वर्तमानपत्रांनी आपली विश्वासार्हता राखावी - भाऊ तोरसेकर

    दिनांक  28-May-2019
देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात व्यक्त केले मत


पणजी : अनेक माध्यमांमुळे वाचक, समाज सजग झाला आहे. त्यामुळे पत्रकारांनी त्या माध्यमांपेक्षा वरचढ होण्याची आवश्यकता असून वर्तमानपत्रांनी आपली विश्वासार्हता राखावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांनी केले. पत्रकाराला संदर्भ जोडता यायला हवेत. पत्रकारिता हे जबाबदारीचे, लढाईचे काम असून संरक्षणाची मागणी करून पत्रकारांना निर्भय पत्रकारिता करता येणे शक्य नाही, असेही पुढे त्यांनी नमूद केले. विश्व संवाद केंद्र, मुंबईतर्फे नारद जयंतीच्या औचित्याने दिला जाणारा देवर्षी नारद पत्रकारितापुरस्कार सोहळा दि. २७ मे रोजी पणजी येथील कला अकादमीच्या ब्लॅक बॉक्स कक्षात संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.

 

विश्व संवाद केंद्र, मुंबई आणि राष्ट्रीय स्वधर्म संस्कार मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला भाऊ तोरसेकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. तसेच यावेळी व्यासपीठावर विश्व संवाद केंद्राचे कार्यवाह मोहन ढवळीकर, संपादक दत्ता पंचवाघ, राष्ट्रीय स्वधर्म संस्कार मंडळ, पणजीचे सचिव विलास सतरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

तोरसेकर पुढे म्हणाले की, शब्द हे एक हत्यार आहे व ते जपूनच वापरले पाहिजे. विषयाची विस्तृत माहिती पुरवणे हे पत्रकाराचे काम आहे. लोकांना जे आधीच माहिती आहे तेच आपण सांगितले तर त्याला काही अर्थ उरत नाही. अनेकदा पत्रकार घटनास्थळावर जाऊन बातमी करत नाहीत त्यामुळे बातमीच्या मजकुरात अनेक चुका राहतात. शब्द हे एक हत्यार आहे. ते एकाच पद्धतीने वापरले तर त्याला अर्थ उरत नाही. त्यामुळे एखादी गोष्ट रोज नव्या पद्धतीने सांगणे, जे माहिती आहे ते अधिक समजावून सांगणे हे पत्रकाराचे काम असल्याचेही स्पष्ट करुन पत्रकाराच्या लिखाणाचा आशय वाचकांपर्यंत जशास तसा पोचला पाहिजे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

 

भाऊ तोरसेकर यांनी अनेक सोदाहरणांतून, पत्रकारितेत वाचकांची कशी गल्लत केली जाते, याविषयी विवेचन केले तसेच विविध विषयांवर चर्चा होताना आशय कसा विसरला जातो, हे सुद्धा यावेळी स्पष्ट केले. विश्व संवाद केंद्र, मुंबई तर्फे नारद जयंतीच्या निमित्ताने पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा दरवर्षी देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारदेऊन सन्मान करण्यात येतो. यंदा दै. नवप्रभाचे संपादक परेश प्रभू आणि गोवा येथील माहिती व प्रसिद्धी खात्याच्या माहिती सहाय्यक संघमित्रा फळदेसाई-माईणकर यांना भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, मानधन आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरुप होते.

 

कुणीतरी आपल्या कामाची दखल घेत आहे हा आनंदाचा भाग आहे. परंतु पुरस्कार म्हणजे जबाबदारीची जाणीव असते, अधिक चांगले काम आपल्याकडून व्हावे,अशी अपेक्षा असते. असे परेश प्रभू यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले. आर्थिक मिळकतीपेक्षा पत्रकारितेचा फायदा व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी झाला. पत्रकारितेतून आपल्याला शहाणपण आले असून या पेशाचा अभिमान असल्याचे संघमित्रा यांनी सांगितले.

 

याच कार्यक्रमात विश्व संवाद केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रलेखन स्पर्धेतील विजेते तुकाराम शेटगावकर, स्नेहा जोशी व सुशीला हळर्णकर यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच पत्रलेखन स्पर्धेत सहभागी झालेल्या पत्रलेखकांच्या पत्रांचा अंतर्भाव असलेल्या पत्रसामर्थ्यविशेषांक २०१९ चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat