सामाजिक हिटलरशाही

    दिनांक  29-May-2019    

बाळाचे नाव नरेंद्र दामोदरदास मोदी ठेवले पण, आता ते नाव बदलून मोहम्मद अल्ताफ आलम मोदी हे नाव ठेवले गेले. कारण नातेवाईक, समाजातील लोक आणि मुख्यतः अकिका आणि खतना करणार नाही, असे धमकी देणारे धर्माचे ठेकेदार यांनी या बालकाच्या आईबाबांवर दबाव आणला. दबाव का आणला तर मुलाचे नाव नरेंद्र दामोदर दास मोदी का ठेवले? दुसरे काहीही ठेवले असते तरी त्यांना कोणतीच समस्या नव्हती. पण नरेंद्र मोदी नाव, तौबा तौबा... या प्रसंगावरून काय आढळते? काय स्पष्ट होते? डोकं ताळ्यावर असेल आणि तथाकथित पुरोगाम्यांप्रमाणे जर नशा करत नसाल तर यावरून स्पष्ट समजते की, इथे कुठे आणि कोण झुंडवाद जोपासतो आहे. एका व्यक्तीच्या नावाची अ‍ॅलर्जी, हा द्वेष, हा मत्सर कशासाठी? बरं असो, ते नाव कदाचित न आवडण्यासारखं असेल. पण ते नाव त्या बालकाच्या आईवडिलांना आवडले होते. आपल्या मुलाचे नाव दुसर्‍यांदा पंतप्रधान झालेल्या आणि स्वकष्टाने यश मिळवलेल्या व्यक्तीच्या नावावर ठेवावे, असे त्या आईबाबांना वाटले तर त्यात चूक काय? मुलगा गल्लीमध्ये बिड्या फुंकतच राहणारा आहे पण तरीसुद्धा मुलाचे नाव सिकंदर, बादशाह ठेवणारे आहेतच. घरात एक रोटीची मारामार, तरी मुलाचे नाव हौसेने आमिर ठेवले जातेच ना? कशासाठी तर आपल्या मुलानेही तसेच बनावे म्हणून. मग आपल्या मुलाला नरेंद्र मोदींचे नाव द्यावे, असे एखाद्या आईबाबांना वाटले तर त्यांचे काय चुकले? कोणतेही आईबाप हिंदू मुस्लीम नंतर असतात. पहिले ते त्यांच्या मुलांचे आईबापच असतात. त्यामुळे धर्माधारित नावाबिवांच्या भानगडीत न पडता उत्तर प्रदेशातील गोंडा येथील मुश्ताक अहमद आणि मेहनाज बेगम या दाम्पत्याने आपल्या मुलाला हिंदुस्थानच्या खर्‍याखुर्‍या लोकनेत्याचे नाव द्यायचे ठरवले. ती त्यांची मर्जी. पण लोकशाही असलेल्या भारतातसुद्धा, त्यांना आपल्या मुलाचे नाव त्यांच्या आवडीने ठेवायचे स्वातंत्र्य नाही. त्यांच्यावर दबाव आणला गेला की, तुम्ही जर मुलाचे नाव नरेंद्र मोदी ठेवले तर मुस्लीम होण्यासाठीचे त्याचे आवश्यक विधी अकिका आणि खतना केले जाणार नाहीत. तो मुसलमान म्हणून ओळखला जाणार नाही. छे! ही दडपशाही कुणाला दिसते की नाही? या सामाजिक हिटलरशाहीचे काय?

 

समाजाचे शत्रू

 

पूर्वीच्या काळी जातपंचायती होत्या, तेव्हा त्यांचा प्रभाव समाजावर असायचा. जातपंचायत किंवा खापपंचायतीचा प्रभाव आजही समाजात अस्तित्वात आहे. आता तर जातपंचायतीचा उंबरठा ओलांडून याचे स्वरूप भावकी, गावकी वगैरेवर आले आहे. आजही समाजात अशाप्रकारे जातपंचायती आणि खापपंचायतीने बहिष्कृत केलेले लोक दिसतात. हे फक्त एका समाजातच पाहायला मिळत नाही तर अपवाद वगळता सर्वत्रच पाहायला मिळते. आपण एक समाज म्हणून वेगळे आहोत, हा अट्टाहास जोपासण्यासाठी कित्येेकदा समाजात व्यक्तीच्या निरूपद्रवी कृतीलाही भयंकर ठरवले जाते. याबाबतचे सर्वात उत्तम उदाहण म्हणजे अभिनेते भाऊ कदमांचे देता येईल. ही जुनी गोष्ट झाली म्हणा. पण, तरीही समाजाचे काही ठेकेदार कसे वागतात, याचे हे उत्तम उदाहरण. विद्रोही चळवळीतला आणि धम्माला शरण गेलेला एक उत्तम कवी, समाजात चाललेल्या अन्यायाविरुद्ध तो नेहमी आवाज उठवे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन समाजातली काही बडी धेंडे राजकारण करतात. त्यामुळे बाबासाहेबांचे नाव खराब होते, अशी त्याने भूमिका घेतली. त्यावेळी त्याला शांत शब्दांत सांगण्यात आले, “तुझ्या मुलींची लग्ने व्हायची आहेत. जातीतच करायची आहेत की जातीच्या बाहेर?” त्या दिवसापासून त्या लोकप्रिय कवीचा आवाज बंद झाला. हीसुद्धा दडपशाहीच आहे. पण याविरुद्ध आवाज उठवणार कोण? एक ज्येष्ठ समाजसेवक, ज्याने आयुष्य सफाई कामगारांसाठी वेचले. त्याने हिंदुत्व विचारसरणी मानणार्‍याच्या हस्ते, गणेशदेवतेची प्रतिमा पुरस्कार म्हणून स्वीकारली. तेव्हा त्याला त्याच्या गावातल्या भावकीने बहिष्कृत केले. या दुःखाने, धक्क्याने त्याची पत्नी आजारी पडली, वारली. ती वारल्यानंतर तिच्या दशक्रिया विधीला तीच भावकी जमली. मात्र, तिच्या नवर्‍याने त्यांना जाब विचारला की, माणूस मेल्यानंतरचे नाते, समाज आणि प्रेम काय कामाचे? जिवंतपणी ते मिळाले असते तर माझी पत्नी मेली नसती. दडपशाही करून, भावबंदकी करून आपल्याच समाजातील व्यक्तींंना बहिष्कृत करणारे, त्रास देणारे हे कोण आहेत? संविधानाला मानतो, म्हणत प्रत्यक्ष समाजात संविधानाच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यास नख लावणारे हे लोक खरे समाजाचे शत्रू आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat