्यादी उत्पन्न केले, अशा त्या सर्वाधार देवाविषयी आम्ही का म्हणून प्रश्न करावा, की तो कोण आहे? ज्याप्रमाणे व्यावहारिक जगात वावरताना एखादी आधारभूत गोष्ट समोर दिसली किंवा अनुभवली असता, त्याच्या अस्तित्वाविषयीच एखाद्याने शंका उत्पन्न करावी? तेव्हा त्वरित जवळ उभ्या असलेल्या प्राज्ञपुरुषाने त्याचे प्रत्यक्ष दर्शन करवित त्याला यथार्थाची जाणीव करून द्यावी, असाच काहीसा भाग इथे मंत्रोक्त अंतिम चरणात प्रत्ययास येतो. या संदर्भात आपल्याकडे ‘हातच्या कांकणाला आरसा कशाला?’ अशा अर्थाची म्हणदेखील प्रचलित आहे.

प्रस्तुत मंत्रात चारही वेद परमेश्वराद्वारे उत्पन्न झाले आहेत, असा उल्लेख आहे. सर्वज्ञानयुक्त आणि सर्वसुपरिपूर्ण अशी ही वेदवाणी अपौरुषेय आहे. याबाबत मागील भागात विवेचन झालेच आहे. काही विद्वानांच्या मते ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद हे तीनच वेद प्रारंभिक व प्राचीन आहेत. अथर्ववेद नव्हे, कारण हा परवर्ती काळातील वेद होय. याकरिता ‘त्रयो वेदा:’ किंवा ‘वेदत्रयी’ अशा वचनांची प्रमाणे दिली जातात. पण या वचनांचा अर्थ ‘तीन वेद’ असा न घेता ‘त्रयी विद्या’ असा घेतला पाहिजे. चारही वेदांत पद्यात्मक ऋचा, गेयात्मक साम आणि गद्यात्मक यजुष या विद्या अंतर्भूत आहेत. शतपथ ब्राह्मण ग्रंथातही ‘त्रयी वै विद्या ऋचो यजूंषि सामानि’ (४/६/७/१) असा उल्लेख आढळतो. महाभारतातील शांतीपर्वातदेखील चारही वेदांत त्रयी विद्या वर्णिल्या आहेत-

 

त्रयीविद्यामवेक्षेत वेदे सूक्तमथांगत:।

ऋक् सामवर्णाक्षरता यजुषोऽथर्वणस्तथा॥

 

मुंडक उपनिषदाततत्रापरा ऋग्वेदो यजुर्वेद: सामवेदो अथर्ववेद:!’ असे प्रतिपादित केले आहे, तर मत्स्यपुराणातही -‘चत्वारो वेदा:’ असे म्हटले आहे. यातून ही बाब स्पष्टपणे लक्षात येते की, अगदी प्रारंभापासूनच मूळ वेद चार आहेत. ज्यांमध्ये ज्ञान, कर्म, उपासना या त्रयी म्हणजेच तीन विद्यांचा अंतर्भाव आहे.

 

मागच्या भागात ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेदाविषयी संक्षिप्त स्वरूपात जाणून घेतले. आता चौथ्या अथर्ववेदाचा परिचय करून घेऊया! यज्ञकार्यात ब्रह्मा नावाचा ऋत्विज म्हणजे अथर्ववेद होय! यज्ञाचे सुव्यवस्थितपणे निरीक्षण करणे हे ब्रह्माचे कार्य! अथर्ववेदालाच ब्रह्मवेद, अंगिरावेद, अथर्वाङ्गिरस असेही म्हणतात. क्षत्रवेद, भैषज्यवेद, छन्दोवेद, महीवेद या नावांनीही हे वेद ओळखले जातात. अथर्व शब्द ‘थर्व् कौटिल्ये’ या धातूपासन बनला आहे. म्हणजेच कुटिल वृत्तीपासून किंवा हिंसक कार्यापासून दूर असलेला. मूळ रूपाने अग्नीला आवाहन करणारा पुरोहित! असाही अथर्वचा अर्थ होतो. याच कारणाने प्राचीन काळी अथर्वन् हा शब्द पुरोहित विद्वानांकरिता वापरला जात होता. अथर्व आणि अंगिरा या दोन शब्दांच्या योगाने तयार झालेला अथर्वाङिग्र्स हा शब्द दोन ऋषिकुळांशीही संबंधित आहेत.

 

पतंजली मुनींनी आपल्या महाभाष्यात अथर्ववेदाच्या ज्या नऊ शाखांचा उल्लेख केला आहे, त्या म्हणजे पिप्पलाद, स्तौद, मौद, शौनकीय, जाजल, जलद, ब्रह्मवद, देवदर्श आणि चारणवैद्य. पण सध्या मात्र शौनक आणि पिप्पलाद याच दोन शाखा उपलब्ध आहेत. त्यातही पिप्पलादपेक्षा शौनक हीच शाखा सर्वाधिक प्रचलित व प्रसिद्ध मानली जाते. यात २० कांडे, ७३१ सूक्त आणि ५ हजार ९७७ मंत्र आहेत. यातील जवळपास २० टक्के इतक्या प्रमाणात मंत्र ऋग्वेदातदेखील आढळतात. या वेदाचा गोपथ ब्राह्मण ग्रंथाशी संबंध आहे.

 

अथर्ववेदात सामाजिक, राष्ट्रीय, वैश्विक प्रगती साधण्याकरिता मोठ्या प्रमाणात उपदेश मिळतो. अध्यात्म, अधिभूत आणि अधिदैवत अशा तीन भागांत अथर्ववेदाची विषयवस्तू आढळते. ब्रह्म (परमेश्वर), जीवात्मा, आश्रमव्यवस्था याविषयीची माहिती अध्यात्म भागात दडली आहे. राजा, राज्यव्यवस्था, राज्याभिषेक, युद्ध, सामाजिक व्यवस्था या संदर्भातील माहिती अधिभूत भागात विद्यमान आहे, तर देवता, यज्ञ, काळ इत्यादी संबंधीचे ज्ञान अधिदैवत भागात वर्णिले आहे. विविध रोगनिवारक औषधे, चिकित्सा, वनस्पती याबरोबरच कृषी, अन्नधान्य, न्यायव्यवस्था, कौटुंबिक वातावरण, गृहस्थजीवन, स्त्री-पुरुषांची कर्तव्ये, विविध कला-कौशल्ये याविषयी मौलिक माहिती अथर्ववेदात आढळते.

 

संपूर्ण जगाला आयुर्वेद चिकित्सा पद्धतीची अभिनव देणगी लाभली, ती या वेदामुळेच! म्हणून आयुर्वेद हा अथर्व वेदाचा उपवेद मानला जातो. याखेरीज सर्पवेद, इतिहास वेद, पुराणवेद हेदेखील या वेदाचेच उपवेद आहेत. भैषज सूक्त, दीर्घायुष्यासंबंधी सूक्त, प्रायश्चित सूक्त, राजकर्म सूक्त, कृषिसूक्त, भूमिसूक्त (पृथ्वीसूक्त) इत्यादी या वेदातील सुपरिचित असे ज्ञानप्रद सूक्त आहेत. मुंडकोपनिषद, प्रश्नोपनिषद, मांडुक्योपनिषद हे तीन उपनिषद या वेदाशी संबंधित आहेत.

 

विशेष म्हणजे या वेदाचे भूमी (पृथ्वी) सूक्त हे राष्ट्रप्रेम, विश्वकल्याण आणि मानवाच्या संपूर्ण हितासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. यात विश्वसमूहाने जागतिक पातळीवर ऐक्यासाठी एकत्र येऊन प्राणिमात्राचे कल्याण साधण्याचे आवाहन केले आहे.

- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat